सावरकरांनी कायद्याचा फायदा घेतला, यात गैर काय?

सावरकरांनी कायद्याचा फायदा घेतला, यात गैर काय?
----
प्रखर बुद्धिवादी विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांचा प्रतिप्रश्न
-----
नांदेड ः भारतीय जनता पक्ष सावरकरांना मानतो, त्यामुळे सावरकरांनाच बदनाम केले तर भाजपाकडे स्वातंत्र्यलढ्यात सहभागाबद्दल कोणताही आधार राहणार नाही, हा दुष्ट हेतू बाळगून सावरकरांना लक्ष्य केले जात आहे. अंदमानातून सुटकेसाठी सावरकरांनी ब्रिटीश सरकारला जी पत्रं लिहिली तो माफीनामा नव्हता तर कायद्याचा फायदा घेण्याचा हक्क होता, यात गैर काय, असा प्रतिप्रश्न भारतातील प्रख्यात बुद्धिवादी विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी उपस्थित केला आहे.
'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते खा. राहूल गांधी महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी विनाकारण सावरकरांचा विषय उकरुन काढला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागून स्वतःची सुटका करवून घेतली. त्यामुळे ते पळपुटे ठरतात. भारतीय स्वातंत्र्यात त्यांचे काहीही योगदान नाही, अशी राहूल गांधी यांची जुनीच भूमिका आहे. याबाबत वेळोवेळी उहापोह सुद्धा झाला आहे. परंतु तरीही त्यांनी पुन्हा एकदा काही कागदपत्रांचा हवाला देत महाराष्ट्रात येवून तीच कॅसेट वाजवली आणि अपेक्षेप्रमाणे गदारोळ सुरु झाला.
या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी राहूल कुलकर्णी यांनी आपल्या 'मधली ओळ' या सदरात आणि स्थानिक पत्रकार दिलीप शिंदे यांनी त्यांच्या 'मनदर्पण' या यु-ट्यूब चॅनलवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अभ्यासक आणि बुद्धिवादी विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांची मुलाखत घेतली. यावेळी प्रा. मोरे यांनी सावरकरांची अंदमानच्या काळकोठडीतील भूमिका उलगडून सांगितली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या क्रांतीकारी सहभागाबद्दल ब्रिटीश सरकारने सावरकरांना इ.स. 1910 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा भोगताना ते जीवंत राहिले असते तर 1960 मध्ये त्यांची सुटका झाली असती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर अनुयायी असणाऱ्या सावरकरांनी स्वतःच्या सुटकेसाठी कायदादत्त हक्क वापरत ब्रिटीशांकडे पत्रव्यवहार केला. वास्तविक स्वतः सावरकरांनीच त्यांच्या 'माझी जन्मठेप' या ग्रंथात हे संपूर्ण प्रकरण मांडले आहे. अंदमानच्या तुरुंगात नाहक खितपत पडण्यापेक्षा बाहेर येवून शक्य त्या मार्गाने देशसेवा करावी, असा त्यांचा हेतू होता आणि पुढे त्यांनी तेच केले.
रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या कालावधीत आणि त्यापुढेही सावरकरांनी जे कार्य केले, ते अतुलनीय होय. याच कालावधीत 'सर्वच धर्मग्रंथ कालबाह्य झाले असून त्यांची जागा ग्रंथालयातील कपाटात आहे. पुर्वजांचा ठेवा म्हणून ती पुजनिय असतीलही पण अनुकरणीय नाहीत', अशी अत्याधुनिक भूमिका मांडणारा, अत्यंत तर्ककठोर बुद्धिवादी नेता भारताला लाभला. परंतु तो विरोधकांना रुचला नाही आणि अनुयायांना पचला नाही. त्यामुळे सावरकरांवर कायम अन्याय होत आला, अशी भूमिका प्रा. मोरे यांनी मांडली. 

----
सावरकरांनी माफी मागितलीच नाही...
न्यायालयात खटला सुरु असताना आरोपीने आपला गुन्हा मान्य करुन सुटकेची विनवणी केल्यास ती माफी ठरते, परंतु शिक्षा ठोठावल्यानंतर तुरुंगात गेल्यावर शिक्षेत सुट मागण्याचा कैद्याला कायद्याने हक्क दिला आहे. तोच हक्क सावरकरांनी मागितला. 1910 ते 20 या कालावधीत सावरकरांनी पाच पत्रं ब्रिटीश सरकारला लिहिलीत, हे सर्व सावरकरांनी स्वतःच लिहून ठेवलं आहे. 2001 मध्ये अब्दुल गफ्फार नुराणी या वकिलाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यावेळी ते दिल्लीच्या ऑर्काइजमध्ये गेले तिथे त्यांना पाच पत्रे मिळाली, ती माफी पत्रे होती, असा त्यांचा दावा आहे. वास्तविक सावरकरांनी स्वतःच लिहून ठेवलेलं, तेच नव्याने मांडून आपण काहीतरी नवा शोध लावलाय असा हा प्रकार असल्याचे प्रा. मोरे म्हणाले.

टिप्पण्या