विमानतळ बनले पुन्हा शोभेची वास्तू
-----
नांदेड ः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंद पडलेल्या विमानतळांना पुनरुज्जीवित करण्यासाठी 'उडान' योजना आणली होती. त्यामुळे नांदेडचे विमानतळही कार्यान्वित झाले होते. प रंतु त्या योजनेची मुदत संपली आणि उड्डाणेही बंद झाली. मार्चपासून येथील विमानतळ शोभेची वास्तू बनून उभी आहे.
गुर-ता-गद्दी समारोहाच्या निमित्ताने 2008 मध्ये नांदेड येथे अत्याधुनिक स्वरुपाचे विमानतळ उभे राहिले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचे हे विमानतळ गुर-ता-गद्दी सोहळ्यानंतर रिलायन्स कंपनीला 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आले. सुरुवातीला येथून मुंबई व दिल्ली येथे मर्यादित स्वरुपाची विमानसेवा सुरु होती. सर्वात प्रथम किंगफिशर, नंतर गो एअर व पुन्हा स्पाईस जेट या कंपन्यांनी सेवा पुरवली. पण, पुणे कोणते ना कोणते कारण पुढे करीत सर्वच सेवा बंद पडल्या.
2014 मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले. श्री मोदी यांनी देशभरातील विमान सेवे अभावी बंद पडलेले सर्व विमानतळ पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य लोकांनाही हवाई सफर घडावी, या उद्देशाने 'उडान' (उडे देश का आम नागरिक) ही योजना सुरु करण्यात आली. त्यात नांदेडचाही समावेश करण्यात आला. हैदराबादस्थित ट्रू जेट या कंपनीला ही जबाबदारी सोपवण्यात आली. या कंपनीने हैदराबाद-नांदेड-मुंबई व त्याच दिवशी परतीचा प्रवास अशी विमानसेवा सुरु केली. त्यास प्रतिसादही उत्तम होता.
दरम्यान, एअर इंडिया या त्यावेळच्या सरकारी कंपनीने अमृतसर-नांदेड-मुंबई या मार्गावर सेवा सुरु केली. या सेवेलाही प्रवाशांनी छान प्रतिसाद दिला. पण, पुढे एअर इंडिया टाटा कंपनीने विकत घेतली आणि नांदेड येथील सेवा मार्चमध्ये बंद केली. त्याच दरम्यान, ट्रू जेट ही कंपनी विक्री झाली. त्यामुळे हैदराबाद-नांदेड-मुंबई ही सेवाही मार्चमध्येच बंद झाली. त्यामुळे नांदेडकर आता हवाई सफरीपासून वंचित राहिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'उडान' या योजनेची मुदतही संपली. खरेतर मुदत संपल्यानंतरही प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्याने बराच काळ ट्रू जेटने सेवा पुरवली. पण, मार्चपासून नांदेड विमानतळावरुन विमानांचे उड्डाणं बंद झाली आहेत. पुन्हा सेवा सुरु व्हावी यासाठी गुरुद्वारा आपल्यापरीने प्रयत्नशील आहे. परंतु नांदेड जिल्ह्याचे नेतृत्त्व अशोक चव्हाण सध्या सत्तेत नसल्याने या प्रयत्नांना राजकीय पाठबळ मिळेनासे झाले आहे.
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक असून त्यांची प्रत्येक योजना राज्यात हिरीरीने राबविण्याबाबत त्यांचा अट्टाहास असतो. देशाला पाच ट्रिलीयल डाॅलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आपल्यापरीने योगदान देण्याचा श्री फडणवीस यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. तद्वतच उडान योजनाही सुरु राहावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे.
----
पंचक्रोशीसाठी फायदेशीर
नांदेड येथे रात्रीच्यावेळी विमान उड्डाणाची व्यवस्था आहे. तद्वतच इंधन भरण्याचीही सोय आहे. याशिवाय पंचक्रोशीतील जिल्हे परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांसाठीही येथील विमानतळ सोयीचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेवून नांदेड येथून मुंबई, दिल्ली सोबतच पुणे येथेही विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा