धरण उशाला अन् कोरड घशाला, मग वाॅटरग्रीड हवंय कशाला?


धरण उशाला अन् कोरड घशाला, मग वाॅटरग्रीड हवंय कशाला?
----
... तर पाणी पेटेल - अशोक चव्हाणांचा इशारा
----
नांदेड ः महेश राजे ः  ज्या भागात धरणं भरायचीच मारामार, उद्योगासाठी तर सोडाच, पण प्यायलाही पाणी मिळत नाही, या परिस्थितीत वाॅटरग्रीडची कल्पनाही करणे अव्यवहार्य ठरेल. इतपर हे घोडे पुढे दामटलेच तर पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही, असा वास्तवदर्शी इशारा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला. घनसावंगी (जि. जालना) येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनात 'मराठवाड्यातील राजकारणाची दशा आणि दिशा' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षात झालेल्या या साहित्य संमेलनात सर्व भाषणांपेक्षा श्री चव्हाण यांचेच भाषण प्रभावी ठरले. त्यांनी रस्ते, पाण्यापासून ते आरोग्य व रेल्वेच्या प्रश्नांना स्पर्श केला. मिडियाच्या अभिव्यक्ती संदर्भातील टोमणा वगळता त्यांचे भाषण मुद्देसूद होते. परिसंवादाचा विषयच 'मराठवाड्यातील राजकारणाची दशा आणि दिशा' असल्याने विद्यमान राजकीय दुर्दशा त्यांनी मोजक्या शब्दात टिपताना 'हे वागणं बरं नव्हं' असा सल्ला दिला. लोकांच्या आवडीनिवडी प्रचंड बदलल्या असून राजकारण आयपीएलच्या 20-20 मॅचसारखे झाले आहे. दररोजच चौका, छक्का मारावा लागतो. विद्यमान परिस्थितीत कामं आणि मतं यांचा काही संबंध राहिला आहे काय, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
--- 
'दे रे हरी, पलंगावरी', असे होणार नाही
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण आहोत, मराठवाडा ही संतांची भूमी आहे हे खरे असले तरी आपल्याला सहज काही मिळेल, अशी स्थिती सध्या नाही, हे आम्ही जवळून अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याला दुर्दशा पाहण्याची वेळ येऊ नये. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राॅफ यांच्यासारख्यांचं योगदान आहे. आज सीमेवरील लोक कर्नाटक, तेलंगणात जाण्याची भाषा करीत आहेत, ही धोक्याची घंटा आहे. हा इशारा ओळखून विकासाच्या बाबतीत तातडीने व आश्वासक पावले उचलली पाहिजेत. लोकांना न्याय देण्यासाठी पक्षभेद विसरणे आवश्यक आहे.
-----
तुटीचे प्रकल्प भरण्याची व्यवस्था व्हावी
वाॅटरग्रीड म्हणजे एका जिल्ह्यातील पाणी उचलायचे आणि दुसऱ्या जिल्ह्यात न्यायचे. हे जेव्हा सर्व धरणं भरलेले असतील, तेव्हा शक्य आहे. पण दुर्दैवाने अशी परिस्थिती नाही. जेव्हा पाऊस कमी पडतो, तेव्हा जाकवाडीच्या वरील भागात पाणी उचलले जाते आणि मराठवाड्याला पिण्याच्या थेंबाथेबासाठी तरसावे लागते. या परिस्थितीत वाॅटरग्रीडची कल्पनाच करवत नाही. उलट कोकणातून जे पाणी समुद्रात वाहून जातं ते अडवून महाराष्ट्राच्या खालच्या भागात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मराठवाड्यातील प्रकल्प दरवर्षी भरतातच असे नाही. त्यामुळे वाॅटरग्रीडची संकल्पना कोणताही विचार न करता राबवली गेली तर पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही.
----
मराठवाड्यातही भरपूर कामे झाली
मराठवाडा निजामाच्या तावडीतून उशीरा मुक्त झाला. निजामाच्या राजवटीत फक्त महसूल गोळा करण्याचंच काम झालं. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राॅफ यांच्यासारख्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. त्यानंतर शंकररावजी चव्हाण यांनी मराठवाड्याचं नेतृत्त्व करताना विकासासाठी जे शक्य ते करण्याचा प्रयत्न केला. जायकवाडी धरणासाठी त्यांना प्रचंड विरोध झाला. इतरही अनेक कामं झाली. त्यामुळे मराठवाड्यात काहीच झाले नाही, अशी उदासीन स्थिती नाही. खूप काही भरीव झाले आहे. मीटरगेजचे ब्राॅडगेजमध्ये रुपांतर झाले, रस्त्यांचे जाळे तयार झाले. अनुशेष निश्चितच मोठा आहे, त्यासाठी व्हायला हवे तेवढे प्रयत्न झाले नाहीत.
----
नेतृत्त्वाची फळी तयार आहे
मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर शंकररावजींबरोबर शिवराज पाटील चाकूरकर, प्रमोद महाजन यांनीही मराठवाड्याच्या विकासाला हातभार लावला. पुढे विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आपण स्वतः, सुंदरराव सोळंके यांनी आपल्यापरीने प्रयत्न केले. आताही धडपड्या नेतृत्तवाची कमतरता नाही. राजेश टोपे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अमित देशमुख, रावसाहेब दानवे, भागवत कराड, अब्दुल सत्तार यांच्यासारख्या नेत्यांची फळी आहे. (अब्दुल सत्तार यांचे नाव घेताच उपस्थितांत कमालीचा हशा पिकला) त्यांच्याकडून मराठवाड्याला खूप अपेक्षा आहेत. कोवीड काळात राजेश टोपे या जालन्याच्या सुपुत्राने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले, याचा आम्हाला अभिमान आहे.
---
'जिसकी लाठी उसकी भैंस'
दुर्दैवाने 'जिसकी लाठी उसकी भैंस', अशी परिस्थिती  दिसून येते. ज्याच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत, तो आपल्या भागात निधी पळवून नेतो. परिणामी मराठवाड्यासारख्या प्रचंड अनुशेष असलेल्या प्रदेशाचा अनुशेष आणखीच वाढतो. या परिस्थितीत सध्या सत्तेत असलेल्या पक्षात जे मराठवाड्यातील नेते आहेत, त्यांनी पुढाकार घेवून आपले रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे, त्यासाठी आपण सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊ. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रश्न सुटले आहेत, असे म्हणता येणार नाही. परंतु तुलनेने बेरोजगारी, सिंचन, उद्योग, आरोग्य याबाबतीत मराठवाड्याच्या तुलनेत हा भाग खूप विकसीत आहे.
-----
हा तर हक्कभंग
ठाकरे सरकारच्या काळात आम्ही ज्या ज्या मागण्या ज्या भागातून आल्या, त्याला मंजुरीच दिली आहे. अर्थसंकल्पात तरतूद केली. विधीमंडळात चर्चा करुन एकमताने त्यावर निर्णय घेतले. परंतु विद्यमान सरकारने त्या सर्व कामांना स्थगिती दिली. एकतर मराठवाड्याचा अनुशेष अगोदरच जास्त त्यातही स्थगिती मिळणार असेल तर या भागातील कामं व्हायची कधी. अशा प्रकारे स्थगिती देणे हा खरं म्हणजे हक्कभंग होय. त्यामुळे लोकांच्या समस्यांची जाणिव ठेवून मुख्यमंत्र्यांनी विकासकामांना दिलेली स्थगिती तातडीने उठवली पाहिजे. अन्यथा येते वर्ष हे निवडणुकांचे आहे. परिणामी आचारसंहितेचा अडसर होऊ शकतो.
-----
मराठवाडा मध्य रेल्वेला जोडावा
स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यात रेल्वेचा विकासही लक्षणीय झाला. त्यासाठी शंकरराव चव्हाण यांना वेळोवेळचे रेल्वेमंत्री ज्यात सी.के. जाफर शरीफ, माधवराव सिंधीया, सुरेश कलमाडी यांचे सहकार्य लाभले. (कै) सुधाकरराव डोईफोडे, ओमप्रकाश वर्मा यांनी रेल्वेच्या मागण्यांसाठी व्यापक जनचळवळ उभारली. अजूनही मराठवाडा दक्षिण मध्य रेल्वेला जोडलेला आहे. तो मध्य रेल्वेला जोडावा अशी मागणी आहे. वास्तविक ही निव्वळ प्रशासकीय बाब असून रावसाहेब दानवे यांनी मनात आणले तर तातडीने हा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी पै चाही निधी लागत नाही. रेल्वेच्या विकासासाठी दानवेंनी प्रयत्न करायला हवेत. किमान आम्हाला डबे तरी चांगले द्या.
----
'समृद्धी' मराठवाड्यातही यावी
महाराष्ट्राचा विकास तर झालाच पाहिजे. पण त्याबरोबरच मराठवाडाही मागास राहता कामा न ये. नुकतेच समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात खऱ्या अर्थाने समृद्धी येणार आहे. पण यातून मराठवाड्याचे अनेक जिल्हे वंचित होते, आम्ही भांडून ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून समृद्धीला जोडून घेण्याचा प्रयत्न केला. भूसंपादनासाठी नुकतेच 2300 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे 13 हजार कोटी रुपयांचा समृद्धीला जोडणारा हा रस्ता येत्या काळात तयार होईल. जेणे करुन नांदेड व मुंबईचे अंतर कमी होऊन या भागातही उद्योग येतील. शेतीचा माल महानगरात पोचविण्यासाठी मदत होईल.
----
राजकीय वैमनस्य घातक
वेगवेगळ्या राजकीय पक्षात असल्याने मतभिन्नता समजता येऊ शकते, पण मनभिन्नता का, आम्ही वैयक्तिक पातळीवर एकमेकांचे शत्रू नक्कीच नाही. भारत-पाकिस्तान युद्धानंतर अटलजी सारख्या विशाल दृष्टीकोन असणाऱ्या नेत्याने इंदिराजींना दुर्गेची उपमा दिली होती. अटलजींच्या आरोग्यासाठी अमेरिकेत उपचार होणे आवश्यक होते, त्यावेळी राजीव गांधी यांनी मदत केली, याचा उल्लेख स्वतः अटलजींनी राजीवजींच्या निधनानंतर केला. विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री तर जगजाहीर होती. दुर्दैवाने आज ही परिस्थिती नाही. सद्यस्थितीत जे राजकीय वैमनस्य पहायला मिळते आहे, ते अतिशय घातक आहे. 
 ----
अर्जूनराव 'हम तुम्हारे साथ है'
मराठवाड्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य देत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे. अर्जून खोतकर हे मुख्यमंत्र्यांच्या अतिशय विश्वासातील आहेत. त्यांच्या कागदावर मुख्यमंत्री डोळे झाकून सही करतील. त्यामुळे त्यांनी मराठवाड्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. 'अर्जूनराव खोतकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', अशी साद श्री चव्हाण यांनी घातली. परंतु या वाक्यावरुनही रान पेटू शकते हे क्षणार्धात लक्षात आल्यानंतर 'केवळ मराठवाड्याच्या विकासापुरते बरं का', अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
-----
'अॅक्शन टेकन रिपोर्ट'वर चर्चा व्हावी
अ.भा. साहित्य संमेलन असो वा मराठवाडा साहित्य संमेलन. प्रत्येकवेळी संमेलनाच्या समोरापाला त्या त्या भागातील विकासाच्या प्रश्नांवर ठराव केले जातात. परंतु पुढे त्याचे काय होते. जे ठरले, त्यावर कितपत अंमलबजावणी झाली, हे गुलदस्त्यातच राहते. त्यामुळे मसापने पुढील साहित्य संमेलनाच्यावेळी संबंधितांकडून अॅक्शन टेकन रिपोर्ट मागवावेत आणि त्यावेळी त्यावर सविस्तर उहापोह झाला पाहिजे. असे झाले तरच प्रश्न मार्गी लावण्याचे नैतिक बंधन सर्वांवर राहील, असेही श्री चव्हाण म्हणाले.
-----
ReplyForward

टिप्पण्या