शहराचे सौंदर्यीकरण विद्रुपतेत परावर्तित

 शहराचे सौंदर्यीकरण विद्रुपतेत परावर्तित

----
कचऱ्यांचे ढीग, पुतळ्यांची निगा नाही, शिल्पही गायब

----

नांदेड ः स्वच्छ शहर, सुंदर शहर हे अभियान सपशेल आपटले असून कोणत्याही पदाधिकारी तसेच नगरसेवकांचा दबाव नसतानाही तत्परतेने कामकाज करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. शहराच्या विविध भागात कचऱ्यांचे ढीग साचले आहेत, अनेक भागात घंटागाड्या पोचत नाहीत. महापुरुषांच्या पुतळ्यांची योग्य निगा राखली जात नाही, गुर-ता-गद्दीच्या निमित्ताने उभारण्यात आलेले शिल्प एकतर मोडकळीस आलेत किंवा गायब झालेत.
आयुक्तांची वारंवार होणारी बदली आणि रदबदली यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिल्याचे दिसत नाही. महापालिकेची मुदत संपून दोन महिने झाले. निवडणुका कधी होणार याची निश्चिती नाही. अर्थात एरवी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या दबावामुळे मोकळेपणाने काम करता येत नाही, असे रडगाणे गाणाऱ्या महापालिकेवर दोन महिन्यांपासून कोणताही दबाव नाही. तरीही कामकाजात फरक पडल्याचे दिसत नाही. दैनंदिन आवश्यक कामकाज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रभावित झाले आहे.
शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्तेही सिमेंट काँक्रीटने बांधले जात आहेत. ही सुखावणारी बाब असली तरी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या साफसफाईचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहरातील मुख्य रस्ते वगळून अंतर्गत भागात कचऱ्यांचे ढीग पहायला मिळतात. काही ठिकाणी तर कित्येक दिवसांत नव्हे महिन्यांत कचरा उचलला गेलेला नाही. शहराच्या काही भागात तसेच लगतच्या नवीन वसाहतीत घंटागाड्या पोचत नाहीत. परिणामी लोक रस्त्यावर कचरा टाकू लागले आहेत. परिणामी दुर्गंधी आणि डासांच्या पैदाशीने लोकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. यातील अपवाद वगळता बहुतांश पुतळ्यांची योग्य निगा राखली जात नाही. परिणामी त्यावर धूळीचे थर साचलेले दिसून येतात. अर्थात प्रत्येक पुतळ्याजवळ पाणीपुरवठा नळांच्या माध्यमातून आहे; परंतु पुतळे धुतले जात नाहीत. गुर-ता-गद्दीचा समारोह 2008 मध्ये शहरात मोठ्या प्रमाणावर झाला. यानिमित्ताने विविध भागात सुंदर शिल्प उभारण्यात आले होते. यापैकी बहुतेक शिल्पांची दुरवस्था झाली आहे. रंग उडालेले, खपोरे गेलेले पुतळे विद्रुप दिसत आहेत. हिंगोलीगेट उड्डाणपुलाच्या शेजारी बसवलेला शांतीचा संदेश देणारा युवतीचा पुतळा तर गायबच झाला आहे. काही जागरुक व शहरप्रेमी नागरिक याबाबत सोशल मिडियावर फोटो शेअर करीत आहेत; परंतु महापालिकेला याबाबत सोयरसुतक नसल्याचे दिसते. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा मागील महिन्यात नांदेड शहरात येऊन गेली. त्यावेळी चालण्याच्या सरावासाठी जिल्ह्याचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काही ठराविक रस्त्यावरुन फिरले. तेवढेच रस्ते तात्पुरते साफ करण्यात आले. त्यानंतर 'येरे माझ्या मागल्या' अशी अवस्था आहे. महापालिकेच्या एकूणच कारभाराबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजीची भावना दिसून येते.

टिप्पण्या