हिरवा टहाळ, शेंगा, बोरं अन् पेरु
रानमेवा चाखू, चला थोडं शेतात फिरु
नांदेड ः महेश राजे : रबीची पेरणी होवून चार-पाच महिने झाले. भुईमुगाच्या शेंगा काढायलाही आल्या, हरभरा ऐन भरात आला, बोरीची झुडपं लगडलीत, पेरुच्या ओझ्याने फांद्या वाकल्यात. रसिक खवैय्यांना हुरडा पार्टीचे वेध लागलेत. या दिवसांत शेतकरी पुत्र असलेल्या पण नोकरीनिमित्त शहरवासी झालेल्या नवख्या पांढरपेश्यांची पावलं शेतशिवाराकडे वळताना दिसतात. 'आम्ही शेतकरीच बरं का', असा सांगावा पोचवणारी छायाचित्रं समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
"आज जाणावे वाटते
तिच्या अंतरीचे गुज
थोडी ऐकावी हळुच
निसर्गाची कुजबुज"
मराठी माणूस मग त्याच्याकडे शेती असो वा नसो, त्याचे निसर्ग, शेती प्रेम वादातीत. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला त्याला आवडते. पूर्वी बहुसंख्य शेतकरी शेतातच घर बांधून राहात असत. पण, शहरीकरण झपाट्याने होत गेले तसे माणसांची तऱ्हाही बदलली. पिढ्या दर पिढ्या शेतीच्या वाटण्या होत गेल्या, एक-दोन एकरावर भागेना म्हणून बहुसंख्य बळीराजांची पोरं शहरात मिळेल ती कामं करु लागली. एकेकाळचा मालक चाकर झाला. आणि ज्याने त्याला चाकरी दिली तो व्यापारासाठी आलेला परका इथला शेतमालक झाला. ऋण काढून सण साजरा करण्याची अनुवांशिक सद्गुण विकृती जमिनीच्या मुळावर उठली. बहुसंख्य भूमिपुत्रांच्या बाबतीत हेच घडले. ज्यांच्या वाडवडिलांना थोडंबहुत शहाणपण होतं, त्यांनी आपली मुलं शिकवली, ती नोकरीलाही लागली आणि त्या आधारावर त्यांची शेती टिकली.
व्यापारी, उद्योजकांनी घेतलेल्या शेतीत त्यांनी 'फार्म हाऊस'ची संकल्पना रुजवली; परंतु त्याला पारंपरिक आखाड्याची सर थोडीच येणार? 'फार्म हाऊस'मधील गॅसवरच्या 'ग्रीव्ही'ला चुलीवरच्या झणझणीत रश्श्याची सर कशी येणार? चुलीवर भाजलेल्या वांग्याचं भरीत, टाळकी किंवा पिवळ्याची भाकर, हिरव्या मिर्चीचा ठेचा, गाडग्यात विरजलेलं चक्का दही आणि मनगटाने दगडावर ठेचलेला कांदा, हजार वेळा 'पनीर बटर मसाला', 'पालक पनीर', 'मलई कोप्त्या'ला विकत घेईल. आहारावर भाजलेला टहाळ अन् हाॅटेलातील 'फिंगर चिप्स' याची बरोबरी होईल काय? हुरड्यासंग शेगदाण्याची चटणी हवी की पिझ्झा असं जुन्या पिढीतील कोणालाही विचारलं तर तो कशाला पसंती देईल? हरभऱ्याची कोवळीलस्स मिरच्या ठेचून केलेली भाजी असो वा कर्टुल्याची भाजी, याची बरोबरी मशरुम कशी करेल? पेरुची (जांब) भाजी 'फाईव्हस्टार'ला निश्चितच लाजवते.
वातावरणातील बदलामुळे यंदा थंडी नाही. अन्यथा या दिवसांत वनभोजनाची मज्जाच काही औरं. ज्या पांढरपेशी शेतकरी पुत्रांची गाव-शेतं जवळ आहेत, अशी मंडळी सुटीच्या दिवशी हमखास या दिवसांत रानमेवा चाखण्यासाठी शेतात जातात नव्हे, या दिवसांसाठी आपल्या हक्काच्या रजा राखून ठेवतात. जे शेतकरी पुत्र मराठी विषयाचे शिक्षक किंवा प्राध्यापक झाले आहेत, त्यांनी शेतीविषयी कथा-कविता, ललित किंवा स्फुट लिहिले नाही असा मनुष्य विरळाच.
शेतातील झाडांना लटकणारे सुगरणीचे खोपे पाहून....
"तिची उलुशीच चोच,
तेची हात तेची बोटं
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं"
या शब्दांत बहिणाई परिस्थितीपुढे हतबल झालेल्या माणसाचे कान टोचते. विठ्ठल वाघ यांची काया मातीत मातीत ही कविता गुणगुणतच 80-90 च्या दशकातील पिढी समृद्ध झाली. शेतकऱ्यांच्या काबाटकष्टाचं वर्णन...
"माती झाली पाटा,
देह मायीचा चंदन
संसारगाड्याच्या चाकाला
बा च्या घामाचं वंगण"
अशा आर्ततेने शंकर वाडेवालेच करु जाणोत. कालौघात कवितांचे आशय आणि भाषा बदलली. सुखासीन आयुष्यात अलंकारिक भाषेत निसर्ग कविता लिहिली जाऊ शकते. बालकवींनी ती अतिशय ताकदीने अमाप रचली. पावसाळा संपताना श्रावणाची चाहूल लागते आणि ओठांवर रुंजी घालू लागतात...
"श्रावणमासी हर्ष मनासी,
हिरवल दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे"
या ओळी. अशा कितीतरी कवींनी मराठी काव्यसृष्टी आपल्या प्रतिभेने अलंकृत केली आहे. सध्या मराठवाड्यातील शेती हरभरा अर्थात टहाळ, भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसं, तुरीच्या शेंगा तसेच बोरं, जांबे, अशा पिकांनी बहरली आहे. त्यात फिरुन निसर्गानंद घेताना अनेक हौशी मंडळी छायाचित्रं, सेल्फी या माध्यमातून समाज माध्यमांवर मिरवू लागली आहेत. एरवी 'जीभ घसरली', 'महाराष्ट्राचा अपमान', 'पलटवार', 'घणाघात', 'पन्नास खोके एकदम ओके', अशा किळसवाण्या गदारोळात हिरव्यागार शेतांतील बहारदार लेखकांचे ओल्या हुरड्यागत शब्दांचे फुलोरे मन प्रफुल्लित न करतील तरच नवल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा