येणारं वरीस धोक्याचं


येणारं वरीस धोक्याचं
-----
लोकांनी स्वतःहून सावधगिरी बाळगण्याची गरज
----
नांदेड ः चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. लक्षावधी लोकं कोरोनाने बाधित झाले असून कारमध्ये विलगीकरण करण्याची पाळी आली आहे. याचा उद्रेक पुन्हा एकदा जगभर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र शासन त्यादृष्टीने आवश्यक सूचना जारी करीत असले तरी लोकांनी स्वतःहून सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होते आहे. नवीन वर्ष यादृष्टीने धोक्याचे असल्याचे संकेत मिळत आहेत.
2020 आणि 2021 असे सलग दोन वर्ष जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला होता. अमेरिकेसारख्या अत्यंक प्रगत देशाचे कंबरडे यामुळे मोडले होते. त्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या प्रगतीशील देशांना तर जबर फटका बसला. कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लाॅकडाऊनमुळे असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या, छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले. शिक्षणाचा तर अक्षरशः खेळखंडोबा झाला. यातून आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर आली असताना पुन्हा एकदा जगावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले आहे.
मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने हैदोस घातल्याच्या बातम्या येत आहेत. विविध शहरांमध्ये संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात आले आहे. लक्षावधी लोक कोरोनाने बाधित झाले असून त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे तर कित्येकजण त्या पंथावर मार्गक्रमण करीत आहेत. भारतातही ज्यांच्या कुटुंबांत कोरोनाने बळी घेतले आहेत, त्यांच्या जखमा अजून ओल्या आहेत. त्यांचे झालेले नुकसान कधीही न भरुन येणारे आहे. या पार्श्वभूमीवर काही देशांतून येणाऱ्या विमानांवर भारतात प्रवेश करण्यावर कधीही निर्बंध लागू शकतात. केंद्र शासनानेही याबाबत काही निर्देश जारी केले आहेत.
दरम्यान, यातही राजकारण सुरु झाले असून राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सत्ताधारी भाजप घाबरल्याची टिका काँग्रेसकडून केली जात आहे. अर्थात या यात्रेमुळे काँग्रेसची यशस्वी घोडदौड सुरु असल्याचे देशभरात कुठेही दिसत नाही. तरीही प्रवक्ते शेखी मिरवत आहेत. त्यासाठी गुजरातेत मोदींनी केलेल्या रोड शोचे उदाहरण दिले जात आहे. परंतु त्यावेळी कोरोनाची तीव्रता नव्हती.त्यामुळे कालपर्यंत भारत जोडो यात्रेवरही निर्बंध लादण्यात आले नव्हते. अर्थात राजकारण गेलं चुलीत, पण सर्वसामान्य लोकांनी पुन्हा लाॅकडाऊनचे भयंकर संकट टाळण्यासाठी वैयक्तिक पातळीवर टोकाची काळजी घेणे गरजेचे आहे. 
दोन वर्षांच्या अंतरानंतर यंदा लगीनघाई दणक्यात सुरु आहे. श्रीमंत मंडळींचे विवाहसोहळे तर चर्चेचा विषय होत आहेत. तुफान गर्दी वधु-वरांना आशीर्वाद देण्यासाठी लोटू लागली आहे. आठवडे बाजारातही पाय ठेवायला जागा सापडत नाही. सर्वच गर्दीची ठिकाणं गर्दीने ओतप्रोत आहेत. माॅलमध्ये, सुपर मार्केटमध्ये ग्राहकांची लगबग दिसून येते. पण, कुठेही कोणीही मास्क वापरताना दिसत नाही. सॅनिटायझर हा शब्द तर लोक विसरुनच गेले आहेत. दरम्यान, येणारे संकट पाहता, याबाबतीत लोकांनी आतापासूनच सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टिप्पण्या