- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आधी नियोजन कौशल्य ः मग नांदेडकरांचे वात्सल्य ः अखेर श्रमसाफल्य
-----
अशोकराव चव्हाणांच्या संघटना बांधणीने राहूलबाबा सदगदीत
-----
नांदेड ः महेश राजे ः 'हीज मास्टर व्हाईस'च्या शब्दाबरहुकूम शेकडो कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करीत खा. राहूल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावीपणाने यशस्वी करुन दाखवली. अशोकरावांचे मायक्रो प्लॅनिंग, राजकीय वर्चस्व, यात्रा आणि सभेला नांदेडकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, यामुळे राहूल गांधी भारावून गेले. एकूणच नियोजनाबद्दल त्यांनी टीम अशोकरावांची तोंड भरुन स्तुती केली. त्यामुळे महिनाभर केलेल्या अथक श्रमांचे साफल्य झाल्याचे समाधान पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
कन्याकुमारीपासून निघालेली काँग्रेस नेते खा. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा मजल दरमजल करीत दि. 7 नोव्हेंबरला नांदेडात देगलूर येथे दाखल झाली. तत्पूर्वी महिनाभर अगोदरपासून टीम अशोकराव तयारीला लागली होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कोणतीही कसर न ठेवता अनुभवसिद्ध कौशल्याने बारीकसारीक बाबींची दक्षता घेण्यात आली होती. स्वतः अशोकराव नांदेडमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी स्वतः उपस्थित राहात यात्रेपूर्वी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दहा बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीला किमान हजारभर कार्यकर्ते उपस्थित होते. मूळ पक्षाची कार्यकारिणी व विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी यांना जबाबदाऱ्या वाटून देताना चौकट आखून देण्यात आली होती.
दि.7 रोजी राहूल गांधी देगलूर येते रात्री साडे नऊ नंतर दाखल झाले. लगोलग तेवढ्या उशीरा सभा झाली. त्याला देगलूर व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दररोज सकाळी सहा वाजता यात्रेला सुरवात होत असे. 13 किलोमीटरचे अंतर साधारण साडे तीन तासात कापल्यानंतर दुपारच्या विश्रांतीसाठी यात्रा विसावत असे. दुपारचे जेवण घेवून स्थानिक समाजातील विविध घटकांशी चर्चा व शिष्टमंडळाशी सल्लामसलत केल्यानंतर सायंकाळी चार वाजता यात्रेला पुन्हा प्रारंभ होई. साधारण 9 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर यात्रेचा पाडाव पडत असे.
'भारत जोडो'ला 'चार चाँद'
मुक्कामाच्या ठिकाणी छोटेखानी सभा घेत राहूल गांधी स्थानिक लोकांशी संवाद साधत त्यांची जीवनशैली व दैनंदिन आयुष्यातील अडचणी समजून घेत. यात्रेतील देगलूर व नांदेड येथील जाहीर सभांची मोठी व महत्त्वाची जबाबदारी अमरनाथ राजूरकर यांच्यावर होती. त्यांनी '100 परसेंट सक्सेस' हे आपले ट्रॅक रेकाँर्ड कायम ठेवत 'भारत जोडो'ला 'चार चाँद' लावले. नांदेडच्या पूर्वी आणि नंतरही यात्रेच्या एकूणच प्रवासात नांदेडसारखे सुक्ष्म नियोजन आणि पदयात्रा तसेच सभेला झालेली गर्दी क्वचितच कुठे झाली असावी. नांदेड येथे एकट्या नांदेड जिल्ह्याची सभा झाली. तर हिंगोली येथे लातूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेगाव येथे विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असे मिळून 20 जिल्ह्यांची एकत्रित सभा झाली.
अशोकरावांचे प्रभावी प्रास्ताविक
नांदेड येथे सदर यात्रा देगलूर, अटकळी, शंकरनगर, नायगाव, कृष्णूर, देगलूरनाका मार्गे नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी यात्रेत सुमारे 30 ते 40 हजार नांदेडकरांचा सहभाग होता. नवीन मोंढ्याच्या जाहीर सभेला तर लाखावर नांदेडकरांनी उपस्थिती लावत राहूल गांधी यांना आचंबित केले. मागील तीन दिवसांत ठिकठिकाणच्या लोकांशी साधलेल्या संवादाचे सार श्री गांधी यांच्या भाषणात उमटले. तत्पूर्वी प्रस्तावनेच्या स्वरुपात अशोकराव चव्हाण यांनी केलेले भाषण 'मास्टरपीस' ठरले. केंद्र व राज्य सरकारचे वाभाडे काढताना आपल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम देत त्यांनी प्रदेश काँग्रेसमधील अन्य नेत्यांपुढे आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी या पुस्तकाला नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षाही गाजली. तद्वतच अशोकरावांच्या या उत्स्फूर्त आणि जोशपूर्ण भाषणाचे वर्णन करता येईल.
सुप्रिया सुळे प्रभावीत
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. अशोकरावांचे नियोजन कौशल्य व जिल्ह्यावरची त्यांची पकड अनुभवताना ते देखील अवाक् झाले. सुप्रियाताईंनी तर मुंबईला परतल्यानंतर आपले पिताश्री ज्येष्ठ नेते श्री शरद पवार तसेच बंधू माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापुढे यात्रेचे आणि अशोकरावांच्या मायक्रोप्लॅनिंगचे गोडवे गायले. नंतर स्वतः अजितदादांनीच अमरनाथ राजूरकर यांना सभेच्या यशस्वीतेची पोचपावती दिली. यात्रेच्या नांदेडमधील प्रवास व मुक्कामाचे वैशिष्ट्य म्हणजे अमरनाथ राजूरकर यांच्या कल्पनेतून तीन कॅम्प उभारण्यात आले होते. पहिला कँम्प दस्तूरखुद्द राहूल गांधी यांचा होता. दुसरा यात्रेकरुंचा तर तिसरा स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांचा होता. तिन्ही ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती.
----
आकर्षण...
0 यात्रेला सुरुवात होताना सकाळच्या पदयात्रेत वासुदेव सहभागी झाले होते.
0 दिंड्यांनी यात्रेची शोभा वाढवली.
0 धनगर, आदिवासी बांधवांनी राहूलजींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
0 अर्धापूरनजिक मल्लखांब, कबड्डीचे जीवंत देखावे आकर्षित करीत होते.
0 यात्रेत एकप्रकारे महाराष्ट्र दर्शन घडवण्यात आले.
-----
अमरनाथ भरुन पावले
'अ' + 'अ' = यश, अर्थात अशोकराव अधिक अमरनाथ असे नांदेडमधील समिकरण सर्वश्रूत व सर्वज्ञात आहे. अशोकरावांनी 'ब्र' काढायला उशीर की काम झालेच, यात कोणाचेही दूमत नसते. कोणतीही निवडणूक असो वा जाहीर सभा अमरनाथ राजूरकर यांचे 'ट्रॅक रेकाॅर्ड' शंभर टक्के आहे. अशोकरावांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या रेषा पाहूनच त्यांचे मन अमरनाथ ओळखतात.
भारत जोडो यात्रेतही राजुरकरांनी आपल्यावरील विश्वास सिद्ध केला. देगलूर व नांदेड येथील जाहीर सभांना मिळालेला प्रतिसाद पाहून खुद्द राहूल गांधी बेहद खूष झाले. शंकरराव चव्हाण मेमोरियलला भेट दिल्यानंतर राहूल गांधी भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी चव्हाण कुटुंबियांचे राजकीय वर्चस्व त्यांनी खऱ्या अर्थाने ओळखल्याची जाणिव झाल्याचे मत अमरभाऊंनी व्यक्त केले. श्री राजूरकर हे बालपणापासूनच अशोकरावांबरोबर आहेत. त्यांनी यापूर्वी राजीव गांधी, सोनिया गांधी व आता राहूल गांधी अशा नेत्यांच्या सभांचे नेटके नियोजन केले आहे. यापूर्वीही राहूलजी नांदेडमध्ये आलेले आहेत. त्या आणि यावेळच्या भेटीत त्यांचे अनुभवविश्व प्रचंड समृद्ध झाल्याचे जाणवले, असेही राजूरकर म्हणाले. भारत जोडोच्या नांदेडमधील चार दिवसांच्या प्रवासात अमरभाऊंची भूमिका मध्यवर्ती राहिली. त्यांच्या परिश्रमाचे अशोकरावांनीही मनमुराद कौतूक केले. त्याचप्रमाणे डी.पी. सावंत, वसंतराव चव्हाण, आ.अंतापूरकर, सौ. मीनलताई खतगावकर आदी नेत्यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही अशोकरावांनी कौतूक केले.
------
नव्या पिढीचे लाँचिंग
खा. राहूल गांधी यांच्या या यात्रेत अशोकराव चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांचे राजकारणात अधिकृतरित्या पदार्पण झाले. श्रीजया व सुजया या दोघीही राहूलजींबरोबर यात्रेत चालत होत्या. त्यांच्यात विविध विषयांवर संवादही झाला. यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी अगोदरच राजकारणात बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेल्या आपली सून मिनलताई यांचेही काँग्रेसमध्ये लाँचिंग घडवून आणले. त्याचप्रमाणे नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी त्यांचा मुलगा रविंद्र यांना अधिकृतपणे राजकारणात यानिमित्ताने पुढे आणले. या अर्थाने उपरोक्त नेते मंडळींची पुढची पिढी राजकारणात भवितव्य आजमावणार आहे. त्याचा श्रीगणेशा जिल्हा परिषद निवडणुकांपासून होईल.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा