मद्याच्या धुंदीत देता येणार सरत्या वर्षाला निरोप


मद्याच्या धुंदीत देता येणार सरत्या वर्षाला निरोप
.... 
बार रात्रभर उघडे राहणार
... 
नांदेड ः मद्यशौकिनांचा आनंद द्विगुणित करणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सरत्या वर्षाची शेवटची रात्र चार यारांसोबत रंगीन करण्यासाची सोय उपलब्ध करुन देताना परमीटरुम, बार रात्रभर उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मागील कैक वर्षांपासून थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी शासन ठराविक अटी-शर्थींवर दारुची दुकानं रात्रभर उघडी ठेवण्यासाठी परवानगी देते, शिवाय या एका दिवसासाठी तात्पुरत्या स्वरुपात मद्य प्राशन करण्याचे परवानेही देण्यात येतात. त्यानुसार परमीटरुम, बार-रेस्टाॅरंट चालकांना आपली दुकानं रात्रभर उघडी ठेवता येतात. दरम्यान, मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट आ वासून उभे होते. त्यामुळे पहिले वर्ष लाॅकडाऊनमध्ये गेले तर दुसऱ्या वर्षी गर्दीवर निर्बंध होते. त्यामुळे तळीरामांसह प्रासंगिक मद्यशौकिनांच्या आनंदावर विरजण पडत होते. 
यंदाही वर्ष संपताना पुन्हा एकदा कोरोनाची तलवार टांगली गेली आहे. दररोज नवनव्या सूचना येत असून तळीरामांचा जीव टांगणीला लागला आहे. काही मंडळी सोशल मिडियावर अफवांचा बाजार भरवत लाॅकडाऊनची भीती घालत आहेत. प्रशासन आपल्यापरीने खुलासे करीत असले तरी त्याला खूप मर्यादा येताना दिसतात. थर्टी फर्स्टला आणखी पाच दिवसांचा अवधी असताना शासनाने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान हैदराबाद हाऊस येथून एक परिपत्रक जारी केले असून बार व हाॅटेल्स उत्तररात्रीपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार हाॅटेल व बार चालकांनी ग्राहकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु केली असून विविध स्कीम जाहीर करण्यात येत आहेत. नवीन वर्षाचे स्वागत दणक्यात करता यावे यासाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही हाॅटेलचालकांनी गार्डनमध्ये मोठ्या स्क्रीन लावण्याची तयारी केली आहे जेणे करुन टी.व्ही.वरील मनोरंजनपर कार्यक्रमांचा आनंद घेत रसिकांना मद्याचे ग्लास रिचवता यावेत. नांदेडसारख्या ठिकाणी ऑर्केस्ट्राॅ बार नाहीत. त्यामुळे टी.व्ही. शिवाय पर्यायही नाही.
मनोरंजनपर कार्यक्रमांसोबतच खवैय्यांचीही काळजी घेण्यात येत असून मांसाहारी शौकिनांसाठी असंख्य विशेष डिशेश उपलब्ध करुन देण्याची तयारी चालवण्यात आली आहे. शाकाहारी व्यंजनेही भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याचे अनेक हाॅटेलचालकांनी सांगितले. एरवी रात्री 11 वाजता बंद होणाऱ्या बारसाठी थर्टी फर्स्टसाठी ही मुदत सकाळी पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. परंतु सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी हाॅटेलमालकांवर सोपवण्यात आली असून पोलीस प्रशासनालाही आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या