वेलकम टू मॅरीड लाईफ, सिंघम'

'वेलकम टू मॅरीड लाईफ, सिंघम'
-----
आली रे आली आता तुझी बारी आली
----
नांदेड ः लग्नं न झालेले मित्र वैवाहिक मित्राची अक्षरशः टर उडवतात. 'जोरु का गुलाम' काय, 'बायकोचा पिलांटो' काय, 'बीवी का कुत्ता' काय, अशी असंख्य विशेषणं लावली जातात. जगाच्या पाठीवर कुठेही हीच स्थिती आहे. सध्या लग्नसराई दणक्यात सुरु आहे. आता सडण्याची वेळ आहे ती बोहल्यावर चढलेल्या वराची. 'वेलकम टू मॅरीड लाईफ' असे स्वागत करताना वराची मित्रमंडळी त्याला 'आली रे आली आता तुझी बारी आली', असा सावधगरीचा इशारा देताना दिसतात.
'जवानी के देहलीज पे', सर्वांनाच वाटते, आपलेही लग्नं व्हावे, सुंदर बायको मिळावी, मजा करावी; परंतु प्रत्यक्षात विवाह झाल्यावर अनेक बंधने येतात, पुढे मुल झाल्यावर आयुष्याशी झगडणं सुरु होतं. 'जाने कहाँ गए वो दिन', असा काहीसा जीव कासावीस होतो. 'बडा लुत्फ था जब कंवारे थे हम तुम', असा पश्चातापही होतो. बॅचलर मित्र मजा घेण्याचा क्षणही सोडत नाही. रविवारची सुट्टी एंजाॅय करताना कारमध्ये मोठ्याने टेपरेकाॅर्डवर 'जहां चार यार मिल जाए', हे गाणं हटकून ऐकवलं जातं. आता तर व्हिडीओ काॅलिंगची सुविधा झाली आहे. त्यामुळे 'जय जय शिवशंकर'चा डान्स दाखवून मित्राला खिजवलं जातं. वैवाहिक मित्र बिच्चारा यावेळी घराची साफसफाई करीत असतो, झाडांना पाणी घालत असतो आणि मनातल्या मनात जळफळत असतो. महामायेसमोर राग व्यक्त करण्याचीही सोय नसते.
सुट्टीच्या दिवशी हमखास सगे-सोयरे, सासू-सासरे, मेहुणे येतात. त्यांच्या सरबराईतच वेळ जातो. हे दुःख हलकं करण्यासाठी मग राजेश खन्ना 'चारों धाम घरवाली है' म्हणत धावून येतो. काही जणांच्या बायका तर एतिशय कजाग असतात. नवऱ्याला मुठीत ठेवण्यासाठी ना ना क्लृप्त्या लढवतात. या अग्नीपरीक्षेला तोंड देवून ऑफिसात जावे तर तिथे बाॅस खडूस. छळ करण्याची एकही संधी सोडत नाही. 'साहिब, बीवी और गुलाम'चे हे वास्तव दुर्मिळ नाही. अगदी 'ही मॅन' म्हणवणारा धर्मेंद्रही 'जमाना तो है नौकर बीवी का', म्हणत लाळ घोटताना दिसतो. बायको दिसायला, वागायला कशी का सेना, पण नवरा मित्रांमध्ये तिच्या कौतुकाचे पुल बांधतो. अशा उसणे अवसान आणणाऱ्या नवऱ्याची मजा मग ज्युनिअर महमूद 'अपनी अपनी बीवी पे सबको गुरुर है, जैसी भी है बिवी शौहर के लिए हूर है', अशा प्रकारे घेतो.
सध्या लग्नसराईत आजवर मनमौजी ऐश केलेला मित्र बोहल्यावर चढलेला आहे. त्याने आजवर अनेक वैवाहिक मित्रांची मजा घेतलेली आहे. बायकोवरुन अनेक ज्योक्स ऐकवले आहेत. आता त्याची बारी आली आहे. मुंडावळ्या बांधलेल्या या मित्राला भूतकाळाची आठवण करुन देताना भविष्यात होणाऱ्या दैनेची कल्पना देतो. 'मैं कल भी शेर था, आजभी शेर हूं, फर्क इतना हैं के आजके शेर पे माँ दूर्गा बैठी है'. आता नवऱ्या मुलाला 'शुभ मंगल सावधान' या शब्दाचा अर्थ कळतो. मित्रमेळा मात्र 'वेलकम टू मॅरीड लाईफ सिंघम' म्हणत 'आली रे आली आता तुझी बारी आली', अशी काव्यात्मक मजा घेतो.

टिप्पण्या