चव्हाण-देशमुख कुटुंबियांत जिव्हाळाच

चव्हाण-देशमुख कुटुंबियांत जिव्हाळाच
----
अशोकरावांकडून अभिनेता रितेश यांचे अभिष्टचिंतन
----
नांदेड ः मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आ. अशोकराव चव्हाण यांनी जाहीर अभिष्टचिंतन केले आहे. यातून चव्हाण व देशमुख कुटुंबियांत जिव्हाळा कायम असल्याचा संदेश मिळतो. दरम्यान, राहूल गांधी यांच्या 'भारत जो़डो' यात्रेच्या पार्श्वभूमीवर काही प्रसिद्धी माध्यमातून या दोन कुटुंबात दुरावा असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी आ. अमित देशुख यांनी जाहीरपणे त्याचे खंडण करीत खुलासा केला होता.
नांदेड व लातूर हे दोन सख्खे शेजारी जिल्हे. स्वातंत्र्योत्तर काळात नांदेडचे नेतृत्त्व (कै) शंकररावजी चव्हाण यांनी केले तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवत (कै.) विलासराव देशमुख लातूर जिल्ह्याचे नेते झाले. बाभळगावच्या देशमुख कुटुंबाचे कुलदैवत माळेगावचा खंडोबा हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात येते. यामाध्यमातूनही या दोन कुटुंबांत जिव्हाळा आहे. दरम्यान, 2008 मध्ये मुंबईत बाँम्बस्फोट झाल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना पायउतार व्हावे लागले. त्यावेळी अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. पित्यानंतर पुत्रानेही मुख्यमंत्रिपद भूषवावे हे राज्याच्या राजकारणातील एकमेव उदाहण होय.
दरम्यान, अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच नांदेडला महसूल विभागीय आयुक्तालय मंजूर करुन टाकले. वास्तविक हे आयुक्तालय लातूर येथे स्थापन करण्याचा विलासरावजींचा मनसुबा होता. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली होती. परंतु अशोकरावांच्या या धडाकेबाज निर्णयाने नांदेडकर व लातुरकरांमध्ये दुराव्याची ठिणगी पडली.यातूनच पुढे आदर्श प्रकरण पुढे येऊन अशोकरावांना राजीनामा द्यावा लागला, अशी पार्श्वभूमी आहे. पण, नंतर एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त विलासराव देशमुख नांदेड येथे आले असता, त्यांनी अशोकरावांच्या निवासस्थानी भेट देत मनोमिलन झाले. परंतु त्यानंतरही आकस्मिक घडणाऱ्या घटनांचा दाखला देत या कुटुंबातील दुही जनमानसात कायम करण्याचा प्रयत्न विघ्नसंतोष्यांकडून झाला.
मागील महिन्यात खा. राहूल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा मराठवाड्यात येऊन गेली. त्यावेळी नांदेडची जबाबदारी अशोकराव चव्हाण यांच्यावर होती तर हिंगोलीची जबाबदारी आ. अमित देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली. पण, या दौऱ्याच्या कवित्वात पुन्हा एकदा चव्हाण-देशमुख कुटुंबियांत मतभेद कायम असल्याचे काही माध्यमांतून प्रसिद्ध झाले. त्यानंतर लगेचच आ. अमित देशमुख यांनी समाजमाध्यमावर सविस्तर पोस्ट करीत उपरोक्त वृत्त तथ्यहीन असल्याचे स्पष्ट करीत दोन्ही कुटुंबात जिव्हाळा, प्रेम पूर्वीप्रमाणेच कायम असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काल अभिनेता रितेश देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आ अशोकराव चव्हाण यांनी नागपुरातून त्यांचे अभिष्टचिंतन केले.
-----
मोहनअण्णांकडूनही शुभेच्छा
नांदेड दक्षिणचे कर्तव्यतत्पर आमदार मोहनअण्णा हंबर्डे हे देखील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर येथे आहेत. त्यांनीही अभिनेता रितेश देशमुख यांचे समाजमाध्यमावर सहछायाचित्र प्रसिद्ध करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या