खामोश... न्यायालये रमणार सलग सुट्यांत

खामोश... न्यायालये रमणार सलग सुट्यांत
----
नवीन वर्षांत दीर्घकालीन सुट्यांची माळ
---
नांदेड ः महेश राजे ः काॅलेजियमवरुन सध्या केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयांत चांगलीच जुंपली आहे.सर्वसामान्य लोकांतील भांडणतंटे सुद्धा स्थानिक न्यायालयाची हद्द ओलांडून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचू लागली आहेत. या परिस्थितीत न्यायालये अधिक कार्यतत्पर असणे आवश्यकअसताना दीर्घकालीन सुट्यांनी प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत चालली आहे. नवीन वर्षात तब्बल 89 दिवस दीर्घकालीन सुट्या असून अन्य सण, राष्ट्रीय सण तसेच किरकोळ सार्वजनिक सुट्या वेगळ्याच.
 सर्वोच्च न्यायालयातील सर न्यायाधीश तसेच अन्य चार ज्येष्ठ न्यायाधीश यांच्या पाच सदस्यीय निवड मंडळाला काॅलेजियम म्हणून ओळखले जाते. या मंडळामार्फत इतर न्यायाधिशांच्या नेणुका व बदल्या केल्या जातात. दरम्यान,न्यायाधीशांची नेमणूक करताना त्यात कायदे मंडळाचा सहभाग असावा आणि निवडणूक पारदर्शी व्हावी, हा केंद्र सरकारचा आग्रह तर असा हस्तक्षेप सुरु झाल्यास सरकार नेमणुका निपक्षपाती करणार नाही, अशी न्याययंत्रणेची भूमिका, यावरुन सध्या केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयात खडाजंगी सुरु आहे. या वादात आता न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्यांची भर पडली आहे. हा विषय कायदा मंत्र्यांनी मागील आठवड्यात राज्यसभेत उपस्थित केला आणि लगोलग सर्वोच्च न्यायालयाने ख्रिसमस निमित्त दोन आठवडे कामकाज बंद राहील, अशी घोषणा केली. 
सर्वोच्च न्यायालयांना ज्या आणि जेवढ्या सुट्या असतात कमी-जास्त तेवढ्याच आणि त्याच सुट्या उच्च व अन्य न्यायालयांनाही असतात. एकीकडे प्रलबित प्रकरणांची संख्या आणि सुट्यांचे प्रमाण यातील विरोधाभास आता चर्चेचा विषय ठरला आहे. वकिलांच्या एका व्हाॅट्सअॅप ग्रुपवर एका माजी न्यायधिशानेच याबाबत खंत व्यक्त करणारी पोस्ट टाकली आहे. 'सर्वोच्च न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्या बघा आणि कृपया शांत राहा', अशा शब्दांत ही नाराजी व्हायरल झाली आहे. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे होळी. या दिवशी इतर घटकांना एकच दिवस सुटी असते; परंतु सर्वोच्च न्यायालय दि. 5 ते 12 मार्च असे आठ दिवस बंद राहणार आहे. दि. 30 मार्च रोजी गुरुवारी रामनवमी आहे. तर देशाच्या काही भागात सोमवारी दि. 3 एप्रिल तर काही भागात दि. 4 एप्रिल रोजी महावीर जयंती आहे. चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते; पण शुक्रवारी कोणतीही सुटी नसताना स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. अर्थात सहा दिवस सुटी असेल.
एरवी सर्वांना दसऱ्याची एकच दिवस सुटी असते; परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्वतःसाठी दि. 22 ते 29 ऑक्टोबर अशी चक्क आठ दिवस सुटी घेतली आहे. नवीन वर्षात दि. 24 रोजी दसरा आहे. दिवाळीही दणक्यात साजरी होणार असून रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) लक्ष्मीपुजनापासून ते पुढील रविवारपर्यंत आठ दिवस न्यायालय बंद असेल. दिवाळी साजरी झाल्यानंतर ख्रिसमसने काय घोडे मारले. म्हणून दि. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस असताना दि. 17 डिसेंबरपासून दि. 1 जानेवारीपर्यंत 12 दिवस सर्वोच्च न्यायालय रजेवर असेल. असे सर्वधर्मिय सण सलग सुट्या घेतल्यानंतर उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी दि. 21 मे ते थेट दि. 2 जुलैपर्यंत तब्बल 47 दिवस सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे सर्व मिळून दीर्घकालीन सुट्यांची संख्या 89 दिवस होते. याशिवाय अन्य सण, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, ईद आणि अन्य किरकोळ सुट्या वेगळ्याच.
---
मागील पाच वर्षांतील प्रलंबित प्रकरणे
जानेवारी 2018 - 55,588
जानेवारी 2019 - 57,349
जानेवारी 2020 - 59,859 
जानेवारी 2021 - 65,086
जानेवारी 2022 - 70,239

टिप्पण्या