ना वंचित, ना किंचित, ना संकुचित अन् ना ही निश्चिंत


ना वंचित, ना किंचित, ना संकुचित अन् ना ही निश्चिंत
----
'क्या करे क्या ना करे' मनस्थितीत अशोकराव विवंचित
----
नांदेड ः महेश राजे ः मोठी राजकिय पार्श्वभूमी असल्यामुळे अशोकराव 'वंचित' नाहीत तर चांगलेच प्रस्थापित आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, न.पा., ग्रा.पं. असे सर्वत्र त्यांचेच वर्चस्व असल्याने ते 'किंचित'ही नाहीत तर चांगलेच संचित बाळगून आहेत. ते 'संकुचित'ही नाहीत तर प्रत्येक जाती-धर्माला ते उचित संधी देतात. तरीही ते निश्चिंतही नाहीत. कारण राज्यातील राजकीय परिस्थिती प्रचंड दोलायमान आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या गुटुरगुंमुळे महाविकास आघाडीची नैया हेलकावे खावू लागली आहे. या परिस्थितीत लोकनिष्ठ राहावे की पक्षनिष्ठ या विवंचनेत ते सापडले आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पक्षांतराच्या बातम्या अधुनमधून येतच असतात. विविध मुलाखतीतही हा प्रश्न त्यांना विचारला जातो. ते पक्षात नाराज आहेत, हे दाखवण्यासाठी काही शंकास्पद योगायोगांचे दाखले दिले जातात तर काही घटनांचा निव्वळ बादरायण संबंध जोडला जातो. त्यांनी या चर्चेचा वारंवार इन्कार केला आहे; परंतु काही केल्या हा वेताळ त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटतच नाहीत, अशी तक्रार सर्वप्रथम अशोकराव चव्हाण यांनीच केली होती. त्यानंतर शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळीही ते गैरहजर होते. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा यांच्यातील समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या निवसस्थानी गणेशोेत्सवात ते दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी उपमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखिल तिथे पोचले. अशा प्रत्येकवेळी अशोकरावांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली गेली.
दरम्यान, अशोकराव चव्हाण यांच्या खास विश्वासातील राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अशोकरावांच्या कलाने वागणारे असा ठपका असलेले खा. हेमंत पाटील, आ. बालाजीराव कल्याणकर यांनीही एकनाथ शिंदे यांची साथ धरली. अशा काही राजकीय उलथापालथीही श्री चव्हाण यांच्याबाबतीत शंका दाट करणाऱ्या ठरल्या. या सर्वांपेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांचे स्वतःचे राजकीय व नांदेडचे विकासविषयक भवितव्य. केंद्र व राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता, काँग्रेसला 'अच्छे दिन' बरेच दूर आहेत. तेव्हा कदाचित अशोकराव राजकीय क्षितीजावरुन मावळलेले असतील. शिवाय अशोकरावांची कन्या श्रीजया राजकारणाचे दार ठाठोवात आहे. भोकर किंवा नांदेड उत्तर मधून ती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. तिची सुरवात विरोधी बाकावरुन व्हावी का, असाही प्रश्न अशोकरावांपुढे असेल. तसेच नांदेडच्या विकासाचा विचार केल्यास अशोकराव चव्हाण सत्ताधारी पक्षात असणे आवश्यक आहे. कारण नांदेडचे भौगोलिक स्थान. येथे निधी खेचून आणावा लागतो. त्यामुळे ज्या नेतृत्वाचा राज्याच्या  राजकारणात दबदबा आहे त्यालाच हे शक्य आहे. याची जाणिव स्वतः अशोकरावांना असावी.
वरील प्रमाणे राजकीय चित्र सरळ साधे वाटत असले तरी आतून ते बरेच गुंतागुंतीचे आहे. अशोकरावांचा मतदार सर्वपक्षीय आहे. स्वतः अशोकराव रिंगणात असतील तर त्यांना अगदी भाजपच्या पारंपरिक मतदारांचेही मतदान होते. तसेच महानगर पालिकेतही लोक पक्षिय भूमिका विसरुन केवळ अशोकरावांच्या सादेला प्रतिसाद देतात; परंतु हे औदार्य उजवे मतदारच दाखवतात. यदाकदाचित प्राप्त परिस्थितीत अशोकरावांनी वेगळी वाट चोखाळली तर डावे मतदार त्यांच्या बाजुने येणार नाहीत. अल्पसंख्याक तर मासल्याला सुद्धा राहतील की नाही याची शाश्वती नाही;परंतु या निमित्ताने हैदराबादच्या ;एमआयएम'ला मोकळे रान मिळेल. अलिकडे भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखरराव देखील नांदेडमध्ये पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच अशोकरावांबरोबरच्या गोतावळ्याला भाजपा कसे आणि कुठे सामावूून घेणार हा देखील प्रश्न आहे. या परिस्थितीत 'क्या करे क्या ना करे', अशी अशोकरावांची अवस्था झाल्याचे दिसते.

टिप्पण्या