केसीआर'च्या 'बीएसआर'ची जोरदार चर्चा, पण...
-----
लोकाश्रय तपासण्याासाठी स्थानिक संस्था निवडणुका ठरणार 'लिटमस टेस्ट'
-----l
नांदेड ः महेश राजे ः एकीकडे भाजपाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यासाठी प्रयत्नशील राहात मनाच्या एका कोपऱ्यात ते मृगजळ ठरु शकते, अशी खुणगाठ बांधत तेलंगणाचे मुख्यमंत्री दिग्वीजयाला निघाले आहेत. त्याची सुरवात उद्या रविवारी नांदेड येथून जाहीर सभेद्वारे होणार आहे. या पक्षाच्या आगमनाची जोरदार चर्चा सुरु असली तरी त्याला किती मतदाराश्रय मिळतो, हे पाहण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लिटमस टेस्ट ठरतील.
2014 मध्ये आंध्रप्रदेशातून स्वतंत्र होत तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून कल्वकुंतला चंद्रशेखर राव उपाख्य केसीआर या राज्याचे मुुख्यमंत्री आहेत. भाजपाने संपूर्ण ताकद लावूनही दुसऱ्या टर्ममध्येही त्यांनीच बाजी मारली. शेतकऱ्यांसह महिला व समाजातील इतर घटकांसाठी त्यांनी ज्या योजना राबवल्या त्यामुळे ते तेलंगणात कमालीचे लोकप्रिय आहेत. याच शिदोरीवर ते आता राष्ट्रीय राजकारणात नशिब आजमावण्यासाठी निघाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून रोल माॅडेल बनलेल्या नरेंद्र दामोदरदास मोदी यांना ज्या प्रमाणे देेशवासियांनी स्वीकारले. तद्वत तेलंगणाच्या विकासाचे रोल माॅडेल दाखवत केसीआर देखील पंतप्रधान पदाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगून आहेत.
देशभरात अनेक राज्यातील प्रभावशाली प्रादेशीक नेतृत्व पंतप्रधान पदाची स्वप्नं पाहात आहेत. त्यात महाराष्ट्रातील जाणते नेते शरद पवार यांचे नाव आघाडीवर होते, परंतु त्यांनीच या स्पर्धेतूून नंतर माघार घेतली. त्यांच्याशिवाय अलिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव खा. संजय राऊत यांनी पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. उत्तरप्रदेशाात अखिलेश यादव तर बिहारमध्ये नितीशकुमार अशीच स्वप्नं पाहतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचीही नावं समोर येत असतात. दरम्यान, काँग्रेसने खा. राहूल गांधी यांचे नाव जाहीरही करुन टाकले आहे. त्यांनी 'भारत जोडो' यात्रेच्या माध्यमातून बऱ्यापैकी चर्चा घडवून आणली आहे.
उपरोक्त पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचे प्रत्यक्षात येणे शक्य दिसत नाही. त्यामुळेच की काय, चंद्रशेखर राव यांनी 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली आहे. स्वतःच्या तेलंगणा राष्ट्र समितीला व्यापक स्वरुप देत त्यांनी भारत राष्ट्र समिती हे नामाभिधान धारण केले आहे. हैदराबादच्याच एम.आय.एम. या पक्षाने काही वर्षांपूर्वी नांदेडमधून चंचूप्रवेश केला होता. पुढे ओवेसी देशभराच्या निवडणुका लढत फिरले; परंतु केठीही त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात मात्र या पक्षाचे दोन आणदार आणि एक खासदार आहे. नांदेड महापालिका व काही नगरपालिकांतही या पक्षाचे सदस्य आहेत. नांदेड जिल्ह्यावर माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. लोकांना परिवर्तन नको, असे नाही;परंतु पर्याय नाही म्हणून मतदार हतबल आहेत..
या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीचा प्रयोग कसा रंगतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. केसीआर यांचा डोळा लोकसभा निवडणुकीवर असला तरी तत्पूर्वी होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद , नगरपालिका या निवडणुकाही हा पक्ष अतिशय गांभिर्याने लढवणार असल्याचे सांगण्यात येते. पक्षाचा श्री गणेशा जोरदार व्हावा यासाठी मागील दोन महिन्यांपासूून टीम बीआरएस नांदेडमध्ये ठाण मांडून आहे. या पक्षाची पथकं तालुके पिंजून काढत आहेत. सभेच्या यशस्वीतेसाठी स्वतंत्र टीम अहोरात्र प्रयत्नशील आहे. हा पक्ष शहरी भागासाठी नवखा असला तरी ग्रामीण सीमावर्ती भागात तो बऱ्यापैकी आकर्षणाचा विषय दिसून येतो.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोलील, धर्माबाद, किनवट आणि माहूर हे तालुके तेलंगणाच्या सीमेला लागून आहेत. या परिसराचा तेलंगणाशी रोटी-बेटी व्यवहारही आहे. अनेक मराठी जऩांच्या शेतजमिनी तेलंगणात तर तेथील काही जणांच्या जमिनी महाराष्ट्रात आहेत. केसीआर यांनी तेलंगणात शेतकरी, महिला व अन्य समाजघटकांसाठी अनेक आकर्षक व समाजोपयोगी धोरणं राबविली आहेत. त्यात प्रतिएकर 12 हजार रुपये, ट्रॅक्टरसाठी 70 टक्के अनुदान, शेतीसाठी वीजबील मोफत, शेतातून माल बाजारात नेण्याची व्यवस्था, आरोग्यासाठीही अनेक आर्थिक खर्चाच्या योजना लोकांसाठी फायदेशीर ठरत आहेत. रेशनवरील धान्य, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच्या सोयी याबाबतही सीमावर्ती भागात चांगल्या चर्चा आहेत. त्यामुळेच काही गावांनी आम्हाला तेलंगणात समाविष्ट करावी, अशी मागणी वारंवार केलेली आहे.
महाराष्ट्र शासन मागील 75 वर्षात सीमावर्ती भागात पोहोचू शकले नाही. अजूनही या भागात रस्ते, पाणी, वीज अशा समस्या गंभीर आहेत. तेलंगणातील शेवटचे गाव जे महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे, तिथपर्यंत सर्व सुविधा आहेत. परंतु पुढे प्रचंड मागास परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांत कमालीची नाराजी आहे. कर्नाटक सीमेवरही अशीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते.
-----
स्वराज्यची भूमिका महत्वाची
अलिकडेच स्थापन झालेल्या आणि छत्रपती युवराज संभाजी राजे सर्वेसर्वा असलेल्या स्वराज्य पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. श्री संभाजी राजे यांनी नुकतीच केसीआर यांची भेट घेतली होती. त्यात बराच वेळ महाराष्ट्र व देशाच्या राजकारणावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संभाजी महाराज आणि चंद्रशेखरराव एकत्र येतील काय, असाही मुुद्दा उपस्थित होतो आहे.
----
तेलगू भाषकांची संख्या मोठी
सीमावर्ती भागासह नांदेड शहरातही तेलगू भाषकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नांदेड शहरात 20 हजाराच्यावर मतदार आहेत. यापैकी बहुतांश मतदार काँग्रेसशी जोडले गेले आहेत. परंतु ग्रामीण भागात संमिश्र चित्र आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भारत राष्ट्र समितीने ओपनिंग चांगली केल्यास नवल वाटायला नको, असाही मतप्रवाह आहे.
----
बाभळी, लेंडीचे काय
महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्रप्रदेश आणि आताच्या तेलंगणा या राज्यात बाभळी आणि लेंडी हे दोन मोठे सिंचन प्रकल्प परस्पर समभागातून होत आहेत. अनेक वर्षांपासूून लेंडी प्रकल्प रखडला असून त्यासाठी तेलंगणाची नकारात्मक व आडमुठी भूमिका कारणीभूत असल्याचे मानले जाते. तर बाभळी बंधाऱ्याला तेलंगणाने सुरुवातीपासूनच हरकत घेतलेली आहे. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री चेंद्राबाबू नायडू यांनी आकाशपाताळ एक केले होते. त्यांना बाभळी परिसरात अटकही करण्यात आली होती. या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवर के. चंद्रशेखर राव यांना भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
---
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा