कमल'च्या भेटीला 'कमळ'

'कमल'च्या भेटीला 'कमळ'
-----
शिक्षण महर्षिंकडून कर्मयोग्याचा सत्कार
----
महेश राजे
नांदेड ः दोन वेगवेगळ्या पक्षात असले तरी दोघेही देशाचे जाणते नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सुह्रद. दोघेही पक्षातीत नाते जपणारे, दोघेही विकासाभिमुख, दोघेही स्पष्टवक्ते. या दोघांची मैत्री तब्बल साडे तीन दशकांपासूनची. आज ना.गडकरी स्वारातीम विद्यापीठाची डी.लिट स्वीकारण्यासाठी नांदेडात येत आहेत. हे औचित्य साधत माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांनी जुन्या मित्राला गृहभेटीचे हार्दिक निमंत्रण दिले आणि गडकरींनी देखिल ते मनपूर्वक स्वीकारले.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कमलकिशोर कदम हे काँग्रेसमध्ये होते. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून ते निवडून आले होते. तर त्यावेळी नितीन गडकरी हे विधान परिषदेचे सदस्य होते. दोघेही विकासप्रेमी असल्याने त्यांचे निकोप मैत्र लवकर जुळले. तेव्हापासून त्यांची मैत्री अबाधित आहे. प्रचंड कार्यकुशल म्हणून ख्यातकिर्त झालेल्या नितीन गडकरी यांचे कमलबाबू हे नेहमीच प्रशंसक राहिले आहेत. अन्य नेत्यांप्रमाणे त्यांनीही वेळोवेळी गडकरींच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. 
शरद पवार आणि नितीन गडकरी यांची मैत्री सर्वश्रूत आहे. पवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात नितीनजींचे भाषण खूप लोकप्रिय झाले होते. श्री पवार यांचाही गडकरी यांच्यावर ते जरी भाजपमध्ये असले तरी गाढा विश्वास. त्यातूनच 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा जो तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत गडकरी मुख्यमंत्री तर आम्ही सहभागी आणि जर फडणवीस मुख्यमंत्री तर आम्ही नाही, अशी भूमिका घेतली होती. 
गडकरी जेव्हा 1995 मध्ये युती शासनात सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि 55 उड्डाणपुलांची निर्मिती केली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना रोडकरी ही उपाधी दिली होती. शरद पवार यांनीही गडकरी यांच्या कामाचे खुल्या दिलाने कौतूक केले होते. मागील आठ वर्षांपासून गडकरी हे मोदी मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्याचे मंत्री राहिले. सध्या त्यांच्याकडे रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचा कारभार आहे. या  कालावधीत त्यांनी देशभर रस्त्यांचे प्रचंड असे जाळे विणले. महाराष्ट्रात स्वाभाविकच त्यांनी मोठा निधी दिला.
शरद पवार असोत वा अजितदादा किंवा सुप्रियााताई आदींनी जेव्हा जेव्हा गडकरींकडे ज्या कामांची मागणी केली, ती गडकरी यांनी तात्काळ पूर्ण केली. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गडकरींची ओळख आहे.या पार्श्वभूमीवर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने श्री गडकरी यांना डी.लिट ही पदवी जाहीर केली असून आज गुरुवारी त्यांना ती समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गडकरी नांदेडला येत असून दुपारनंतर ते कमलकिशोर कदम यांच्या भाग्यनगरस्थित निवासस्थानी भेट देणार आहेत.
गडकरी यांच्या सन्मानाचे औचित्य साधत कमलबाबू गडकरी यांचा स्वगृही कुटुंबिय आणि मोजक्या सुह्रदांच्या उपस्थितीत गडकरींचा गौरव करतील, अशी माहिती एमजीएमच्या संचालिका डाॅ. गीता लाठकर यांनी उद्याचा मराठवाडाशी बोलताना दिली. कमलबाबूंचे उच्च शिक्षण क्षेत्रात प्रचंड काम आहे. नांदेड येथे अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय, नवी मुंबई व उत्तरप्रदेशातील नोएडा येथेही महाविद्यालयांची स्थापना त्यांनी केली. या माध्यमातूून कित्येक पिढ्या घडल्या आहेत. कोरोनाच्या काळात एमजीएमच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने रुग्णांची प्रचंड सेवा केली. त्याची शासनस्तरावरुन दखल घेतली नसली तरी कमलबाबूंच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात गतवर्षी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ही बाब ठळकपणे अधोरेखित केली होती.

टिप्पण्या