- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
छळग्रस्त पाकिस्तानी सासरवाशिणीची अखेर सुटका
----
प्रयत्नांना यश ः आता प्रश्न चरितार्थ, पुनर्वसनाचा
----
नांदेड ः महेश राजे
तब्बल 35 वर्षांपूर्वी विवाह होऊन पाकिस्तानात गेलेल्या येथील युवतीचा तिथे अतोनात शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. माहेराहून पैसे तसेच वस्तुंची मागणी, अन्य क्षुल्लक कारणावरुन सतत होणाऱ्या बेदम मारहाणीला कंटाळल्यानंतर माहेरच्या लोकांनी तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या मदतीने सासरवाशिणीची अखेर सुटका झाली असून सदर महिला नांदेडला परतली आहे. आता महिलेचा चरितार्थ आणि पुनर्वसनाचा प्रश्न शिल्लक आहे.
मूळ भोकर तालुक्यातील तत्कालीन युवती सलमाबानो हिचा विवाह पाकिस्तानातील कराचीस्थित म.कलीम याच्यासोबत झाला होता. कलीम हा नात्यातीलच असल्याने हा योग जुळून आला होता. सलमाबानोचे वडील अ. रज्जाक जे की, आज 85 वर्षांचे आहेत. त्यांचा छोटेखानी व्यवसाय होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच, सलमाबानो 1983 मध्ये सुखी संसाराचे स्वप्न बाळगत कराचीला गेली खरी;परंतु तिथे स्थिरस्थावर होण्यापूर्वीच तिचा स्वप्नभंग झाला. वास्तविक लग्न हा मुलींच्या जीवनातील अतिशय नाजूक धागा. स्वतःचा घर-परिवार, भोवताल सोडून अगदीच परक्या माणसांत, परक्या जागेत जायचे. तिथे जुळवून घ्यायचे, सगळेच अवघड. इथे तर सलमाबानो चक्क दुसऱ्या देशातच गेलेली. पाकिस्तानचे लोक भारताला 'दुष्मन मुल्क' मानतात. येणे-जाणेही सोपे नाही. त्यामुळे सलमाबानोला माहेरच परके झाले.
सलमाबानोच्या संसाराची वेल फुलणे तर सोडाच उलट आयुष्यवेलच कोमेजू लागली. नवरा व सासरचे लोक पैसे व महागड्या वस्तुंची मागणी करु लागले. छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्रास देवू लागले. मातृत्व हा प्रत्येक स्त्रीचा दैवी दागिणा व निसर्गदत्त अधिकार, प्रत्येक विवाहित स्त्री आई होण्यासाठी आसुसलेली असते; परंतु समलमाबानोचा तो हक्कही निसर्गाने हिरावला. परक्या मुलखात एक बेसहारा अभागीने कसे जगावे? सतत होणाऱ्या सासरवासाला सलमाबानो अक्षरशः वैतागली होती. तिने माहेरी परत येण्याचा निर्णय घेतला. आई-वडील व भावानेही आपल्यापरीने प्रयत्न चालविले;परंतु पाकिस्तानात सर्वच कायदे उलटे. घटस्फोटाची प्रक्रिया अत्यंत किचकट. दोन वेगवेळ्या तेही दुश्मन देशाशी निगडीत असल्याने प्रकरण वरिष्ठ स्तरापर्यंत पोचले.
अनेक वर्ष कागदी घोडे नाचवण्यात गेले. तिकडे सलमाबानो तीळतीळ मरत होती.
अखेर 2014 मध्ये सलमाबानो केवळ पासपोर्ट घेवून परत आली. घटस्फोटास नकार मिळत असल्याने भारताचे नागरिकत्व मिळणे अवघड जात होते. त्यामुळे भारतीय कागदपत्रं, जुना पासपोर्ट व अन्य शैक्षणिक व शासकिय कागदपत्रंही सासरीच राहून गेले. घटस्फोटच नाही तर पोटगीचाही प्रश्न येत नाही. भारतात (नांदेड) परतल्यानंतर सलमाबानोच्या आई-वडील व भावाने भारतीय नागरिकत्वासाठी प्रयत्न चालविले;परंतु पाकिस्तानी दुतावास अजिबात सहकार्य करत नव्हता.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जातीने लक्ष घालत सलमाबानोला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश यायला सुरवात झाली. पाकिस्तानच्या कौन्सलर सर्विसेस हायकमिशनने रितसर ना हरकत प्रणाणपत्र 2021 मध्ये दिले होते. त्यानुसार भारतीय नागरिकत्वासाठी सलमाबानोच्या कुटुंबियांनी प्रक्रिया सुरु केली.
दि. 16 जुलै 2021 रोजी त्यागपत्र अर्थात पाकिस्तानी पासपोर्ट व नागरिकत्व सोडत असल्याचे शपथपत्र सादर करण्यात आले. आदी सर्व महत्वाचे व आवश्यक सोपस्कार पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवत दि. 21 ऒक्टोबर 2022 रोजी सलमाबानोला भारतीय नागरिकत्व बहाल केले. त्यानंतर लगोलग मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रस्ताव देण्यात आला व नुकतेच नांदेड (उत्तर) मतदार संघाच्या यादीत सलमाबानोचे नाव समाविष्ट झाले आहे.
'आटपाट नगर होते... इथपासून सुरु झालेली सलमाबानोच्या दुर्दैवाच्या दशावताराची कथा सुफळ संपूर्ण' करण्यात जिल्हा पोलीस दलातील डी.एस.बी. शाखेचे चंद्रकांत कदम यांनी गृह विभागाच्या पोलीस उपाधिक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न केले. शिवाय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दंडाधिकारी शाखेचे नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, बालाजी पांचाळ, दत्ता पोकळे, राजू गायकवाड आदींनी जिद्दीने यशस्वी पाठपुरावा केला.
----
आता पुनर्वसनाचा प्रश्न
प्रदीर्घ लढाईनंतर सलमाबानो सासरच्या छळातून मुक्त झाली. ती समृद्ध भारताची पुन्हा एकदा सन्माननीय नागरिक झाली. तिला मतदानाचा अधिकारही मिळाला. आता ह्या 55 वर्षिय सलमाबानोच्या उपजिविका आणि पुनर्वसनाचा प्रश्न आहे. अल्पसंख्याक विभाग, समाजकल्याण विभागाने सलमाबानोला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करावे. सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेणे अभिप्रेत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा