- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही...
----
काॅपीमुक्तीचा शंखनाद ः कांबळे गुरुजींना मात्र दाद ना प्रतिसाद
----
नांदेड ः आजचा शिक्षक सुखवस्तुच... परंतु तरीही कोणते ना कोणते कारण सांगत त्रागा करणारे अनेक जण आपण पाहतो. या भाऊगर्दीत शिवा कांबळे नावाचा अवलिया आपल्यापरीने तेवतो आहे. वहिवाट म्हणून बिकटवाट त्याने निवडली आहे. असा हा विद्यार्थी परायण शिक्षक मागील 4 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी झटतो आहे; परंतु त्याची कोणी दखल घेते ना दाद देते. काॅॅपीमुक्तीचा शंखनाद निनादत असताना कांबळे गुरुजींना प्रतिसाद देणेही शिक्षण व्यवस्था तसेच समाजाचे कर्तव्य ठरते. राम तरटे याच्यासारखा संवेदनशील पत्रकार आपल्यापरीने अशा उपेक्षितांना समाजापुढे आणण्याचा जो प्रयत्न करतो तो कौतुकास्पद.
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेवून येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही...
चणे आहेत पण दात नाहीत....
नवीन पिढी खूप स्मार्ट आहे. तिची आकलन शक्ती प्रचंड आहे. उरात काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी आहे. पावनखिंड लढवण्याची किंवा एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द आहे. कल्पना चावला, कमला हॅरीस, ऋषी सुनक, सत्या नाडेला, पराग अग्रवाल, सुंदर पिचाई किंवा अलिकडचे उदाहरण म्हणजे नील मोहन यासारखी व्यक्तिमत्वं त्यांना खुणावत असतात; परंतु भौतिकता साथ देत नाही. शहरी भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळे आणि ग्रामीणचे वेगळे आहेत. शे-दिडशे किंवा दोन-तीनशे उबऱ्यांच्या गावात शाळा आहेत पण शाळापण नाही. शिक्षक आहेत पण विद्यार्थी परायणता नाही.
सर्वच काही निराशाजनक नाही.
पगार मिळतो म्हणून शरीर तेवढे शाळेत पाठवावयाचे आणि खुर्ची उबवत फोनच्या स्क्रीनला कुरवाळायचे, यातच दिवस संपतो. शिवाय सरकारी सुट्या, स्थानिक सुट्या, प्रासंगिक सुट्या आहेतच. काहीजण गावच्या राजकारणात भूमिका घेतात, काही शेतात बटाऊगिरी करतात, काही तर चक्क सावकारीही करतात म्हणे. यामुळे मग एखादा प्रशांत बंबसारखा आमदार या स्थितीवर तुटून पडतो आणि गव्हासोबत किडेही रगडले जातात. ज्या जगात हे वास्तव आहे, त्या जगात विरुद्धार्थी वस्तुस्थितीही आहे. अर्थात म्हणून सर्वच काही निराशाजनक नाही.
एकला चलो रे...
शिक्षकांना शिक्षणेतर अनेक कामे लावली जातात ही वस्तुस्थिती आहे आणि त्यातील अनेक कामं तर निव्वळ अनुत्पादक आहेत. त्यातूनही मार्ग काढत काही शिक्षक आपले कर्तव् व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतातच; परंतु त्या पलिकडे जावून सामाजिक बांधिलकीही जपतात. शिवा कांबळे त्यापैकीच एक. कोणीतरी डिसले गुरुजी जगभर गाजला आणि नंतर बदनामही झाला; परंतु सचोटीने 'एकला चलो रे' या भूमिकेतूून भूमिकेला प्रामाणिक न्याय देणारा शिवा कांबळे मात्र उपेक्षितच राहतो, ही समाजाकडून चालविली जाणारी क्रूर थट्टा म्हणावी लागेल.
उपयुक्त संकल्पना
रात्रीचे वर्ग... ही एक अतिशय उपयुुक्त संकल्पना आहे. ज्यांना त्यांच्या विद्रार्थी दशेत अशा वर्गांचा लाभ घेता आला, त्यांनाच त्याचे महत्व कळेल. लातूरच्या केशवराज विद्यालयात असेच एक दीक्षित सर होते. गणिताचे हे शिक्षक होतकरु विद्रार्थ्यांना रात्रीचे भोजन झाल्यानंतर अभ्यासाला शाळेत बोलवत. शिवा कांबळे हे देखिल याच प्रकारे विद्रार्थी घडवण्याचे स्तुत्य कार्य करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांची घरे अगदी छोटी असतात. त्यात भावंडं, टी.व्ही., शेजारीच कुठेतरी भजन-किर्तन, पालकांकडूून सांगितली जाणारी कामे, यात अभ्यास होत नाही. किंवा अभ्यास करताना येणाऱ्या शंकांचे निरसन होण्याचाही मार्ग नसतो.
दखल घेणे भाग पडते
शिवा कांबळे हे मालेगावच्या (ता. अर्धापूर) या बऱ्यापैकी शहरीकरण झालेल्या गावातील शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या शाळेत रात्रीचे वर्ग चालविले आहेत. हा उपक्रम नवखा नाही. तर मागील चार वर्षापासून हा होम त्यांनी मांडला आहे. त्यामुळेच त्याची दखल घेणे भाग पडते. होतकरु विद्रार्थ्यांसाठी हे वर्ग खूप फायदेशीर ठरतील. विद्यार्थी ठराविक वेळेत वर्गात येतात. आपापला गृहपाठ, पुढचा अभ्यास करतात. काही शंका आल्याच तर कांबळे गुरुजी सतत उपलब्ध असतात. त्यांच्या विषयाच्या बाहेरची शंका एखाद्या विद्यार्थ्याला असेल तर संबधित शिक्षकाकडून ती सोडवून घेतात.
पालकांनाही जाणिव
वास्तविक आजच्या काळातील शिक्षक चांगला लाखभर पगार कमावणारा आहे. त्याचे शहरात टुमदार घर असते, घरात अर्धांगिणी असते, एखाद-दुसरी चिलीपीलीही असतात. एसी.फ्रीझ, फोमची गादी, मलमली पांघरुण अशा सर्व भौतिक सोयी असतात; परंतु तरीही त्याचा मोह टाळून कांबळे गुरुजी विद्यार्थ्यांसमवेत शाळेतच मुक्कामी असतात. रात्रीचे भोजनही ते गावातच घेतात. अगोदर त्यांनी मेस लावली होती; पण, ही बाब एका पालकाला रुचली नाही. मग त्याने जेवणाची व्यवस्था केली. त्या पालकाच्या घरुन रोज कांबळे गुरुजींना डबा पुरवला जातो.
पालक, विद्यार्थ्यांची जबाबदारी
अशा या गुरुजींचे स्वप्नं साकार करण्याची जबाबदारी आता विद्यार्थी व पालकांवर आहे.
विद्यार्थांनी मोबाईल किंवा टी.व्ही.च्या मायावी युगात न रमता पूर्णवेळ अभ्यासाला दिला पाहिजे आणि पालकांनीही आपापल्या पाल्यांना पूर्णवेळ विद्यार्थी म्हणूनच वागवले पाहिजे. महत्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी, सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी अशा वेगळी वाट चोखाळणाऱ्या गुरुजींना परदेशी गुरुजींची उणिव भासू देवू नये.
----
दिलीपभाऊ इकडेही पहा....
अखंड सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेला एक अवलिया मागील तीन दशकांपासून नांदेडमध्ये कार्यरत आहे. दिलीप ठाकूर हे त्याचे नाव. जे जे उत्तम, उदात्त त्याची दखल दिलीप भाऊ घेणारच. भाऊचा डबा हा (कै.) आमदार प्रकाशभाऊ खेडकर यांच्या स्मरणार्थ चालविला जाणारा उपक्रम असो वा कोरोनासारख्या महामारीत गरजवंतांना मदत असो, भिखाऱ्यांची सेवा असो वा वस्त्रहिनांना अंगभर कपडे पुरवणे असो, वानप्रस्थाश्रमींना तीर्थयात्रा घडवणे असो वा विविध स्पर्धांचे आयोजन असो, दिलीपभाऊ सदा कार्यरत असणारे व्यक्तिमत्व, त्यांनीच आता समाजाच्या विविध क्षेत्रात समाजोपयोगी कर्मयोग्यांचीही दखल घ्यावी.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा