दादा पेटले...
------------------------------------------------------
जालना-नांदेड 'समृद्धी'ला शंकररावांचे नाव द्या
----
अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले पाहिेजेत
----
महेश राजे
नांदेड ः स्व.डाॅ. शंकररावजी चव्हाण यांचे आम्हा सर्वांवर खूप उपकार आहेत. त्यांनी अनेक धरणं बांधली, आपल्या भागात पाणी आणले त्यामुळे आज आपल्या चेहऱ्यावर रौनक आहे. महाराष्ट्रात व केंद्रातही त्यांनी अनेक महत्त्वाची सत्तास्थाने भूषविताना प्रत्येक खात्याला चांगला न्याय दिला.
विकासाची गंगा मराठवाड्यात आली ती त्यांच्याच कार्यकर्तृत्वाने. त्यामुळे जालना ते नांदेड या दरम्यान, अशोकरावांच्या प्रयत्नाने जो समृद्धी महामार्ग होऊ घातला आहे, त्याला डाॅ. शंकरराव चव्हाण यांचे नाव दिले पाहिजे, नव्हे असा ठरावच घ्या, अशी भूमिका माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी मांडली.
वानप्रस्थाश्रमात सुमारे सहा वर्षाचा काळ 'असंगाशी संग' केल्यानंतर उपरती झालेले भास्करराव पाटील खतगावकर अलिकडेच स्वगृही परतले, ते दुप्पट उत्साहाने. भाजपाच्या भगव्या रंगात रंगल्यानंतरही आपला मुळचा तिरंगा रंग त्यांनी हरवू दिला नाही. कारेगाव फाटा (ता. धर्माबाद) येथे झालेल्या अशोकराव चव्हाण यांच्या कृतज्ञता सोहळ्यात त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. 'फिर वही दिल लाया हूँ', या स्टायलीत मध्येच काय विक्रम (काळे), बरं का वसंतराव (चव्हाण), मारोतराव (कवळे गुरुजी), पोकर्णा असे नावाने संबोधत त्यांनी सर्वांना भानावर ठेवले. खतगावकरांनी यावेळी हिंदी कवींच्या स्टायलीत आवाहन करीत श्रोत्यांकडून टाळ्याही वाजवून घेतल्या.
अशोकरावांनी त्यांच्या 30 वर्षाच्या राजकारणात नांदेड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला, रस्ते, पुल, बंधारे, रेल्वे सेवेचा विस्तार, विमानतळ अशी कितीतरी कामे केली. तत्पूर्वी शंकरराव चव्हाण यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीवरही दादांनी प्रकाश टाकला. एकंदर मागील 50 वर्षांचा इतिहासच त्यांनी उद्धृत केला. जायकवाडी, विष्णुपुरी, मांजरा, इसापूर अशी कितीतरी धरणे त्यांनी बांधली. तब्बल 170 किमी वरुन इसापूूरचे पाणी आज धर्माबाद-उमरी या भागात आले. त्यामुळे आपण सुखी आहोत. त्यासाठी शंकररावांना अक्षरशः भगीरथ प्रयत्न करावे लागल्याचेही ते म्हणाले.
----
मेहुण्यावर दादा फिदा
1982 साली अशोकराव पहिल्यांदा मंत्री झाले. तेव्हापासून त्यांनीही विविध पदं भूषविली आहेत. आमच्या व्याह्याचा नायगाव हा परिसर तालुक्यात रुपांतरित अशोकरावांमुळेच झाला. मागील तब्बल 30 वर्षांपासून अशोकरावांना प्रशासकीय अनुभव आहे. ते जेव्हा 2008 मध्ये प्रथम मुुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी नांदेडकरांच्या सोयीसाठी महसूल आयुक्तालय नांदेड येथे आणण्याचा ठराव घेतला. त्यामुळेच त्यांचे मुख्यमंत्रिपद गेलेच परंतु तो ठराव अजूनही तसाच आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अशोकरावांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे लागणार आहे. ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असेही खतगावकर म्हणाले.
----
दादांच्या कौतुकाने अशोकरावांना अजीर्ण
बऱ्याच वर्षानंतर कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने अशोकरावांपुढे अगदी निवांतपणे बोलण्याचा भास्करराव खतगावकरांना योग आला. त्याचे सोने करीत दादांनी अशोकरावांच्या राजकीय वाटचालीचा जणू आढावाच घेतला. या 30 वर्षांच्या कालावधीत अशोकरावांनी घेतलेल्या विविध निर्णयाचे आणि कामाचे त्यांनी तोंडभरुन कौतूक केले. यावेळी प्रेक्षकही दादांच्या प्रत्येक वाक्याला दिलखुलास दााद देत होते. दादांकडून होणारे है कौतूक याची देही, याची डोळा, याची कर्णे ऐकूून अशोकरावांना जणू अजीर्ण होते की काय, अशीही मिश्किली एकाने केली.
----
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा