'राईट पर्सन इन राँग पार्टी'

'राईट पर्सन इन राँग पार्टी'
----
काल अशोकराव म्हणाले होते ; आज गडकरींची पाळी
------
महेश राजे
नांदेड ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारची एकूणच कामगिरी निराशाजनक आहे; परंतु यातून या सरकारमधील महत्वाचे मंत्री नितीन गडकरी यांचा अपवाद करावा लागेल. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांना त्यांनी न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यामुळे 'राईट पर्सन इन राँग पार्टी', असा त्यांचा उल्लेख करावा लागेल, असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण वेळोवेळी म्हणाले होते. आता उद्या नितीन गडकरी नांदेडमध्ये येत असून राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता अशोकरावांच्या बाबतीत गडकरीसुद्धा याच वर्णनाचे 'रिटर्न गिफ्ट' करतात काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत एका 'व्हर्च्युअल प्रेस काँन्फरन्स'मध्ये अशोकराव चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली होती. मोेदींनी सर्व शासकीय यंत्रणा स्वत:च्या मुठीत ठेवल्या असून सर्वच विभागाच्या निर्णयांवर त्यांचाच प्रभाव पहायला मिळतो. हे चित्र सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने हितावह नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. पण; त्याचवेळी त्यांनी  केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे मात्र कौतूक केले होते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या मागण्याची दखल घेऊन श्री गडकरी सर्वांचीच कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात;परंतु त्यांच्याच पक्षात त्यांचे खच्चीकरण होते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
याशिवाय मुंबई-गोवा महामार्गाच्या संदर्भात ऒक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती. त्या बैठकीची माहिती पत्रकारांना देतानाही श्री चव्हाण यांनी गडकरी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याही गुडबुकमध्ये गडकरी यांचे नाव आहे. 2019 च्या निवडणूक निकालानंतर गडकरी मुख्यमंत्री होणार असतील तर राष्ट्रवादी पाठिंबा द्यायला तार होती, असे विश्लेषणही वारंवार करण्यात आले होते.
आता स्वाराती मराठवाडा विद्यापिठाने श्री गडकरी यांना डी.लिट. जाहीर केली आहे, ती स्विकारण्यासाठी गडकरी दि. 24 रोजी नांदेडात येत आहेत. याचवेळी नेताजी सुभाषचंद्र मोस महाविद्यालयाच्या कार्यक्रमालाही ते हजेरी लावणार आहे. एका महामार्गाच्या कामाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. शिवसेना ठाकरेंची की, शिंद्यांची असा हा दावा आहे. नऊ महिन्यांपूर्वी अशोकराव ज्या महाआघाडी सरकारमध्ये बांधकाम विभागाचे मंत्री होते ते सरकार फडणवीस यांनी पुढाकार घेऊन पाडले. त्यानंतर विविध नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.
मागील नऊ महिन्यांत वारंवार अशोकराव भाजपवासी होणार, अशा चर्चा, अफवांना उधाण आले आहे. अलिकडेच चव्हाणांचे कट्टर मित्र विखे पाटील यांनीही चव्हाणांना आमंत्रण दिले. प्रत्येकवेळी अशोकरावांनी पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले. एका दूरचित्रवाहिनीने मुुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली होती, त्यावेळी मागील सरकारमधील कोणता मंत्री आता तुमच्या सोबत असावा असे तुम्हाला वाटते या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी अशोकरावांकडे कटाक्ष टाकला होता. या सर्व पार्शवभूमीवर ना. नितीन गडकरी उद्या नांदेडमध्ये काय बोलतात, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे. कालपर्यंत अशोकराव गडकरींना 'राईट पर्सन इन राँग पार्टी' म्हणत असत, आता तोच डायलाॅग गडकरी अशोकरावांना 'रिटर्न गिफ्ट' म्हणून परत करतात की कसे, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टिप्पण्या