ना.गडकरींसाठी मामाचौकात हेलीपॅड


ना.गडकरींसाठी मामाचौकात हेलीपॅड
----
गरज असतानाही विद्यापीठात हेलीपॅड नाही 
----
नांदेड ः केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी आज गुरुवारी नांदेड येथे येत आहेत. स्वाराती. मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने त्यांना डि.लीट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी असर्जन शिवारात मामा चौकात हेलीपॅड उभारण्यात आले आहे. विद्यापीठात ही सोय उपलब्ध नाही.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तारुढ झाल्यानंतर लगेचच त्यांनी प्रत्येक तालुकास्तरावर हेलिपॅड उभारण्याचा संकल्प जाहीर केला होता. गरजवंतांना वैद्यकीय मदतीच्या दृष्टीने ही सोय उपलब्ध करुन देण्यात येणार होती. परंतु घोषणेनंतर अद्याप त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. नांदेडसारख्या ठिकाणी विमानतळ आहे परंतु ते बंद अवस्थेत आहे. शिवाय विमानतळावरुन विद्यापीठाचे अंतर सुमारे 14 किलोमीटर येते हा रस्ता भर शहरातून जातो. शिवाय ना. गडकरी यांचा दौरा कार्यक्रमच हेलिकाॅप्टरने आहे. 
दरम्यान, विद्यापीठाचा परिसर खूप मोठा असला तरी येथे हेलिपॅड बांधण्यात  आलेले नाही. तात्पुरती व्यवस्था म्हणून ते उपलब्ध करावयाचे झाले तरी तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मामा चौकात ज्या ठिकाणी नुकताच श्री श्री रविशंकरजी यांचा सत्संग झााला होता, तिथे गडकरींचे हेलिकाॅप्टर उतरणार आहे.कार्यक्रमानिमित्त हे मैदान नुकतेच साफ करण्यात आले आहे. लँडींगसाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली की, हेलिकाॅप्टर उतरु शकते.
श्री गडकरी हे खामगाव (जि. बुलडाणा) येथून हेलिकाॅप्टरने नांदेडला येत आहेत. येथील असर्जन शिवारात हेलिपॅडवर त्यांचे सकाळी 10.45 वाजता आगमन होणार आहे. येथून ते मोटारीने स्वाराती मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभाला उपस्थित  राहतील. त्यानंतर ते दुपारी सव्वा एकच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर पोचतील. येथे दुपारचे जेवण घेतल्यानंतर दुपारी चार वाजता ते अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभास उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी साडे पाच वाजता गुरुद्वारा बोर्डाच्या हिंगोली गेट येथील मैदानावर महामार्ग प्रकल्पाच्या शिलान्यास समारंभाला ते उपस्थित राहणार असून तिथून ते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील निवासस्थानी पोचतील. येथून भाग्यनगर येथे माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या निवासस्थानी त्यांची भेट असेल. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असणार आहेत. येथे सायंकाळी भाजपा पक्ष कार्यालयाच्याबाबतीत ते माहिती घेतील. शुक्रवारी सकाळी विमानतळावरुन ते परभणीकडे रवाना होणार आहेत.

टिप्पण्या