गडकरींनी मान्य केले शंकररावांचे मोठेपण
----
पावसाचे धावणाऱे पाणी जमिनीत मुरवणे गरजेचे
---
महेश राजे
नांदेड - (स्व.) शंकररावजी चव्हाण यांना मराठवाड्याचे भगीरथ म्हटले जाते. त्यांच्यामुळेच नांदेड जिल्हा सुजलाम सुफलाम आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या ताज्या नांदेड दौऱ्यात शंकररावांचे हे मोठेपण मान्य केले. नामोल्लेख टाळला असला तरी त्यांनी आपल्यापरीने शंकररावांना आदरांजलीच अर्पण केली.
स्वाराती मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची दखल घेत त्यांना डी.लिट पदवी नुकतीच समारंभपूर्वक प्रदान केली. यानिमित्ताने श्री गडकरी नांदेडात आले होते. हे औचित्य साधत अन्य दोन कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडले. पैकी विद्यापीठ आणि कोनशिला समारंभात आपले मनोगत मांडताना श्री गडकरी यांनी हवाई मार्गे नांदेडच्या हद्दीत येताच सर्वत्र हिरवाई दिसली. ती मनमोहक होती, त्यामुळे आपल्याला खूप आनंद झाल्याचे सांगितले.
दि. 23 रोजी गडकरी खामगाव (जि.बुलडाणा) येथे घरगुती कार्यक्रमानिमित्त होते. तिथूनच ते हेलीकाॅॅप्टरद्वारे नांदेडला आले. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपल्या प्रवासाचे वर्णन केले. अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशिम व हिंगोली असे जिल्हे हवाई प्रवास करताना लागले. परंतु सर्वत्र जणू वाळवंटासारखे भकास चित्र होते. नांदेड जिल्ह्यावर हेलिकाॅप्टर आले तसे सर्वत्र हिरवेगार दिसत होते.
(स्व.) शंकरराव चव्हाण यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री असताना मराठवाड्यात धरणे बांधली. जायकवाडी व विष्णुपुरी हे त्यातील प्रमुख प्रकल्प. याशिवाय वाशिम येथेही इसापूर हे महाकाय धरण बांधले. तब्बल 170 किलोमीटरचा प्रवास करुन तेथील पाणी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, अर्धापूूर, उमरी व धर्माबाद तालुक्यांना दिले जाते. त्यामुळेच येथील शेतकरी ऊस व केळी उत्पादक झाला असून त्याच्याकडे चार पैसे खेळताना दिसतात.
धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला शिकवा, असा मंत्र त्यांनी दिला. पावसाचे पडणारे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरले तरच भूजलस्तर उंचावून भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. वास्तविक सध्या पाण्याची अजिबात कमतरता नाही. पडणाऱ्या पावसाचे बहुतांश पाणी नियोजनाअभावी समुद्रात वाहून जाते. ते थांबवणे गरजेचे असल्याचेही श्री गडकरी म्हणाले.
----
साठवण क्षमता वाढविण्याची गरज
प्राचिन तळे, विहिरी, ओढे, नद्या यांचे खोलीकरण करण्याची गरज आहे. वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी शक्य तिथे नवीन तलाव बांधले पाहिजेत, हे सांगताना श्री गडकरी यांनी जिल्ह्यात नव्याने केलेल्या तलावांचा उल्लेख केला. नांदेड-दजळकोड या मार्गावर पाच तलाव बांधले असून उस्माननगर -कुंद्राळ मार्गावर 4, कुंद्राळ ते वझर मार्गावर 4, भोकर ते सरसम मार्गावर 1, कोठारी ते धानोरा मार्गावर 7 आणि अर्धापर ते हिमायतनगर मार्गावर 5 तलाव बांधल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून 2205 टीएमसी साठवण क्षमता वाढल्याचे ते म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा