श्रीजयाचा 'श्रीगणेशा'...!
-----
ग्रामस्थांकडून शिकवण आणि सहकार्याचीही अपेक्षा
---
महेश राजे
नांदेड ः श्रीजया अमिता अशोकराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय जीवनातील भाषणाचा श्रीगणेशा नुकताच केला. देगाव बुद्रुक येथे पशुैद्यकय दवाखान्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी ग्रामस्थ अर्थात मतदारांकडून शिकण्याची तयारी दाखवतानाच त्यांच्याकडन सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली. अर्थात श्रीजया यांना त्यांच्या मातुश्री आणि आद्यगुरु सौ. अमिताभाभी चव्हाण यांचे समर्थ मार्गदर्शन लाभते आहे.
सौ. अमिता अशोकराव चव्हाण यांना दोन कन्यारत्न सुजया व श्रीजया आहेत.पैकी श्रीजया ह्या कायद्याची पदवीधर असून राजकारणाचा त्यांचा पिंड आहे. मागील सुमारे पाच ते सात वर्षांपासून त्या राजकारणात येऊ घातल्या होत्या. आई-वडिलांच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रचाराची एक बाजू लावून धरण्याची जबाबदारी त्यांनी नेटाने पार पाडली. मागील मनपा निवडणुकीत काॅर्नर सभा, रॅलीजही त्यांनी केल्या. त्यांचे राजकारणात खऱ्या अर्थाने लाँचिंग दोन महिन्यांपूर्वी खा. राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत झाले. त्यांनी राहूल गांधी यांच्याबरोबर पायी चालत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही केली. त्यातूनच त्यांना राजकारणाची दिशा सापडली, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
अर्थात राजकारणाचे बाळकडू त्यांना आजोबा व राजकारणातील हेडमास्तर म्हणून ओळखले जाणारे (स्व.) शंकररावजी चव्हाण तसेच पिता अशोकराव चव्हाण यांच्याकडून मिळाले. नांदेड जिल्ह्यात नवीन पिढीतील आश्वासक राजकीय चेहरा म्हणून श्रीजया यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान, त्या भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा या मतदार संघात पूर्वीपासूनच आहे. तर मध्येच त्यांना लोक नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उभे करतात. यापूर्वी भोकर मतदारसंघ हा अशोकराव चव्हाण यांचा होता. सध्याही आहे. पण, 2014 ते 19 या कालावधीत अमिताभाभी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. तर नांदेड उत्तरचे नेतृत्व डी.पी. सावंत यांनी केले होते.
उपरोक्त पार्श्वभूमीवर श्रीजया कोणत्या मतदारसंघातून नशिब आजमावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भोकर मतदारसंघातील त्यांचा राबता पाहता, तेथूनच त्या निवडणूक लढवतील असा कयास व्यक्त होतो आहे. दरम्यान, नुकताच अर्धापूर तालुक्यातील देगाव खुर्द येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी श्रीजया यांनी पहिलेवहिले भाषण केले. त्यात त्यांनी अतिशय मोकळेपणाने आपले मत मांडताना ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा केली. गावपातळीवर सरपंच व उपसरपंचांचे महत्व ओळखून आभार मानताना त्यांनी आवर्जून तसा उल्लेख केला. किंबहुना उपसरपंचांचा उल्लेख करण्याची प्राॅम्प्टिंग अमिताभाभी यांनी केले.
----
आश्वासक चेहरा
नांदेडच्या राजकारणात पहिल्या महिला नेत्या म्हणून श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांच्याकडे पाहिले जाते. अर्थात स्वयंभू व्यक्तिमत्त्व म्हणून. पतीचा मुखवटा म्हणून अनेकजणी झाल्या असतील. सूर्यकांताताई यांच्याप्रमाणेच सौ. अमिताभाभी यांनीही सक्षमपणे नेतृत्व केले. जिल्हा पातळीवर सौ. अरुंधती पुरंदरे यांनी अभ्यासू आणि लढाऊ बाणा सिद्ध केला. नवीन पिढीत श्रीजया आश्वासक चेहरा म्हणून पुढे येते आहे. त्याचबरोबर भाजपच्या जि.प. सदस्या सौ. पूनम राजेश पवार, सौ. जयश्री निलेश पावडे, सौ.अपर्णा ऋषिकेष नेरलकर, सौ. मिनलताई पाटील खतगावकर यांचाही नामोल्लेख करता येईल. जिल्हा परिषदेच्या राजकारणात जनाबाई डुडुळे या आदिवासी महिलेनेही बुलंद आवाज सिद्ध केला होता. इतरही काही उदाहरणं देता येतील; परंतु मोजकीच.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा