वारजेच्या धरतीवर पुष्प प्रदर्शन व्हावे

'कुसुमां'विना कुसुम महोत्सव अधुरा
----
वारजेच्या धरतीवर पुष्प प्रदर्शन व्हावे
---
नांदेड ः स्वरसुगंधित महोत्सवांची नांदेडमध्ये कमतरता नाही. सर्वात अगोदर संगीत शंकर दरबार सुरु झाला. त्यानंतर खा. हेमंत  पाटील यांनी आषाढी महोत्सव सुरु केला. मागील आठ-दहा वर्षांपासून दिवाळी पहाटही होते आहे. यंदापासून कुसुम महोत्सवही आयोजित करण्यात येत आहे परंतु पुष्पसुगंधित महोत्सवांमुळे नांदेडचे रसिकविश्व काहीसे अधुरे आहे.
पुणे महानगरपालिके अंतर्गत वारजे येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात फूल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या सहकार्याने होणारे हे पुष्प प्रदर्शन खरोखरच नयनरम्य असते. कारागिरांची कला आपसूकच मनसोक्त दाद घेवून जाते. विविध रंगी व विविध आकारातील फुले अतिशय रचनाबद्धरित्या सजवली जातात. साधारण तीन आठवडे हा महोत्सव चालतो परंतु ते पाहण्यासाठी संपूर्ण पुण्यातून लाखो रसिक आवर्जून भेट देतात. काही रसिक तर अनेकवेळा भेटी देवून सेल्फीही काढतात. 
(स्व.) शंकररावजी चव्हाण हे स्वतःच संगीतप्रेमी होते. शास्त्रिय संगिताचे ते दर्दी होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अशोकराव चव्हाण यांनी दरवर्षी संगीत शंकर दरबार या स्वरसुगंधीत महोत्सवाची सुरवात केली. अगोदर कुसुम सभागृहात होणारा हा महोत्सव प्रचंड रसिकाश्रयामुळे यशवंत महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणात होऊ  लागला. या माध्यमातून नांदेडकर रसिक श्रोत्यांना एक प्रकारची मेजवाणीच मिळते. अनेक दिग्गज कलावंत या महोत्सवाच्या निमित्ताने नांदेडकरांना प्रत्यक्ष पाहता व ऐकता आले.
ख्यातकिर्त गायकांसोबतच उभरत्या कलाकारांनाही मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे स्तुत्य कार्य या माध्यमातून श्री चव्हाण यांनी केले आहे. यावर्षी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुसुम महोत्सवही होतो आहे. आज बुधवारी (दि. 1 मार्च) रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून सुप्रसिद्ध गायिका वैशाली सावंत  अभिनेते वैभव मांगले यांची उपस्थित असेल. या महोत्सवाचे स्वरुप व्यापक आहे.
तीन दिवसीय या महोत्सवात महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. शिवाय खवय्यांसाठी खाद्य महोत्सव, फॅशन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. याच्याच जोडीला फूल महोत्सवाचे आयोजन केल्यास निसर्गप्रेमींनाही एक पर्वणी उपलब्ध होईल, अशी नांदेडकर रसिकांची मागणी आहे.
----
वारजेच्या महोत्सवाला प्रतिसाद
पुणे महापालिकेच्या अंतर्गत वारजे येथे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये फूल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विविधरंगी व विविध आकारांच्या या फूल महोत्सवाची संकल्पना नगरसेवक सचिन दोडके यांच्या कल्पकतेतून राबविण्यात येते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत अशी प्रदर्शने व्हावीत, असे मत श्री दोडके यांनी 'उद्यााचा मराठवाडा'शी बोलताना व्यक्त केले.

टिप्पण्या