साहेब, जड झाले ओझे ...! --

साहेब, जड झाले ओझे ...! 
----
रेल्वे प्रवाशांच्या अशोकरावांकडून प्रचंड अपेक्षा
----
महेश राजे
नांदेड ः माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देवगिरी एक्स्प्रेसला नवे 'एलएचबी' डबे जोडणार असल्याचे कळविले आहे. ही माहिती श्री चव्हाण यांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर करताच नांदेडकर आणि रेल्वे प्रवाशांनी जल्लोष केला आहे. शुभेच्छा देतानाच श्री चव्हाण यांच्यावर अपेक्षांचा पाऊस पाडला आहे.
 दक्षिण मध्य रेल्वेच्यावतीने मराठवाड्याला नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. गैरसोयीचे वेळापत्रक, अस्वच्छ डबे, घाणेरड्या वाॅशरुम्स अशा अनेक समस्यांना रेल्वेप्रवासी अक्षरशः वैतागले आहेत. नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडावा, अशी फार जुनी मागणी आहे; परंतु त्याकडे सातत्याने दुुर्लक्ष करण्यात येते. स्थानिक नेतृत्व, रेल्वे संघर्ष समिती, रेल्वे प्रवासी संघटना यांनी वेळोवेळी आवाज उठवला, आंदोलने केली. (कै) सुधाकरराव डोईफोडे यांनी हयातभर हा आग्रह लावून धरला; परंतु दक्षिण मध्य रेल्वेने दखल घेतली नाही. शिवाय सुविधाही पुरवल्या नाहीत. हाच विषय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घनसावंगी (जि. जालना) येथे मागील महिन्यात झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन मांडला. यावेळी किमान स्वच्छ डबे तरी जोडण्यात यावे, अशी किमान अपेक्षा श्री चव्हाण यांनी व्यक्त केली होती. मराठवाड्याचे केंद्रात दोन-दोन मंत्री असून साध्या साध्या मागण्या पूर्ण होत नसल्याबद्दल खंतही व्यक्त केली होती. 
आ.अशोकराव चव्हाण यांच्या मागणीची दखल घेत ना. रावसाहेब दावे यांनी स्वतः श्री अशोकराव चव्हाण यांना फोन करुन दि. 13 फेब्रुवारीपासून देवगिरी एक्स्प्रेसला सर्व सुविधायुक्त नवे रेल्वेडबे (एलएचबी) जोडणार असल्याचे कळविले आहे. याबद्दल श्री दानवे यांना धन्यवाद देणारी पोस्ट श्री चव्हाण यांनी मंगळवारी शेअर केली. यावर नांदेडकर आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांनी आनंद व्यक्त करताना रेल्वे विषयक असंख्य समस्या मांडल्या आणि त्या सोडविण्याबाबत अशोकराव चव्हाण याांच्याकडूनच अपेक्षा व्यक्त केली. काही प्रवाशांनी काॅमेंट्सद्वारे व्यक्त केलेल्या अपेक्षा ः 'सत्तेत नसताना केंद्राकडे मागणी करुन ती मान्य करुन घेणे ही बाब अभिनंदनास पात्र आहे'. 'अशा लोकोपयोगी कामांना प्रत्यक्ष गती देण्यासाठी आपल्यासारखे सजग व तत्पर नेतत्व सत्तेत असावे ही मराठवाड्यातील जनतेसाठी काळाची गरज आहे, उपलब्ध सत्ता परिस्थितीत भरपूर संधी आहे...' 'शेजारील पूर्णा शहरातील क्रू बुुकिंग लाबी, इलेक्ट्रिक मिनी लोकल शेड, डिल शेड, रेल्वे पोलीस चौकी आदी विभाग पूर्णा शहरात कायमस्वरुपी ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत', 'आम्हा उत्तर भारतीय लोकांसाठी आठवड्यातून दोन गाड्या चालू करणे गरजेचे आहे', 'पुणे-मनमाड येणाऱ्या गाडीमध्ये टायलेट अतिशय घाण असतात पाणी सुद्धा नसते', 'जालना ते नांदेड विद्युतीकरण आणि दुहेरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे तसेच नांदेड ते हैदराबाद या मार्गाचे देखील विद्युतीकरण आणि दुहेरीकरण करुन मराठवाड्यातील आणि सीमा भाागातील जनतेला दळणवळणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी', 'आपण ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग आणला त्याचप्रमाणे बुलेट ट्रेन देखील आणावी', 'नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर-मुंबई पूर्वीप्रमाणे चालूू करावी', 'तिरुपती ते जालना ही प्रवासीप्रिय गाडी असून ती आठवड्यातून एकदा धावते, त्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे, याबाबत रेल्वेकडे पााठपुरावा करावा', अशा एक ना असंख्य अपेक्षा लोकांनी श्री चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत.
-----
राईट पर्सन इन राँग पार्टी
अशोकराव चव्हाण यांनी भाजपात जावे, अशी जाहीर अपेक्षा कमेंट्सद्वारे सूर्योदय मन्याड फाऊंडेशनने व्यक्त केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे, 'साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व आहात. खरं बघायला गेलं तर अजून 5-10 वर्ष काँग्रेस पूूर्णपणे महाराष्ट्रात उभी राहील, असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सत्तेत नसणार आहात. म्हणून नांदेडसह मराठवाड्याचा विकास होणार नाही. आमची एक इच्छा आहे की आपण भाजमध्ये राहावे व सत्तेचा अजून मोठ्या प्रमाणात फायदा करुन विकास साधावा.
----
दानवेंनाच श्रेय - आ. चव्हाण
उपरोक्त विषयी माजी मुुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच श्रेय दिले. आपण फक्त निमित्तमात्र आहोत. याउपरही काही लोक नाराज आहेत. आपण सत्ताधाऱ्यांशी बोलूच नये, अशी त्यांची अपेक्षा. खासदार स्वतः दिल्लीत काही बोलत नाहीत. मौनीबाबा म्हणून राहतात आणि इकडे गल्लीत माझ्यावर टिका करतात, अशाने प्रश्न कसे सुटतील, असा प्रश्नही श्री चव्हाण यांनी उपस्थित केला.

टिप्पण्या