हा कसला झिम्मा काँग्रेस हायकमांड खेळते

हा कसला झिम्मा काँग्रेस हायकमांड खेळते
----
काल अशोकरावांना छळले होते, आज थोरातांना पोळले आहेे
-----
महेश राजे
नांदेड ः दहा वर्षापूर्वी कथित आदर्श सोसायटी प्रकरणावरुन गरज नसताना काँग्रेस हायकमांडने अशोकराव चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद हिरावले होते. तरआजद नाना पटोले यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तांबे पिता-पुत्रावर निशाणा साधत बाळासाहेब थोरात यांना वेठीस धरले आहे. या निमित्ताने सुनील केदारआणि विजय वडेट्टीवार या दिग्गज नेत्यांनी पटोलेंना लक्ष्य केले असून अशोकराव वपृथ्वीराजबाबा हे चव्हाणद्वय सूचक मौन पाळून आहेत. काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची ही वाटचाल भाजपाला सुखावह ठरणारी आहे.
मुंबई बाँम्बस्फोटानंतर तत्कालीन विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2008 मध्ये अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली.  पिता आणि पुत्र दोन्ही मुख्यमंत्री, असे हे राज्यातील एकमेव उदाहरण. जागतिक आणि आधुनिक दृष्टीकोण असणाऱ्या अशोकरावांनी पदारुढ होताच कामाचा धडाका लावला होता. वाढती लोकसंख्या लक्षात घेवून काही विभागीय कार्यालयांचे विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यातूनच एकमेकांचे पाय ओढण्याच्या गलिच्छ खेळातून मुंबईतील आदर्श सोसायटी प्रकरण चव्हाट्यावर आणले गेले. इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी सुपारी घेतल्याप्रमाणे हा विषय लावून धरला आणि काँग्रेस हायकमांडने त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी अशोकरावांचा राजीनामा घेतला.
वास्तविक पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवण्याच्या दिशेने अशोकरावांची पावले पडत होती. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला लक्षणीय यश मिळाले होते. महाराष्ट्र विधानसभेत 2004 मध्ये काँग्रेसने 69 जागा जिंकल्या तर अशोकरावांच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत 13 जागांची वाढ होऊन 82 जागा झाल्या. तर  2014 मध्ये मोदी लाटेचा जबरदस्त फटका बसत काँग्रेसने तब्बल 40 जागा गमावल्या. विशेष म्हणजे मोदी लाटेचा नांदेड जिल्ह्यात परिणाम जाणवला नाही. ही निवडणूक 'धोरण लकवा' म्हणून ठप्पा पडलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. त्यावेळी जर अशोकरावांचा राजीनामा घेतला नसता तर आज काँग्रेसची अवस्था एवढी दयनीय झाली नसती.
2010 ते 14 ही चार वर्षे आणि नंतरची फडणवीस सरकारची पाच अशी नऊ वर्षे अशोक चव्हाण जणू विजनवासात असल्यागत होते.  त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसची हालत तर खस्ता झालीच; परंतु नांदेड जिल्ह्याला प्रचंड नुकसान सोसावे लागले. यावरुन हायकमांडने काही धडा घेतला असे दिसत नाही. आता काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे जात्यात आले आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसने जो खेळ मांडला. त्यामुळे उरल्या सुरल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राज्यस्तरावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केले जात असून वैदर्भिय नेते सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी उघडपणे विरोधी भूमिका घेतली आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.  नेत्यांच्या आपसात झुंजी लावून हायकमांड मात्र असूरी आनंद घेताना दिसून येते.
'तिसरी बार, मोदी सरकार' आणि 'मी पुन्हा येईन' हे भाजपचे मिशन साकार करण्याचा संकल्पच जणू भाजपेतर पक्षांनी केला आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली काय अन् महाराष्ट्राच्या राजकारणाची किळसवाणी अधोगती सुरु झाली. 2019 च्या निवडणुका भाजपबरोबर युतीत लढल्यानंतर निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलली. पारंपरिक हाडवैरी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करुन सरकार बनवले. पुढील सुमारे अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळेल तेव्हा आणि नसतानाही विनाकारण हिणवले गेले. फडणवीसांनीही कोरोनाचा जोर ओसरताच आपली शस्त्रे परजली आणि शिवसेनेत उभी फुट घडवून आणत सरकार पाडले.  
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा विजयाची खात्री असलेला उमेदवार पडला आणि तिथूनच पक्षात संशय कल्लोळ निर्माण झाला. पाठोपाठ शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अशोकराव व इतर काही आमदार गैरहजर राहिले, त्याचाही बराच बभ्रा झाला. अशोकराव भाजपात जाणार अशा वावड्या उठवण्यात आल्या. त्याची चर्चा अजूनही सुरुच आहे. याचवेळी नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महानाट्य घडले. पुत्र सत्यजीत तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी सुधीर तांबे यांनी केली असतानाही काँग्रेसने एबी फाॅर्म सुधीर तांबे यांच्याच नावे दिला. परिणामी सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलेही. दरम्यानच्या काळात तांबे पिता-पुत्रावर गद्दारीचे आरोप झाले. बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.  
निवडणूक पार पडल्यानंतर सत्यजीत यांनी स्पष्टीकरण दिले. तेव्हापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु झाला आहे. इकडे बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा तर दिलाच परंतु प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करणारे पत्र हायकमांडला लिहिले. सवयीप्रमाणे हायकमांडने याची अद्याप दखल घेतलेली दिसत नाही. एकीकडे भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयाारीला लागला आहे. सध्या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वाच्या निवडणुका होणार आहेत; पण, काँग्रेस पक्षाला कााही देणेघेणे दिसत नाही. राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात कडेकडेने रवाना झाली, ती आता लोकांच्या विस्मृतीतही गेली आहे. या परिस्थितीत काँग्रेस अजूनही आपल्याच मनोराज्यात रमलेली दिसते. शरद पवार यांनी वर्णन केल्याप्रमाणे वैभव गमावलेल्या गर्विष्ठ जमीनदाराप्रमाणे काँग्रेसची वागणूक दिसते.

टिप्पण्या