- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तेरे बीन छलिया रे....
----
विखे पाटलांनीही घातली जुन्या मित्राला साद
----
महेश राजे
नांदेड ः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यापासून ते अब्दुल सत्तार यांच्यामाध्यमातून अशोकरावांना फितवण्याचे प्रयत्न वारंवार झाले; परंतु ते बधले नाहीत. तरीही विद्यमान सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अलिकडेच अशोकरावांचे खानदानी मित्र राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्यांना साद घातली आहे. त्यांना अशोकरावांनी 'तुम्ही मित्र आहात की शत्रू' असा प्रतिप्रश्न करीत 'प्रवाहात मिसळून सामान्य होण्यापेक्षा विरुद्ध दिशेने पोहोत असामान्य' होण्याला प्राधान्य दिल्याचे दिसते. 'काँग्रेसमुक्त भारत' करण्याची जी बासरी भाजपाने वाजवायला घेतली ती अशोकरावांविना सूर पकडत नाही, असे लक्षात आल्यामुळेच ही चोहोबाजुंनी फिल्डींग लावली जात असल्याचे दिसते.
'हम दुसरी की लाईन छोटी नहीं करते, खुद की लंबी खिंचते हैे'
हा डायलाॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सादर करीत असतात; परंतु वास्तवात महाराष्ट्रात विरोधी पक्षांचे अस्तित्वच संपवायच्या वेडाने भाजपाला झपाटल्याचे दिसते. मोदी युगाचा उदय झाल्यानंतर मागील सात-आठ वर्षात भाजपाने महाराष्ट्रात अनेक पक्षांतील दिग्गजांची नाराजी हेरुन आपल्यात सामावून घेतले. नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, राधाकृष्ण विखे पाटील, मोहिते पाटील अशी काही प्रमुख व ठळक नावे घेता येतील. याशिवाय जिल्हास्तरावर देखील विविध पक्षांमध्ये फुट पाडली.
2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्यापासून बदला घेण्याच्या वेडाने फडणवीसांना झपाटलेे होते. त्यांना आयती संधीही साधून आली आणि त्यांनी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उभी फूट घडवून आणली. आता तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुुळे शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हंही उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावले गेले आहे. 2024 च्या निवडणुका जसजशा जवळ येवू लागल्या आहेत, तसे पक्षफोडीचे उद्योगही झपाट्याने सुरु झाले आहेत.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला खिंडार पाडले असले तरी मराठवाड्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे मरााठवाड्याचे नेतृत्त्व करतात. महाराष्ट्रातही त्यांना मानणारे अनेक नेते आहेत. भाजपापुढे आता एकमेव आव्हान आहे ते अशोकराव चव्हाण यांच्या निष्ठेला गदगदा हलवण्याचे; परंतु हेडमास्तरांचा हा पोरगा काही केल्या बधायला तयार नाही.
''शाखों से गीरकर दूट जाऊ, मैं वो पत्ता नही,
आंधीयों से कह दो की अपनी औकात में रहें''
अशा भाषेत ते आपल्याला काँग्रेसपासून तोडू पाहणाऱ्यांना इशारे देत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील जे की चव्हाण कुटुंबियांचे खानदानी मित्र आहेत. अर्थात राधाकृष्ण विखे पाटील यांचे पिताश्री बाळासाहेब आणि शंकरराव चव्हाण यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. तेच पुढच्या पिढीत कायम राहिले. अशोकरावांच्या मंत्रिमंडळात विखे पाटील यांना मानाचे स्थान होते. परंतुु राजकीय संक्रमणात विखे पाटील यांनी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करुन भाजपात सामान्य मनसबदारी स्वीकारली. तेच आता काँग्रेस पक्ष बडा घर पोकळ वासा राहिल्याचा उपदेश अशोकरावांना करीत आहेत.
भाजपाचे उद्दिष्ट त्यांनी वारंवार जाहीरपणे मांडले आहे. लोकसभेत 500 जागांचा विक्रमी आकडा गाठायचा त्यांचा मनसुबा आहे. तर राज्यात विक्रमी बहुमताने निवडून येण्याचा इरादाही त्यांनी लपवलेला नाही. काँग्रेसमुुक्त भारत हे त्यांचे स्वप्नं त्यांनी विविध भाषांमध्ये वारंवार बोलूून दाखविले आहे. महाराष्ट्रात मात्र यासाठी अशोकराव चव्हाण मोठा अडथळा ठरत आहेत. शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अशोकराव वेळेत उपस्थित राहू शकले नाहीत. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान करीत काँग्रेसमध्ये गदारोळ माजवण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही एका मुुलाखतीत ठाकरे सरकारच्या कोणत्या मंत्र्याची तुम्हाला तुमच्या मंत्रिमंडळात उणिव जाणवत आहे, असा प्रश्न विचारला असता त्यांनीही अशोकरावांकडे कटाक्ष टाकत उत्तर देण्याचे टाळले होते. अशा विविध प्रसंगी अशोकराव भाजपावासी होणार, असा गैरसमज पसरवून चर्चा घडविण्यात आल्या. अलिकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अशोकरावांना साद घातली. त्यावर प्रतिक्रिया देताना मात्र अशोकराव आक्रमक झाले आणि काहीसे चिडल्याचेही दिसून आले. तुम्ही माझे मित्र आहात की शत्रू अशा शब्दांत त्यांनी विखे पाटलांना झापले.
''वहम से भी अक्सर टूट जाते हैं रिश्ते,
कसूर हर बार गलतीयोंका नहीं होता''
प्राप्त परिस्थितीत अशोकराव काँग्रेस सोडतील, असा समज विखे पाटलांना झाला असावा, त्यातूनच त्यांनी अशोकरावांना आवाहन केले असावे किंवा त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणी असावा; परंतु आपण प्रवाहाच्या विरोधात पोहणार असल्याची भूमिका सध्या तरी अशोकरावांनी घेतली आहे.
---
अशोकरावच का हवेत
अशोकराव ज्या जिल्ह्याचे नेतृत्व करतात त्या नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे नऊ मतदारसंघ आहेत. शिवाय नांदेड लोकसभेसह हिंगोली व लातूर या मतदारसंघाचा काही भाग आहे. शिवाय हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांतही अशोकरावांचा प्रभाव आहे. विदर्भातही अशोकरावांना मानणारे अनेक नेते आहेत. त्यामुळे अशोकरावांना फोडण्यात यश मिळाले तर लोकसभा व विधानसभेचे उद्दिष्ट गाठणे अवघड नाही, अशी भाजपेयींची खात्री असून त्यातूनच त्यांनी अथक प्रयत्न चालविल्याचे दिसून येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा