'शांतीदुतां'मुळे 'आनंद निलयम'ची शांती भंग!

'शांतीदुतां'मुळे 'आनंद निलयम'ची शांती भंग
-----
पारव्यांच्या उच्छादामुळे बहुमजली इमारतधारक त्रस्त
------
महेश राजे
नांदेड ः शांतीचे प्रतिक म्हणून कबुतराची ओळख आहे. पूर्वीच्या काळी संदेशवाहक म्हणूनही कबुतरांचा वापर केला जात असे; परंतु अलिकडच्या काळात शहरातील बहुमजली इमारतधारक या कबुतर किंवा पारव्यांच्या उच्छादामुळे अक्षरशः त्रस्त झाले आहेत. माजी मुख्यमंत्री दस्तुरखुद्द अशोकराव चव्हाण हे देखिल पारव्यांना वैतागले आहेत. त्यापासून बचावासाठी त्यांनी आपले आनंदनिलयम हे निवासस्थान जाळीने आच्छादित केले आहे.
डौलदार पक्षी
कबुतर दिसायला अतिशय सुंदर व डौलदार असते. पाळीव पक्षांत त्याची गणना होते. सर्व प्रकारचे व सर्व रंगांचे कबुतरं पहायला मिळतात. प्रामुख्याने पांढरे, विटकरी तसेच करड्या रंगांचे कबुतरं आपल्या महाराष्ट्रात आढळून येतात. बुद्धिमान पक्षी अशीही त्याची ओळख आहे. वादळ आणि भूकंपाची चाहूल त्यांना चटकन लागते. तो रस्ता विसरत नाही. त्यामुळे पाळीव असूनही त्याला पिंजऱ्यात ठेवण्याची गरज भासत नाही. 3 ते 4 हजार किलोमीटर प्रवास करुनही ते नेमक्या जागी परतू शकते.
संदेशवाहक
पूर्वीच्या काळी जेव्हा टपाल व्यवस्था विकसीत झाली नव्हती, तेव्हा कबुतर संदेशवहनाचे काम करत. प्रेमाचे प्रतिक म्हणूनही कबुतर प्रसिद्ध आहे. जुन्या हिंदी सिमेमांत प्रेमी युगुल आपसात सदेश पोचवण्यासाठी कबुतराचा वापर करीत असत. अलिकडच्या काळात मैने प्यार किया या 1989 साली प्रदर्शित झालेल्या आणि तुफान लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटात कबुतर प्रचंड भाव खावून गेले. 'पहिले प्यार की पहिली चिठ्ठी साजन को दे आ', अशी विनवणी नायिका कबुतराला करते, हे गाणेही सुपरडुपर हिट झाले होते. त्याकाळी कबुतर पाळण्याचे फॅड प्रचंड रुजले होते.
महानगरांत उपद्रव 
कबुतर हा पक्षी निसर्गाची अतिशय सुंदर निर्मिती असला तरी शहरवासियांसाठी तो डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यातल्या त्यात शहरातील बहुमजली इमारतधारक कबुतरांच्या उच्छादाने अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मोबाईलच्या रेडिएशनमुळे एकीकडे चिमणी, पोपट हे पक्षी शहरवासियांना पारखे होत असताना कबुतरांचे प्रजजन मात्र प्रचंड असून कबुतर एकावेळी एक ते तीन अंडी देते. त्याचे वयोमानही 6 ते 10 वर्ष असते. कबुतरांचे निवासस्थान झाडांच्या डोली असल्या तरी शहरी भागात बहुमजली इमारतीत सपाट जागेवर घरटे करुन त्यात ते अंडी देतात. 
हानीकारक
कबुतरांचा कचरा, विष्ठा मानांसाठी हानवीकारक आहे. म्हणूनच कबुतरांची विष्ठा साफ करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. साफसफाई करताना फक्त हातमोजेच नाही तर मास्क, कव्हर शूज आणि पँट आणि पूर्ण बाह्यांचा टाॅप घालूनच स्वच्छ करावी. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांनी कबुतरांची विष्ठा साफ करु नये. नकळतपणे आजार पसरण्याची भिती असू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगली पाहिजे. 
बंदोबस्त
बहुमजली इमारतधारकांपैकी ज्यांना शक्य त्यांनी संपर्ण ईमारतीला जाळीने आच्छादन्याचा पर्याय निवडला आहे. हा उपाय प्रचंड खर्चिक असला तरी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. याशिवाय कबुतरांना व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा वास अजिबात आवडत नाही.त्यामुळे या दोन गोष्टींचे मिश्रण करुन बाटलीमध्ये स्प्रे तयार केला आणि ज्या ठिकाणी कबुतरे येतात त्या ठिकाणी फवारणी केल्यास कबुतरांचा उपद्रव थांबतो. शिवाय कबुतरांना दालचिनीचा वासही आवडत नाही. त्यामुळे पाण्यात दालचिनी टाकून ते शिंपडल्यास कबुतरं त्या ठिकाणी येत नाहीत, असेही सांगितले जाते.

टिप्पण्या