बँकांनो अब्रू सांभाळा, सोशल मिडियावर होतोय शिमगा

बँकांनो अब्रू सांभाळा, सोशल मिडियावर होतोय शिमगा
-----
अनेक बँकांच्या व्यवहारात तांत्रिक समस्यांमुळे ग्राहक हैराण
-----
नांदेड ः बँक ऑफ महाराष्ट्रचे सर्वर आठवड्यातून दोन वेळेस तरी पूर्ण क्षमतेने काम करत नाही. याची तक्रार निवारण मंचाकडे कारायला जावे तर तो कायम व्यस्त असतो, ऑनलाईन पेमेंटही होत नाही. एटीएमचा पर्याय वापरावा तर त्यात पुरेशी रोकड नसते. यामुळे  असंख्य ग्राहक नाहक मनस्ताप सहन करताना दिसतात. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक राजेश दुर्गे यांनी वैतागून या बँकेच्या कारभाराचे वाभाडे फेसबुकवर जाहीरपणे काढले आहेत.
एकीकडे 5 G  तंत्रज्ञान स्वीकारल्याचे पंतप्रधान अभिमानाने सांगतात; परंतु त्याचवेळी विविध बँकांमध्ये नेटवर्किंगची गंभीर समस्या जाणवते. 'सर्व्हर डाऊन'च्या समस्येने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय अनेक बँकांमध्ये 'कस्टमर इज किंग' या संकल्पनेला हरताळ फासून 'सौजन्याची ऐसी तैसी' केली जाताना दिसते. बँकींगशी संबंधित समस्यांची तक्रार कोणाकडे करावी, या गोंधळातील ग्राहकांनी आता सोशल मिडियावर शिमगा करायला सुरवात केली आहे.
देशभरात दैनंदिन होणारा प्रत्येक व्यवहार पारदर्शी व्हावा, असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आग्रह आहे. त्यासाठी काही उघड तर काही छुपे फंडे वापरले जात आहेत. शासकीय योजनांचा लाभ, रोहयोची मजुरी, पिकांची नुकसान भरपाई, पीकविमा, विविध योजनांच्या सबसिडी, निराधारांचे अनुदान अशा सर्व रकमा संबंधितांच्या खात्यावर जमा होत आहेत. त्यासाठी पाच वर्षांपूर्वी  जनधन खाते उघडण्यात आले. परिणामी प्रत्येक कुटुंबातील एका तरी व्यक्तीचा बँकेशी संबंध येतोच. अनेक कुटुंबातील तर प्रत्येक सदस्याचे बँकेत खाते आहे. त्यामुळे मागील दशकभरात बँकांत कायम वर्दळ दिसून येते.
बँकाही 25 हजारापेक्षा कमी रक्कम रोखीने देण्याचे शक्यतो टाळतात. तर दुसरीकडे एटीएम मध्येही पुरेशी रोकड नसते किंवा ते चालत तरी नाहीत. अशा परिस्थितीत, नेटबँकींग करावी तर सर्व्हर डाऊन, पेटीएम, गुगलही ऐनवेळी अडथळा निर्माण करतात. दुसरीकडे काल-वेळबद्ध कामांचा खोळंबा होतो. यामुळे ग्राहक अक्षशः वेठीस धरला जात आहे. श्री दुर्गे यांनी स्वतःचा स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रशी संबंधित अनुभव फेसबुकवरुन शेअर केला आहे. अर्थात या माध्यमा्तून त्यांनी बँकेच्या कारभाराचे धिंडवडे कााढले आहेत.
सदर उदाहरणावरुन सर्वच बँकांनी बोध घेवून यंत्रणा अधिक गतीमान करण्याची गरज आहे. प्रशासन गतीमान करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालयाचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याच धरतीवर बँकांच्या ठराविक शाखांतील गर्दी कमी व्हावी यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच नेटवर्किंग अधिक प्रभावी होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
----
सौजन्याची ऐसी तैसी
विविध बँकांतील काही कर्मचारी त्यांच्या उद्धटपणासाठी प्रसिद्ध आहेत. या कर्मचाऱ्यांचा स्वतःच्या बाबतीत काहीतरी मोठा गैरसमज दिसून येतो. ग्राहकांशी फटकून वागणे, सरळ भाषेत न बोलणे, कामे खोळंबून ठेवणे, यात काही जणांना बहुदा असूरी आनंद होतो. भलेभले बँकींगमध्ये गोंधळतात तिथे ग्रामीण भागातील भोळ्याभाबड्या जनतेचे काय, त्यांच्याशी सौजन्याने वागण्याची गरज आहे. बँक व्यवस्थापनांनी त्यासाठी प्रशिक्षण शिबीरं आयोजित केली पाहिजेत, असा अनेक जाणत्या ग्राहकांत मतप्रवाह आहे.

टिप्पण्या