सेनेची वाटचाल ते वाताहत ः उलगडेल भुजबळांची मुलाखत

सेनेची वाटचाल ते वाताहत ः उलगडेल भुजबळांची मुलाखत
-----
आरक्षण, अर्थसंकल्प ते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता
---------
महेश राजे
नांदेड ः शिवसेना ते राष्ट्रवादी काँग्रेस व्हाया काँग्रेस असा प्रवास करणारे, तब्बल 75 उन्हाळे अनुभवणारे ज्येष्ठ नेते छगनराव चंद्रकांत भुजबळ दि. 19 रोजी नांदेडमध्ये मनसोक्त व्यक्त होतील. 1961 पासून शिवसेना माझगाव (मुंबई) शाखाप्रमुख येथून आपला राजकीय प्रवास सुरु करणारे श्री भुजबळ सेनेची वाटचाल ते आजचा दुभंग हे संक्रमण उलगडतील. तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, राजकारणाचा घसरलेला दर्जा, देशाचे राजकारण, मराठा, धनगर आरक्षण,. ओबीसींपुढील आव्हाने आदी विषय भुजबळांच्या दृ्टीतून नांदेडकरांना समजावून घेता येणार आहेत.
निमित्त आहे श्री भुजबळ यांच्या प्रकट मुलाखतीचे आणि औचित्य आहे त्यांच्या अमृत महोत्सवी आयुर्मानाचे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळून अभ्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर हे श्री भुजबळ यांना बोलतं करणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या साक्षीने पंचाहत्तरीतील हा ढाण्या वाघ काय आणि कशा डरकाळ्या फोडते आणि नजिकच्या काळात त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणे रंजक असेल. (स्व.) गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर खंबीर ओबीसी नेतृत्व म्हणून महाराष्ट्र श्री भुजबळ यांच्याकडे पाहतो. 
15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर बरोब्बर दोन महिन्यांनी 15 ऑक्टोबर 1947 रोजी छगन भुजबळ यांचा जन्म झाला. मुंबईतील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्टिट्यूटमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिरिंगमधील पदविका घेतली. राजकारणात येण्यापूर्वी ते शेती व शेतीवर आधारित व्यवसाय करत होते. 1961 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जाहीर सभा शिवाजी पार्कात झाली. त्यावेळी ऐन विशीत असलेले भुजबळ मित्रांसमवेत या सभेला उपस्थित राहिले आणि बाळासाहेबांच्या प्रभावाने शिवसैनिक झाले. 
माझगावचे शाखाप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. हा त्यांचा राजकीय जन्म. पुढे 1973 मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडमून गेले. तेव्हापासून 1984 पर्यंत ते महापालिकेतविरोधी पक्षनेता म्हणून कार्यरत होते. शिवसेनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात अर्थात 1985 मध्ये ते महापौर झाले. पुढे 1991 मध्ये विरोधी पक्षनेेता पद मनोहर जोशींकडे गेल्याने नाराज भुजबळांना आमदार असताना दुसऱ्यांदा महापौर करण्यात आले. दरम्यान, 1985 मध्ये प्रथम ते माझगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1990 मध्ये सलग दुसऱ्यांदा त्यांचा विजय झाला. महापौर म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडलीच परंतु आमदार म्हणूनही त्यांची कामगिरी लक्षणीय होती. 
दुसऱ्या टर्ममध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी अनेक महत्वाचे विषय लावून धरले आणि ते शरद पवारांच्या नजरेत भरले. मंडल आयोगाच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे टोकाचे मतभेद झाले आणि त्यांनी 18 आमदार बरोबर घेत शिवसेना सोडली. हे शिवसेनेतील पहिले बंड. शरद पवार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे 1999 मध्ये श्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते राष्ट्रवादी मध्ये गेले आणि या पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले. तेव्हापासून आज 31 वर्ष ते येथेच स्थायिक आहेत. 
अलिकडे  राष्ट्रवादीत बंडाळीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे भुजबळ यांच्या भूमिकेबाबतही दबक्या आवाजात चर्चा होताना दिसते. श्री भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले होते. तेव्हाही भुजबळांच्या बाबतीत चर्चेला उधाण आले होते. मागील आठ वर्षात राज्याच्या व देशाच्या राजकारणाने एकदमच यू टर्न घेतला आहे. भाजपाच्या झंजावातापुढे प्रादेशिक तसेच छुप्या मालकी तत्वावर चालविल्या जाणाऱ्या पक्षांची अवस्था बिकट झाली आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेची दोन शकलं झाली. पक्ष आणि चिन्हं ठाकरे कुटुंबाच्या  हातूून निसटले आहे.
राज ठाकरे पुन्हा नव्या जोशाने मैदानात उतरले आहेत. इकडे एमआयएम पाठोपाठ तेलंगणातील  भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात चंचूप्रवेश केला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेने संभाजी ब्रिगेड व वंचित बहुजन विकास आघाडीसोबत युती केली आहे. अलिकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही श्री ठाकरे यांची भेट घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर श्री भुजबळ आपली रोखठोक मते व्यक्त करतील अशी अपेक्षा आहे.
-----
ईडी, आयटी, सीबीआय यांचे काय? 
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तुरुंगवास भोगून सध्या जामिनावर मुक्त असलेले छगनराव भुजबळ ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या केंद्रीय संस्थांच्या बाबतीत काय मत मांडतात, हे पाहणेही महत्वाचे ठरेल. शिवाय आगामी निवडणुकांबाबत त्यांचे काय आडाखे आहेत, याचाही आदमास श्रोत्यांना घेता येईल.

टिप्पण्या