प्रचंड गारपीटऽऽऽ छे ऽऽऽ अघोरी मारपीट

प्रचंड गारपीटऽऽऽ छे ऽऽऽ अघोरी मारपीट
-----
मूग,हरभरा, गेल्या कैळी कैऱ्या ः निर्दया सूड उगवलासच वैऱ्या...
--------------
महेश राजे
नांदेड ः हाय रे दैवा.... निसर्ग कोपला कुलाबा वेधशाळेचा अंदाज अखेर खरा ठरला आणि बळीराजा फक्त नावापुरताच उरला. केळी गेली कैऱ्या पडल्या, भूमईमुग सडला, हरभरा झोपला, शेतकऱ्यांचा कणाच मोडला. पाडव्याची वाट पाहणाऱ्या कृषकांनी गुढी उभारावी आनंदाची की, सुतकाची.
न भूतो गारा....
मार्च महिन्याच्या सुरवातीलाच निसर्गाचा मूड बदलला होता. अवकाळीची अपेक्षा होतीच. राज्याच्या इतर भागात यापूर्वीच अवकाळीने तडाखा दिलाय. मराठवाड्यात गारपिटीचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला होताच; परंतु एवढी प्रचंड गारपीट पाहिली नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथे तर गारांचा अक्षरशः खच पडला होता. त्यानंतरही पाऊस सुरुच होता.
पत्र्यांचे झाले पतंग...
गारपिटीसोबतच सोसाट्याचा वाराही होता. गुरुवारी दुपारपर्यंत वातावरण सामान्य होते. ढगाळ वातावरणामुळे पावसाचा अंदाजही होता. दुपारनंतर मात्र अचानकच बदल होऊन अगोदर वारा सुटला आणि पाठोपाठ पाऊस व गारा कोसळायला लागल्या. वाऱ्याचा जोर एवढा होता की त्याने धडकी भरवली. घरावरील पत्र्यांचे अक्षरशः पतंग झाले. नांदेड-भोकर महामार्गावरील पोलीस चौकीत देखिल घबराट पसरली.
तोंडचा घास हिरावला...
मूग, हरभरा, गहू, ज्वारी व अन्य पीकं काढणीला आली होती. परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. झाडांना कैऱ्या मोठ्या प्रमाणात लगडल्या होत्या. त्यामुळे यंदा आंहब्याचा दरही स्वस्त राहील आणि रसाळीची मजाही येईल, अशी स्वप्नं रंगवली जात होती; परंतु गुरवारच्या गारपीटीसह वादळी वाऱ्याने गारा पडाव्यात तसा कैऱ्यांचा सडा पडला. उद्या शुक्रवारच्या बाजारात ह्याच कैऱ्या कवडीमोल दराने विकल्या जातील.
बहुतांश जिल्हा व्यापला...
अवकाळी पाऊस ठराविकच भागात पडला असे नाही तर ठराविक भाग वगळता सर्वत्र हा पाऊस झाला. गारा मात्र काही ठिकाणीच झाल्या. अर्धापूर, मुदखेड, भोकर, देगलूर, कंधार, लोहा, या भागात अवकाळी पाऊस बराच वेळ बरसला. काही ठिकाणी या पावसाने नुकसान झाले नसले तरी आरोग्यावर संकट आहे; परंतु काही ठिकाणी मात्र गारांच्या माऱ्याने केळी व आंब्याचे प्रचंड नुकसान झाल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.
टरबूज, खरबुजांचे नुकसान...
उन्हाळ्यात प्रचंड उकाड्यापासून दिलासा देणारी फळं म्हणून टरबूज,खरबुजांना मोठी मागणी असते. नांदेड जिल्ह्यात हे पारंपरिक पीक नसले तर नगदी पीक म्हणून अनेक होतकरु शेतकरी दरवर्षी टरबुज, खरबूज व काकडीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. पण, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टरबुज व खरबुज जागेवरच फुटल्याची माहिती आहे.
----
केळी निसवली, स्वप्नं उसवली
सध्या बाजारात केळी 60 रुपये डझन या दराने विकली जात आहे. इथून सणावारांची मांदियाळी सुरु होते. उपवासांची रेलचेल असल्याने केळीला भावही चांगला मिळतो. पाण्याची मुबलकता असल्याने मुदखेड, अर्धापूर या भागात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पण, गुरुवारच्या गारपीटीने केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाने तर फाटलीच परंतु निसवलेले घड गारपिटीने प्रचंड जखमी झाले आहेत. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

टिप्पण्या