काल स्वप्नं... आज अश्रू ....
-------------------------
केळी, आंबा, टरबूज, खरबूज, मोसंबीचा बाजार उठला
-----
गहू, हरभरा, ज्वारी, टोमॅटो, भाजीपाला, हळद मातीमोल
-----
मोगरा, काकडा, जर्बेरा, निशिगंध, शेवंतीची दुर्गंधी
------
नांदेड ः गेल्या पावसाळ्यात मुबलक पाऊस झाला. हंगामात अनेकवेळा अतिवृष्टी होऊन शेती खरडून गेली. प्रचंड नुकसान झाले. त्याचे कवित्व पीकविमा, कर्जमुक्ती, नुकसान भरपाई, या माध्यमातून अय़जूनही सुरु आहे. हिवाळ्यात जेमतेम थंडी होती. त्यामुळे पिकांची उत्पादकता घटली. आता खरिपापूर्वीच्या पिकांवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गाढवांचा नांगर फिरविला. पाण्याच्या उपलब्धतेमुळे कालपर्यंत पिकांची वाढ दृष्ट लागण्यासारखी होती. त्यामुळे शेतकरी दररोज स्वप्नं रंगवत होता. परंतु काल एवघ्या दिड तासात होत्याचे नव्हते झाले आणि स्वप्नांची जागा अश्रुंनी घेतली. आता या अश्रुंची फुले होतात की अंगारे, हे शासनाच्या भूमिकेवर अवलंबून आहे.
अर्धापूर, मुदखेडला फटका
गुरुवारी (दि. 16) दुपारनंतर झालेल्या न भूतो स्वरुपाच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीने नांदेडला चांगलेच झोडपले आहे. सर्वाधिक फटका बागायतीचा पट्टा असलेल्या अर्धापूर व मुदखेड तालुक्याला बसला असून महागडी नगदी पीकं जमीनदोस्त झाली आहेत. फळ व फूल बागांचेही प्रचंड नुकसान झाले असून घरांची अंशतः पडझड व काही जनावरेही दगावली आहेत.
भोेकरमध्ये तीन गावे बाधित
उन्हाळ्याच्या प्रारंभी दरवर्षीच नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसतो. अनेकवेळा गारपीटही होते. परंतु ती साधारण एप्रिल ते मे महिन्यात होते. परंतु यंदा मार्चचा पहिला पंधरवडा उलटत नाही तोच अवकाळीने जबरदस्त तडाखा दिला आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात अवकाळीने अक्षरशः हैदोस घातला. भोकर तालुक्यातील केवळ तीन गावात खरबी, चिदगीरी व डोरली या भागात जवळपास 22 ते 23 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली.
मुदखेडला जबर तडाखा
मुदखेडमध्ये मात्र सर्व प्रकारचे नुकसान झाले आहे. तब्बल 5 हजार 665 हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. 7 हजार 750 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरची पत्रे उडून गेली आहेत. शिवाय कच्च्या घरांचेही नुकसान आहे. साधारण 250 घरं अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने बाधित झाली आहेत. 11 जनावरे दगावली असून 18 जनावरे जखमी आहेत. शिवाय 15 व्यक्तींनाही जखमा झाल्या आहेत. केळी, गहू, हरभरा, ज्वारी यासह फूलशेती व टरबूज, खरबुज तसेच हळदीचे प्रचंड नुकसान झाले आहे, अशी माहिती नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी दिली.
नांदेडमध्ये हजार हेक्टरचे नुकसान
नांदेड तालुक्यात एक हजार 65 हेक्टरवरील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. 12 गावांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने धुमाकूळ घातला. काही प्रमाणात फळपिकांचे नुकसान झाले असून प्रामुख्याने कैऱ्यांची प्रचंड प्रमाणात पडझड झाल्याची माहिती तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली. याशिवाय काही प्रमाणात केळी, हरभरा व गव्हाचे नुकसान झाले. मोठी झाडे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला.
अर्धापूरमध्ये
अर्धापूर तालुक्यातही अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बारड ते पाटनूर या पट्ट्यात गारपीटीने अक्षरशः हैदोस घातला. केळीची पाने तर फाटलीच परंतु झाडेच्या झाडे जमीनदोस्त झाली आहेत. यंदा केळीला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी चांगली स्वप्नं रंगवली होती. त्याची राखरांगोळी झाली. त्याचप्रमाणे टोमॅटो, टरबुज, खरबुज या फळ पिकांचे तसेच भाजीपाल्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या तालुक्यात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले क्षेत्र 543 हेक्टर असून पैकी 25 हेक्टरवर फळपीकं होती.
-------
अशोकराव चव्हाण यांच्याकडून पाहणी
काल नांदेडात दाखल झालेल्या अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरु केली. अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील विविध गावांना त्यांनी भेटी दिल्या. बारड व पाटनूर येथे प्रत्यक्ष शेतात जावून त्यांनी झालेल्या नुकसानीचा अंदाज घेवून प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या. शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, त्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल,असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत श्रीजया चव्हाण या देखील होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा