अण्णांचा पवारांना 'सायोनारा'

अण्णांचा पवारांना 'सायोनारा'
-----
'आदिवारम बीआरएस लो प्रवेशम्'
-----
महेश राजे
नांदेड ः हुश्श.... सुटले एकदाचे अण्णा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 'सायोनारा' करीत येत्या रविवारी ते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहेत. लोहा येथील बैल बाजार मैदानात पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. अण्णांच्या सोडचिठ्ठीमुळे जिल्ह्यात अगोदरच कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला एकप्रकारे धक्का बसला आहे.
संयमी राजकारणी म्हणून शंकरअण्णा धोंडगे यांची ओळख आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या निधनानंतर अण्णांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये ते घड्याळाच्या चिन्हावरच विधानसभेत निवडून गेले. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधात अशोकराव चव्हाण यांचे अण्णांना सहकार्य होते; परंतु 2014 च्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढता. त्यात शिवसेनेतर्फे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बाजी मारली. शंकरअण्णा पराभूत झाले. तर 2019 मध्ये शंकरअणांचे सुपूत्र दिलीप धोंडगे यांनी निवडणूक लढवली; पण ते पराभूत झाले. शेतकरी कामगार पक्षातर्फे श्यामसुंदर शिंदे विजयी झाले. 
दरम्यान 2019 च्या निवडणुकीनंतर धक्कादायक राजकीय संक्रमण होवून शिवसेनेने युती सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत घरोबा केला आणि सत्ता हस्तगत केली. अडीच वर्षानंतर हे सरकार कोसळले; परंतुु महाविकास आघाडी कायम राहिली.त्यामुळे आगामी निवडणुकीत जागावाटप अनिश्चित आहे. शिवाय मागील 10 वर्षांत अण्णांचे पुनर्वसन करण्याकडे राष्ट्रवादीने लक्ष दिले नाही. स्थानिक पातळीवर टोकाचा विरोध असताना कोणतेही राजकीय अधिष्ठान नसेल तर प्रवाहात टिकून राहणे अशक्य आहे. या परिस्थितीत अण्णांची घुसमट होत होती. तब्बल 10 वर्ष ही कळ सोसूनही भविष्यावर अऩिश्चिततेची काजळी असल्याने अण्णांनी थेट 190 अंशात भूमिका बदलली आणि तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीला आपलेसे केले. 
भारत राष्ट्र समितीने नांदेडमधून चंचूप्रवेश केला.असून पक्षाची झपाट्याने वाढ होण्यासाठी एखाद्या प्रस्थापित मराठा नेत्याची या पक्षाला नितांत गरज होती. ती शंकरअण्णांच्या रुपाने पूर्ण झाली. नांदेड जिल्हा तेलंगणाच्या सीमेवर असून इथे एकवेळ बीआरएस स्वप्नं पाहू शकते; परंतु संपूर्ण राज्यात पक्षाची पाळेमुुळे घट्ट रोवण्यासाठी या पक्षाला खूप परिश्रम करावे लागणार आहेत. त्यासाठी संपूर्ण जबााबदारी शंकरअण्णांवर सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
दरम्यान, शंकरअण्णांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी दिलीप धोंडगे हे पुन्हा एकदा विधानसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. 2019 मध्ये ते पराभूत झाले असले तरी युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिवाय मतदारसंघात त्यांची ओळखही आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारी चालवल्याचे सांगण्यात येते. रविवारी अधिकृतरित्या शंकरअण्णांनी कारची सवारी केल्यानंतर आगामी जेमतेम वर्षभरात जिल्हा पिंजून काढून ते पक्षाचा कसा विस्तार करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
-----
'अण्णा दी कॅर दिल्लीवरकु पोतुंदि'
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शंकरअण्णांनी राज्यभर आंदोलने केली असल्याने त्यांची ओळखही आहे आणि कार्यकर्ता वर्गही आहे. पक्षाला देशस्तरावर ओळख निर्माण करावयाची असल्याने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अण्णा उडी घेवू शकतात. अशोकरावांनी जर राज्यातील राजकारणालाच प्राधान्य दिले तर लोकसभा चुरशीची होवू शकते कारण युतीकडेही प्रतापराव वगळता अन्य चेहरा नाही. चिखलीकरांनाही राज्याच्याच राजकारणात रस असल्याने आगामी लोकसभेसाठी तेे कितपत तयार होतील, ही शंकाच असल्याची चर्चा आहे.

टिप्पण्या