कर्मचारी संपात... नेटकरी संतापात...

कर्मचारी संपात... नेटकरी संतापात...
------
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँडच्या निनादात टाहो की, भांडण की, जल्लोष 
-----
नांदेड ः जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संप पुकारला आहे. शुक्रवारी या संपाचा तिसरा दिवस होता. यादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपकऱ्यांनी बँड लावून आंदोलन केले. एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी ऊर पिटत असताना इकडे ढोल  पिटले जात असल्याने सामान्य नागरिकांत नाराजी दिसून आली. दरम्यान, संपकरी सहानुभूती गमावत चालल्याचे सोशल मिडियावरील पोस्ट्सवरुन दिसून येते. 
संपाची घोषणा केल्यापासूनच नेटकऱ्यांनी संपकऱ्यांबाबत अक्षरशः शिमगा सुरु केला आहे. पुरेसा पगार मिळत असताना आणि चिरीमिरी घेण्याची शरमही वाटत नसताना सुद्धा अतिरिक्त लालसेपोटी कर्मचाऱ्यांनी जे पाऊल उचलले आहे ते निषेधार्ह आहे, असा नेटकऱ्यांचा सूर आहे. काही पोस्ट संपकऱ्यांच्या बाजूने सुद्धा पहायला मिळतात. कर्मचारी वेळेचे भान न ठेवता काम करतो, ऊन-पाऊस-थंडीमध्ये त्याला कर्तव्य बजावावे लागते. कित्येक नक्षलग्रस्त भागात नोकरी करतात, राजकारण्यांच्या पगारी, निवृत्तीवेतन आणि भत्त्यांबाबत कोणी बोलत नाही, मग सरकारी कर्मचाऱ्यांच्याच नावे ओरड का, असा हा प्रतिसवाल आहे.
दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांच्.या संपाला सामान्य माणसांकडून मिळणाऱ्या शून्य पाठिंब्याबाबत कर्मचाऱ्यांनी आत्मचिंतन करायला हवे. सरकारी कर्मचारी सामान्य माणसाला टेबलवर ज्या भावनाशून्यतेने वागवतो त्याचं हे ठळक प्रतिबिंब आहे, असेही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. काही नेटकऱ्यांनी संपकऱ्यांना ट्रोल करताना तर मर्यादा ओलांडली आहे. काही जणांनी तर जुनी पेन्शन 2004 मध्ये बंद झाली असताना आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी कशी काय जाग आली असा सवाल विचारत आंदोलन मॅनेज असल्याचा आरोप केला आहे.
काही जणांनी सैन्.यातील जवान  सोडून कोणालाच पेन्शन न का देवू.. ना सरकारी कर्मचारी ना आमदार ना खासदार... अशी मागणी केली आहे. काही जणांनी संपकऱ्यांना शेतकऱ्यांचे उदाहरण दिले तर काही जणांनी व्यापाऱ्यांचे. सुशिक्षित बेरोजगार अर्ध्या पगारावर एका पायावर कामाला तयार असल्याचे डाॅयलाॅगही अनेकांनी मारले आहेत. एक ना शेकडो, हजारो पोस्ट मागील तीन दिवसांपासून सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. लोकांची सहानुभूती संपकऱ्यांच्याप्रति सुरुवातीपासूनच कमी होती, ती अजून कमी होत चालली आहे, हे या पोस्ट्सवरुन लक्षात येते.
----
बँडचे प्रयोजन काय
आनंदाच्या, उत्साहाच्या व जल्लोषाच्या प्रसंगी बँड लावला जातो. काही समाजात अंत्ययात्रेतही बँड लावण्याची पद्धत आहे. परंतु संपकऱ्यांनी बँड लावण्याचे नेमके प्रयोजन काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या माध्यमातून कर्मचारी आपल्या मागणीसाठी टाहो फोडत आहेत की हक्कासाठी भांडण करीत आहेत की कोणत्या अज्ञात कारणाचा जल्लोष करीत आहेत, हे समजायला मार्ग नव्हता.
-----
कामात व्यत्यय
गुरुवारी नांदेड जिल्ह्याच्या काही भागात प्रचंड अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे केळी, आंबे यासह अनेक नगदी व हंगामी पीकं मातीमोल झाली. शेतकरी प्रचंड दुःखात आहे. नेमके कुठे आणि किती नुकसान झाले याबाबत मुंबईस्तरावरुन व्ही.सी.द्वारे माहिती घेतली जात होती. अधिकारी मंडळी सतत बैठका व माहिती जमविण्यात गुंतले असताना या बँडचा टिपेला पोचलेला आवाज कामात व्यत्यय आणत होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना बोलावून समज दिल्याचे समजते.

टिप्पण्या