नवमतदारांना आता अधिक प्रतीक्षेची गरज नाही

नवमतदारांना आता अधिक प्रतीक्षेची गरज नाही
........
आता वर्षातून चार वेळा मतदार यादी नाव नोंदी होणार
........
वार्ताहर/नादेड : नवयुवक 18 वर्षार्चा झाल्यानंतर त्याला प्रत्यक्ष मतदार यादीत नाव येण्यासाठी आता दीर्घ प्रतीक्षा करण्याची गरज उरली नाही. वर्षातून चार वेळा मतदार यादीत नाव येण्याची सुविधा केंद्रीय निवडणूक आयोगाने करुन दिली आहे.
अॅडव्हान्स टेक्नाॅलाॅजीसोबत अॅडव्हान्स मतदार नोंदणी हा उपक्रम आता नवीन वर्षापासून आयोगाने हाती घेतला आहे. त्यानुसार नवयुवकाने वयाचे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर मतदार यादीत नाव नोंदवायचे आहे. यानंतर वर्षातून ज्या तारखा आयोगाने निश्चित केल्या आहेत. त्यातील जवळच्या तारखेला संबंधित नव मतदाराचे नाव मतदार यादीत येऊन नजिकच्या कोणत्याही निवडणुकीत त्याला मतदान करता येईल. यामुळे नवीन मतदारांचे नावनोंदणीचे प्रमाण वाढू शकेल, असा विश्वास आयोगाला आहे. हा कार्यक्रम दि. 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होत आहे.

मतदारयादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम दि. 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर सुरु होतो. त्यामुळे त्यानंतर एखाद्याला 18 वर्ष पूर्ण झाले असल्यास त्याचे नाव मतदार यादीत येण्यासाठी पुढील 1 जानेवारीची प्रतीक्षा करावी लागत असे. यामुळे नव्याची नवलाई संपून जात असे. पण, आता आयोगाने नवयुवकांचे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी विशेष कार्यक्रम आखला असून युवकाने वयाचे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर लगेचच नावनोंदणी केल्यास त्याचे नाव मतदार यादीत येण्यासाठी वर्षातून चार संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यानुसार दि. 1 जानेवारी, दि. 1 एप्रिल, दि. 1 जुलै व दि. 1 आॅक्टोबर अशा चार तारखा निश्चित करुन दिल्या आहेत. त्यामुळे आता मतदार यादीत नाव येण्यासाठी नवयुवकाला दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

निवडणूक आयोगाने दि. 9 नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम निश्चित केला असून मतदारांना प्रत्यक्ष कार्यालायत जावून अर्ज क्र. 6 भरुन देता येणार आहे. दरम्यान, अॅडव्हान्स टेक्नाॅलाॅजीचे युग असल्याने आॅनलाईन पद्धतीने देखील अर्ज सादर करता येणार आहे. www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयळे-कुलकर्णी यांनी सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा