मोदींचे 'मी' पण धोकादायक -भुजबळ

मोदींचे 'मी' पण धोकादायक -भुजबळ
---
अभ्यासू फडणवीस विरोधी बाकावरच विश्वासू
----- 
महेश राजे
नांदेड ः पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते मनमोहनसिंघ यांच्यापर्यंत इस्रो, एअर इंडिया, एम्स अशा विविध क्षेत्रातील तब्बल 176 संस्था उभ्या राहिल्या. भाक्रा-नानगलसारखी धरणे बांधली गेली. तसे मागील 9 वर्षात कुठे काही दिसत नाही. उलट जे दिसेल ते विकण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे. शासकीय यंत्रणांचा बेछूट वापर होतोय. नोटबंदी, जीएसटीबाबत निर्णय घेताना कोणालाही विश्वासात घेतले गेले नाही. मोदींनी मनमानी चालवली आहे. त्यांचे हे मी पण देशासाठी अत्यंत धोकादायक आहे, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (दि. 19) येथे केला.
अभंग प्रकाशन व पुस्तकालयाच्यावतीने भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी आयुर्मानाचे औचित्य साधून त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी भुजबळांची प्रकट मुलाखत घेतली. दरम्यान, 'अभंग'चे संचालक संजीव कुळकर्णी यांनी भुजबळ यांचा फुले पगडी व पुस्तक देवून गौरव केला. प्रास्ताविक करताना श्री कुळकर्णी यांनी भुजबळांच्या राजकीय वाटचालीवर थोडक्यात प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी भुजबळांचा उल्लेख 'नटसम्राट' असा केला. त्याचा खुलासा मुलाखतीच्या शेवटी झाला.
माजी मुख्यमंत्री अशकोराव चव्हाण यांनी आपल्या छोटेखानी भाषणात भुजबळांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी राज्याचे माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचा त्यांना स्वारातीम विद्यापीठाने डी.लिट देवून गौरव केल्याचेऔचित्य साधत श्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भुजबळप्रेमींनी कुसुम सभागृह पूर्ण भरले होते.
श्री बर्दापूरकर यांनी काही आठवणींनी मुलाखतीला सुरवात केली. (स्व.)  बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन परस्परभिन्न व्यक्तिमत्वांबरोबर तुम्ही काम केले आहे, कोणाचा प्रभाव अधिक आहे, असा पहिलाच 'दुसरा' बर्दापूरकरांनी फेकला; परंतु तेवढ्याच तडफेने भुजबळ यांनी 'शरदराव ठाकरे', असे उत्तर देत त्या चेंडूला आसमान दाखवले. माझ्या ह्रदयात बाळासाहेब आहेत तर शरिराच्या कणाकणांत आणि विचारात शरद पवार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 
अजूनही आपल्या मनात शिवसेना असून ती त्या मातोश्रीवरील बाळासाहेबांची असल्याचे सूचक उत्तर त्यांनी दिले.
भुजबळ यांनी स्वतःच आपण जेलयात्री असल्याचे स्पष्ट केल्याने बर्दापूरकर यांचे अवघडलेपण दूर झाले आणि त्यांनी जेलमधील आयुष्य कसे घालवले, असा प्रश्न केला. त्यावेळी भुजबळ यांनी वाचनाचा छंद पूर्ण केल्याचे सांगितले. या काळात सकाळी वृत्तपत्रे आणि पुढे दिवसभर विविध पुस्तके वाचल्याचे सांगितले. महात्मा गांधी ते हिटलर ही दोन टोकाची व्यक्तिमत्त्वं अभ्यासल्याचे ते म्हणाले. शिवाय गिरीश कुबेर ते अच्युत गोडबोले चघळून पचवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जेलमधील आठवणींना उजाळा दिला. तेव्हा ते काहीसे भावूक झाले होते. सभागृहात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, कमलकिशोर कदम, ओमप्रकाश पोकर्णा, गंगाधरराव पटणे, मुक्तेश्वर धोंडगे, हरिहरराव भोसीकर, आदींसह इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्धवजींची उमेद उल्लेखनिय
उद्धव ठाकरे की राज ठाकरे या रॅपिड पद्धतीच्या उत्तरावर काहीसा पाॅज घेत त्यांनी उद्धवजींचा लढाऊ बाणा उल्लेखनिय असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, स्वतः आपण, सुधीर जोशी, नारायण राणे,दादा कोंडके असा तोफखाना होता; परंतु बाळासाहेबांनंतर शिवसेना सावरताना उद्धवजींनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. शिवसेना कधीही संपणार नाही, असा दावा करताना श्री भुजबळ यांनी साठ ते सत्तरच्या दशकात मराठी माणसांचा कसा अपमान होत होता व ते चित्र कसे बदलले, हे सोदाहरण विषद केले.
'ते' विरोधी नेतेच असावेत
1985 नंतर विरोधी पक्षनेते म्हणून कोण अधिक प्रभावी वाटतात, या प्रश्नावर श्री भुजबळ यांनी चांगला 10 ते 15 सेकंदांचा पाॅज घेतला. वास्तविक त्यांच्या जीभेवर फडणवीसांचे नाव 
आले होते; पण, सुरवातीला त्यांनी ते टाळले; परंतु नंतर अभ्यासू म्हणून त्यांनी फडणवीसांना पोचपावती दिलीच पण; ते विरोधी बाकावरच असावेत, तेव्हाच ते अधिक विश्वासू व कार्यक्षम वाटतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
संविधानाला धक्का खपणार नाही
फुले-शाहू-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र असून बाबासाहेबांच्या संविधानावर आमची श्रद्धा आहे. आडमार्गाने जर कोणी संविधानाच्या विरुद्ध जावून काम करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा जणू सज्जड दमच भुजबळांनी दिला. भाजपमध्ये गेल्यावरच सर्व केसेस बंद कशाकाय होतात, असा प्रश्न करीत शासकिय यंत्रणांच्या दुरुपयोगाबाबत त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. देशभऱातील 19 ज्यचेष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी मोदींना पत्र लिहून शासकीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे ते म्हणाले.
दिलदार विलासराव
एका प्रश्नावर उत्तर देताना श्री भुजबळ म्हणाले, आपण वेगवेगळ्या सात मुख्यमंत्र्यांबरोबर काम केले; पण सर्वाधिक स्वातंत्र्य विलासराव देशमुख यांच्याबरोबर काम करताना मिळले. बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करणे असो वा ज्वेलमर्चंट भरत शहा याच्यावर मोक्का लावण्याची कारवाई असो, ती आपण विलासरावांना न सांगता केली होती; परंतु विलासरावांनी नाराजी  तर सोडाच पण, खंबीर साथ दिल्याचे त्यांनी नमूद केले.
----
डाॅक्टरांप्रती कृतज्ञता
कारागृहात असताना आपल्याला पॅनक्रियाचा गंभीर आजार जडला; परंतु केईएमच्या डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आपल्यावर उपचार केले. त्यामुळेच आज तुमच्यासमोर उभा आहे, अशा शब्दांत त्यांनी डाॅक्टरांचे स्मरण केले. आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात केईएममध्ये प्लाझ्मा सेंटर व नायर मध्ये सिटीस्कॅन मशिन आणण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता. त्यावेळी शिकाऊ असलेले डाॅक्टर आज नामांकित झाले असून त्यांच्या निश्चयामुळेच आपल्याला  जीवदान मिळाल्याची कृतज्ञतापूर्वक नोंद भुजबळांनी घेतली.
----
वन्स बाॅस ऑलवेज बाॅस
अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना श्री भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांची केमिस्ट्री चांगली होती. दोघांच्याही हातात स्वतंत्र माईक होते, ते एकमेकांचा माईक हिसकावत नसत, अशी सूचक टिप्पणी सूत्रसंचालक प्रा. विश्वाधार देशमुख यांनी (शिंदे-फडणवीस यांच्यातील 'त्या' प्रसंगाचा उल्लेख न करता) केली होती, तो धागा पकडत भुजबळ म्हणाले, अजूनही अशोकरावांचे आणि माझे नाते सौहार्दाचे आहे. अजूनही केव्हाही समोरासमोर भेटलो तरी मी त्यांना बाॅस असेच संबोधतो, असे ते म्हणाले. भुजबळांचा हा मनाचा मोठेपणा श्रोत्यांनाही  भावला आणि त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात पोचपावती दिली. 
----
नटसम्राटाचे स्वगत
कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांचे कोणी घर देता का घर हे स्वगत श्री भुजबळांनी अतिशय ताकदीने सादर केले. श्रोत्यांनीही त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. प्रारंभी मुलाखतीचे संयोजक आणि पत्रकार संजीव कुळकर्णी यांनी भुजबळांचा नटसम्राट असा उल्लेख का केला, याचा खुलासा यावेळी झाला. येथेच मुलाखतीला पूर्णविराम देण्यात आला.

टिप्पण्या