'गोदे'चा उगम 'नाभी'च्या भेटीला

'गोदे'चा उगम 'नाभी'च्या भेटीला
-----
नदी शुद्धिकरण, विकेंद्रीकरणावर भुजबळांच्या मतांबद्दल औत्सुक्य
-------
महेश राजे
नांदेड ः एक तपापूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री आणि देशातील ओबीसी नेते छगन चंद्रकांत भुजबळ हे आज नांदेडात येत आहेत. ते मूळ नाशिकचे असून नांदेडला सुजलाम सुफलाम करणारी दक्षिण गंगा गोदावरी नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते आणि तिचे नाभीस्थान नांदेड हे आहे, असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रकट मुलाखतीत गोदावरी नदी शुद्धिकरण, जिल्ह्याचे विकेंद्रीकरण यासह अन्य महत्वाच्या व ज्वलंत विषयांवर भुजबळांची मते काय आहेत, याबाबत नांदेडकरांना औत्सुक्य असेल.
अभंग प्रकाशन व पुस्तकालयाच्यावतीने भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांची प्रकट मुलाखत येथे आयोजित करण्यात आली आहे. आज रविवारी (दि. 19) सकाळी साडे दहा वाजता कुसूम सभागृहात ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर हे भुजबळ यांना बोलते करणार आहेत. या मुलाखतीबाबत राजकीय जाणकारांपासून अगदी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना उत्सुकता आहे. त्याला कारणही श्री भुजबळ यांचे संयमी व्यक्तिमत्व आणि लढाऊ बाणा हे आहे. 
गोदेच्या शुद्धिकरणाबाबत आग्रही
सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरत गोदावरी नदी शुद्धिकरणाबाबत तातडीने व गांभिर्याने पावले उचलण्याचे आवाहन केले. नाशिक येथे गोदेला 63 नाले मिळतात, ते रोकण्याची गरज व्यक्त करताना पाणी किती घाण व धोकादायक आहे हे त्यांनी विषद केले. हेच पाणी लोक पवित्र म्हणून घरी घेवून जातात, हे गंभीर असून याबाबत शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. नांदेड येथेही गोदावरीची स्थिती काही वेगळी नाही. 
विकेंद्रीकरण झालेच पाहिजे
उद्योगधंदे असो वा शहरे यांचे विकेद्रीकरण झाले पाहिजे, जेणे करुन प्रशासकीय कारभारात सुसूत्रता येईल, असे श्री भुजबळ यांचे मत आहेे. विकेंद्रीकरण न झाल्यास काय परिणाम उद्भवू शकतात, हे त्यांनी नुकतेच विधीमंडळात विषद केले. अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महसूल आयुक्तालयाच्या विभाजनाचा निर्णय झाला होता; परंतु पुढे तत्कालीन मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात खोडा घातला. तेच आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. यावरही भुजबळांची प्रतिक्रिया महत्वाची असेल.
महाविकास आघाडीचे भवितव्य
राजकारणात नितीन गडकरी, अजितदादा पवार हे जसे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात, तशीच ओळख श्री भुजबळ यांचीही आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांना आणखी वेळ असला तरी सूत्रांच्या हवाल्यानुसार महाविकास  आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठीचे  जागावाटप जाहीर झाले आहे. दरम्यान, अजूनही राज्याच्या सत्तेतून महाविकास आघाडी पायउतार झाल्यानंतरचा संघर्ष न्यायालयात सुरु असून त्याबाबत श्री भुजबळ काय मतप्रदर्शन करतात याकडेही नांदेडकरांचे लक्ष असेल.
------
चव्हाण-भुजबळांच्या गिफ्ट-रिटर्न गिफ्टबद्दल उत्सुकता
2009-10 मध्ये अशोकराव चव्हाण राज्याचे पाठोपाठ दोनवेळा मुख्यमंत्री होते. तेव्हा छगन भुजबळ यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. मुलाखतीच्या निमित्ताने श्री भुजबळ यांचा सत्कार अशोकरावांच्या हस्ते होणार असून त्यांचे छोटेखानी भाषण होणार आहे. ते आपल्या खुसखुशित शैलीत भुजबळ यांना काय 'गिफ्ट' देणार आणि त्यानंतर लगेचच भुजबळ हे 'रिटर्न गिफ्ट' कसे देतात, याबाबत या दोन वाक्पटूंकडे श्रोत्यांचे लक्ष असेल.

टिप्पण्या