अण्णांच्या गळाला शंकरअण्णा!

अण्णांच्या गळाला शंकरअण्णा!
----
"उडायचं ठरलंच तर जाळ घेवून उडू"
-------
महेश राजे
नांदेड ः तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरअण्णा यांनी महाराष्ट्रातील पहिली विकेट काढली आहे. अद्याप औपचारिक चित्र स्पष्ट झालं नसलं तरी तब्बल चार दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या आणि सच्चा शेतकरी नेता म्हणून राज्यभर ओळख असलेल्या शंकरअण्णा धोंडगे यांचं ठरल्यात जमा आहे. पक्षांतराबाबत विचार विनिमय करण्यासाठी सोमवारी (दि. 13) बाचोटी (ता. कंधार) येथे बैठक झाली. त्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना शंकरअण्णांनी अद्याप काहीही निर्णय झाला नाही. परंतु उडायचे ठरलेच तर राज्यभरातलं जाळ घेवूनच उडू अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
मागील तीन महिन्यांत दोन नवीन पक्षांची भर पडली आहे. एकतर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नव्या पक्षाची तयारी केल्याच्या बातम्या आहेत. त्याशिवाय तेलंगणातील मुख्यमंत्री के.सी. राव यांचा भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. त्यामुळे पक्षीय उमेदवारांची संख्या वाढून लोकसभा व पाठोपाठ विधानसभा निवडणुकांत प्रचंड चुरस निर्माण होणार आहे. तेलंगणाचाच एम.आय.एम. पक्ष यापूर्वीच पाळेमुळे रोवून सिद्ध आहे. सुरुवातीला एम.आय.एम.ने चांगलीच हवा निर्माण केली होती. परंतु नंतर त्यांची वाटचाल खुंटली. आता बी.आस.एस.ची जोरदार तयारी सुरु आहे. मागील महिन्यात या पक्षाची परिचय सभा झाली. लेंडी, बाभळी, तसेच द.म.रे.शी संबंधित काही प्रश्न या हमसाया राज्यांचे परस्पर संबंध व सामंजस्याचे आहेत.
बी.एस.आर.ने तेलंगणात शेतकरी व महिला हिताचे अनेक निर्णय राबवले आहेत. नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील अनेकजणांची शेतजमीन तेलंगणात आहे. त्याभागात मिळणाऱ्या सुविधांबाबत नांदेडमधील शेतकऱ्यांत व सामान्य नागरिकांत आकर्षण आहे. त्यामुळे काही गावांनी तेलंगणात जाण्याची जाहीर भूमिकाही घेतली आहे. बी.एस.आर.ने महाराष्ट्रात एन्ट्री केल्यानंतर शेतकरी व महिला वर्गच टार्गेट केला आहे. नवयुवक- युवतींना आकर्षित करण्यासाठी बी.आर.एस.ची टीम अखंड कार्यरत आहे. या पक्षाला सच्चा, तळमळीचा व नैतिक अधिष्ठान मजबूत अ्सलेला प्रस्थापित नेता हवा होता. तो त्यांना माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या रुपाने लाभला आहे. अण्णा यापूर्वी राष्ट्रवादीच्या माध्यमातून  विधानसभेत निवडून गेले  होते. परंतु त्यांना पुरेशी संधी मिळाली नाही.
बीआरएसच्या माध्यमातून शंकरअण्णांना सपूर्ण मैदान मोकळे आहे. त्यांना हव्या त्या पद्धतीने पक्षाला दिशा देता येऊ शकते. अण्णा थोर व विद्वान शेतकरी नेते (कै) शरद जोशी यांच्या खास वर्तुळातील. त्यांना शेतीशी संबंधित सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांबाबत प्रचंड तळमळ आहे. राज्यभरात त्यांचा  मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. याच वर्गाकडून वेगळा निर्णय घेण्याचा लकडा शंकरअण्णांच्या मागे होता. त्यानुसार सोमवारी बाचोटी येथे एक व्यापक बैठक पार पडली. यावेळी विविध तालुकाध्यक्ष व पदाधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. विशेष म्हणजे सोमवारी लग्नाची मोठी तारीख होती., तरीही 400 पेक्षा अधिक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीसंदर्भात शंकरअण्णा धोंडगे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्यांनी सविस्तर उहापोह झाल्याचे सांगितले. सामाजिक व राजकीय वाटचालीबाबत काय निर्णय घ्यायचा याची सर्वस्वी जबाबदारी अण्णांवर सोपवण्याचा प्रस्ताव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. आता प्रत्यक्ष पक्षांतराचा मुहूर्त केव्हा, असा प्रश्न विचारला असता, तडकाफडकी निर्णय घेणाऱ्यांपैकी आपण नसून विद्यमान पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करुनच निर्णय घेवू असे ते म्हणाले. आतातर आपण धवपट्टीवर आलो असून उड्डाण घ्यायचेच ठरले तर संपूर्ण जाळे घेवूनच उडू, असे सूचक विधान त्यांनी केले.
----
पाडव्याला गुढी उभारणार
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप अवधी असला तरी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, काही नगरपालिका व नगर पंचायतींच्या मुदती संपल्या आहेत. प्रशासक राजबद्दल लोकांत नाराजी आहे. त्यामुळे या निवडणुका कधीही जाहीर होवू शकतात. हे लक्षात घेवून कालापव्यय न करता मराठी नववर्ष तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला साडे तीन मुहर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त पाडव्याच्या दिवशी शंकरअण्णा पक्षांतराची गुढी उभारतील अशी दाट शक्यता आहे.

टिप्पण्या