मंडळ स्तरावरही होणार आता आधार अपडेट

मंडळ स्तरावरही होणार आता आधार अपडेट
----
मृत्युनंतर आधार कार्ड आपोआप होणार बंद
------
नांदेड ः ज्यांचे आधार कार्ड दहा वर्ष वयाचे झाले असेल, त्यांचे कार्ड अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पोस्ट व बँकेत सुरवातीपासूनच व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर या कामाला गती देण्यासाठी आता मंडळस्तरावरही यंत्रणा उभी करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, मृत्युनंतर आधार कार्ड आपोआप बंद व्हावे, यासाठी यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न केंद्र सरकारच्या स्तरावर सुरु आहेत.
माणसांच्या जीवनात, भौगोलिक स्थानात वेळप्रसंगी बदल होत असतात. परंतु रहिवासी पुरावा, बँकांचे पासबुक, मतदान ओळखपत्र, अलिकडे आधार कार्ड यात तसे बदल वेळोवेळी केले जात नाहीत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. शिवाय वय वर्षे पाचच्या मुलांचे आधार कार्ड देताना त्याच्या बोटांचे ठसे घेतले जात नाहीत तर पालकांच्या माहितीच्या आधारे ते दिले जाते. ती मुले आता मोठी झाली असून त्यांच्या बोटांचे ठसे घेणे शक्य होणार आहे. त्यामुळेही आधार कार्ड अपडेट करणण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड सक्तीचे झाले आहे. आधार कार्ड हा महत्वाचा सरकारी दस्तावेज बनला आहे. त्यामुळे ते अपडेट असणे अभिप्रेत आहे. या उद्देशानेच  ज्यांचे आधार कार्ड काढून दहा वर्ष झाली आहेत, त्यांनी आपले कार्ड अद्यावत करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 20) निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे तहसीलदारांची बैठक घेवून त्यात आधार कार्ड अपडेट करण्याचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
सध्या सेतू केंद्रांबरोबरच बँका व पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा आहे. त्यात आता लोकांच्या सोयीसाठी आणि वेग वाढविण्याच्या उद्देशाने मंडळ स्तरावर यंत्रणा उभी करण्याच्या प्रसंगी शिबीरं आयोजित करण्याच्या सूचना सौ. ढालकरी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याचे आधार कार्ड निष्क्रिय किंवा बाद होत नाही. मतदान ओळखपत्राबाबतही ही समस्या आहे. परंतु त्यासाठी निवडणूक आयोगाने एक विशिष्ट अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. पण, स्वतः पुढाकार घेवून मृत व्यक्तींचे मतदान ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया बहुतांश लोक करीत नाहीत. असेच चित्र आधार कार्डाच्या बाबतीतही आहे.
 केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार सध्या एखाद्या व्क्तीच्या मृत्युनंतर आधार कार्ड रद्द होण्याची कोणतीही यंत्रणा नाही. भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांनी जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या मसुद्यावरील सुधारणावर सरकारने युआयएआयकडून सूचना मागवल्या होत्या. त्यात मृत्यू प्रमाणपत्र देताना आधार कार्ड परत घेता येईल, या सुचनेचा समावेश होता. त्यानुसार युनिक आयडेंटीफिकेशन ऑफ इंडिया आणि रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यासाठी एक यंत्रणा कार्यान्वित करुन त्यासाठी काम करीत आहेत. असे झाले तर आधार क्रमांकाचा गैरवापर टाळता येऊ शकतो, असे केंद्र सरकारचे मत आहे.
देशात जन्म प्रमाणपत्रासह आधार क्रमांक वाटप करण्याच्या योजनेवरही सरकार काम करते आहे. सध्या 20 राज्यांनी ही प्रणाली लागू केली आहे. त्यामध्ये 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत. तर त्यांच्या पालकांच्या माहितीच्या आधारे त्यांना आधार क्रमांक दिला जातो. मूल 5 आणि 15 वर्षाचे झाल्यावर बायोमेट्रिक्स त्यावर अपडेट केले जाते. यादृष्टीनेही आधार अपडेट करण्याची आवश्यकता निर्माण झाल्या असून त्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.

टिप्पण्या