बुलेट ट्रेन नांदेड, औरंगाबादला का नाही?

बुलेट ट्रेन नांदेड, औरंगाबादला का नाही?
----
अशोक चव्हाणांचा केंद्र सरकारला रास्त सवाल
---
नांदेड ः महेश राजे ः मुंबई-अलाहाबाद बुलेट ट्रेनचे स्वागतच आहे; परंतु मुंबई-नांदेड, औरंगाबाद, या मार्गावरही अशा सुपरफास्ट गाड्यांची आवश्यकता आहे. नांदेड ते मुंबई, पुणे हे अंतर 600 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. त्यासाठी तब्बल 12 ते 14 तास लागतात. हे अंतर कमी होण्याची गरज आहे, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मांडली.
'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत अशोकराव चव्हाण यांनी मोजक्याच पण महत्वपूर्ण विषयांना हात घातला. गुजरातची राजधानी अहमदाबाद आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे अंतर कमी होवून व्यापार उदिमाला चालना मिळावी, यासाठी या मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्यात येणार आहे. यानंतर 508 किलोमीटरचे हे अंतर तब्बल 3 तासांनी कमी होईल. प्रतितास 320 किलोमीटर या वेगाने ही ट्रेन धावणार आहे. त्यासाठी सुमारे एक लाख कोटी एवढा खर्च अपेक्षित असून 10 करोड केंद्र आणि प्रत्येकी पाच करोड महाराष्ट्र व गुजरात सरकारचा वाटा आहे. उर्वरित निधी जपान देणार आहे. नागपूर ते मुंबई असा दुसरा एक प्रस्ताव असून हे अंतर 766 किलोमीटर आहे. सध्या त्यासाठी 12 तास लागतात. परंतु बुलेट ट्रेन साडे तीन तासातच नागपूरहून मु्ंबईला पोचेल. अशोक चव्हाण म्हणाले, या दोन्ही प्रकल्पांना आमचा विरोध नाही, उलट स्वागतच आहे. विकासात राजकारण आणून अडथळा निर्माण करण्याची आमची परंपराही नाही आणि कधीच तशी भूमिका असणार नाही; परंतु हे करताना अन्य मागास भागांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल. पश्चिम महाराष्ट्राची प्रगती झाली. दरडोई उत्पन्न वाढले. कारण हा संपूर्ण भाग मुंबईपासून अगदी जवळ 2 ते 3 तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे मुुंबईतील गुंतवणूकदार तिकडे आकर्षित होतो. या परिस्थितीत मराठवाड्यासारख्या अविकसीत भागाचे काय
नांदेडहून मुंबई तसेच पुण्याला जाण्यासाठी तब्बल 12 तास लागतात. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. तसेच वरील अंतरात नवीन मार्ग निर्माण करण्याबाबतही केंद्रशासन उदासीन आहे. नांदेड-लातूर-मुंबई तसेच पुणे असा मार्ग प्रशस्त केल्यास अर्धा वेळ वाचू शकतो. शिवाय नांदेड-मुंबई, पुणे या मार्गावर बुलेट ट्रेन झाल्यास फार तर 3 तासात मुंबई, पुणे ही शहरं गाठता येतील. यामुळे लोकांचा वेळ, श्रम व पैसा तर वाचेलच परंतु नांदेड, हिंगोली, परभणी यासारख्या भागात उद्योगाला चालना मिळेल. आयात-निर्यातीसाठी आणखी एक स्वस्त व सोपा पर्याय प्रशस्त होईल. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने नांदेडहून मुंबई, पुणे तसेच तिरुपती या मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुलाखतीच्या माध्यमातून केली.

टिप्पण्या