'मच गया शोर ताली का, देश हमारा गाली का'

'मच गया शोर ताली का, देश हमारा गाली का'  
----
पुढारी अन् मिडीयाने 'कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा?'
-----
नांदेड - लहानपणी प्रभातफेरीचे मोठे आकर्षण असे. कडक ईस्त्रीचे खाकी चड्डी-पांढरे शर्ट, पायात काळा बुट अन् मित्राचा हात हातात घेत 'बंदा रुपया चांदी का, देश हमारा गांधी का', अशी गगगनभेदी घोषणा, आजही आठवली की अंगावर रोमांच उभे राहतात. वर्तमान मात्र लहानपणीच्या आशा-आकांक्षा, स्वप्नांचा चकनाचूर करणारे आहे. पुढाऱ्यांतील अर्वाच्च कलगीतुरा रोज नवाच किळसवाणा अनुभव देवून जातो. पुढारी जाहीरपणे एकमेकांना शिव्यांचे आहेर करतात आणि अशा प्रत्येक शिवीला टाळ्या पडतात. दोष हा संस्काराकडे की, दोष हा शिक्षणाकडे, हा प्रश्न मन विषण्ण करतो अन् साहजिकच कोडे पडते, कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा
उत्क्रांतीच्या न्यायाने आदिमानवाचे आधुनिक स्मार्ट मानवात रुपांतर झाले परंतु; या संक्रमणात नको ते नुकसानही खूप झाले. अभिव्यक्तीची कक्षा 'बास झाले आता स्वातंत्र्य', या उद्विग्नतेपर्यंत रुंदावली आहे. स्थळ, काळ, औचित्याचे भान विसरुन वाट्टेल तसे अर्थ लावत स्वार्थी नारदगिरी सुरु आहे. एकविसाव्या शतकात पाऊल टाकताना किती स्वप्नं दाखवली व रंगवली गेली होती, याचे भूतकाळात डोकावत सिंहावलोकन केले असता विश्वास बसत नाही. या शतकचा एक चतुर्थांश कालावधी संपत आला आहे आणि मानवी नैतिकतेची प्रतिगामी वाटचाल वेगाने सुरु झाली आहे, असे सध्याचे चित्र आहे. ग्लोबलायझेशनच्या नावाखाली भाषेचा अनावश्यक संकर शालिनतेला चूड लावताना दिसतो. राज्य, देशाला कोणत्या दिशेने घेवून जायचे, याची जबाबदारी ज्या विश्वासाने लोकांनी पुढारी आणि लोकशाहीचा कथित चौथा खांब मानल्या गेलेल्या माध्यमाांवर सोपवली तेच भाषाभ्रष्ट होवून कमरेचे सोडत आहेत. आणि ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली मिडीया प्रेक्षक व श्रोत्यांकडून ते हिणकस विडंबन अक्षरशः पाठ करवून घेत आहे. ज्या घटना किंवा वक्तृत्व अनुल्लेखाने मारायला हवे, तेच भांडवल टीआरपी वृद्धीसाठी वापरले जात आहे.
होळीच्या निमित्ताने शिमगा केला जातो. जाहीरपणे शिवीगाळ करण्यास माफी असणारा हा दिवस. महाराष्ट्रातील सहा प्रांतात सहा प्रकारच्या भाषांमध्ये शिव्या दिल्या जातात. त्यातही मराठवाडी शिव्यांचा इरसालपणा काही औरच; परंतु पुढाऱ्यांकडे असलेला शिव्यांचा खजाना पाहता नुक्कडवरील टपोरी कार्ट्यांनीही माना खाली घालाव्यात. अलिकडे 'नाॅटी' शब्दापासून ही उज्ज्वल परंपरा सुरु झाली. त्यात एकेक पायरी चढत आता बऱ्यापैकी कळस जवळ आल्याचे दिसते. या प्रवासात 'भ'ची बाराखडी, 'च'च्या चारोळ्या, 'म'च्या मिमिक्री, मुक्तपणे अगदी तारस्वरात उधळल्या जात आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर जे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे, ते अत्यंत धोकादायक असून यासाठी सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष जबाबदार आहेत. शिवाय नवनिर्माणाची क्षमता हरवून बसलेला आणि केवळ प्रतिक्रियावादी बनलेला मिडीयाही यात हिरीरीने पुढे आहे. राजकारणाचे आजचे चित्र पाहता नवीन होतकरु तरुणांनी राजकारणात करिअरची आशा सोडली असल्याचे दिसते. लोकशाहीच्या सुदृढ आरोग्यासाठी वेगवेगळ्या पक्षीय भूमिका आणि मतभेद असलेच पाहिजेत; परंतु सध्या मनभेद आणि पराकोटीचा द्वेष पहायला मिळतो. भिन्न पक्षीय पुढाऱ्यांतील हा बदल महाराष्ट्राच्या उज्ज्वल राजकीय परंपरेला बिहार, उत्तरप्रदेशच्या राजकारणाकडे घेवून जात आहे. भारतीय राज्यघटनेने जातींचे उच्चानटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले. परंतु हे कितपत गाठले गेले, हे समिकरण कोणीही मांडालयाल तयार नाही. प्रचंड जाती आणि धर्मद्वेषाने कळस गाठला असून ज्या जातीची  पतपेढी अधिक त्या जातीचे पुढारी अन्य किंवा विशिष्ट जातीला लक्ष्य करताना दिसतात. महाराष्ट्र आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे चित्र दहशतवादापेक्षा कमी भयंकर नाही.
----
माध्यमांची नारदगिरी
प्रसिद्धी माध्यमांचा मूळ पुरुष पुराणातील नारद असल्याचे मानले जाते. कळलाव्या नारद असेही संबोधन आहे. परंतु नारदाच्या कळ लावण्याची फलश्रुती चांगली होत असे आज उलट चित्र दिसून येते. विशेषतः इलेक्ट्राॅनिक माध्यमांचे प्रतिनिधी विडा उचलल्याप्रमाणे प्रतिक्रियांच्या माध्यमातून भांडणे लावताना दिसतात. वक्तव्याचे आकलन हा देखील चिंताजनक विषय झाला असून इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी मराठी माध्यमात सक्रिय असल्याचा तर हा परिणाम नसावा, दरम्यान,, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातून कवितेचे रसग्रहण, परिच्छेद पाठांतर यासारखे मुद्दे किंवा विषय अदृश्य झाल्याचाही हा परिणाम असावा किंवा ठरवून सामाजिक वातावरण ढवळण्याचा अजेंडा कोणीतरी ठरवला की काय, अशीही शंका येते. वास्तव काहीही असो, पण माध्यमांची ही नारदगिरी परवडणारी नाही. 

टिप्पण्या