'सो गया है रस्ता' तर वीज का जाळता?

'सो गया है रस्ता' तर वीज का जाळता?
----
'होमी भाभा'च्या विद्यार्थ्याचा मनपाला प्रस्ताव
---
नांदेड ः 'सो गया ये जहाँ, सो गया आसमाँ, सो गई हैं सारी मंजीले, सो गया है रस्ता', तर मग पथदिव्यांवर अवास्तव वीज जाळून नाहक खर्च कशाला, असा प्रश्न इयत्ता नववीतील डाॅ. हीमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत तिसऱ्या स्तरावर पोचलेल्या एका विद्यार्थ्याने महापालिकेला विचारला आहे. या सोबतच त्याने वीज बचतीचा सविस्तर असा टेक्नोफ्रेंडली प्रस्तावही सादर केला आहे. या माध्यमातून वार्षिक सुमारे साडे तीन कोटी रुपयांची बचत होईल.
सार्थक मनोहर पेटकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता नववीत शिकतो आहे. डाॅ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत तो इयत्ता सहावीत असताना सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. तर सध्या तो याच परीक्षेत तिसऱ्या स्तरावर पोचला असूून दि. 19 मार्च रोजी त्याची मुंबई येथे परीक्षा होणार आहे. त्याच्या अभ्यासाचा विषय 'Renewing in harmony with natutal using IOT', असा आहे. त्याने यापूर्वी शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीत तृतिय क्रमांक मिळविला.  विज्डम मॅथ्स सातवीत तिसरा क्रमांक तसेच आठवीत प्रथम क्रमांक पटकावला.  विज्डम सायन्स इयत्ता आठवीतही त्याने लक्षणीय यश संपादन केले. शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता आठवीतही तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याने नांदेड महापालिका हद्दीतील पथदिव्यांवर अभ्यास केला आहे.
महापालिका हद्दीत एकूण 21 हजार 603 पथदिवे असून त्यापैकी 5 हजार 510 40 वॅटचे साथे ट्यूब आहेत. 125 वॅटचे मर्क्युरी बल्ब 657 असून 70 वॅटचे सोडियम बल्ब 4 हजार 672 आहेत. 150 वॅटचे सोडियम बल्ब 5 हजार 358, 250 वॅटचे 757, 400 वॅट सोडियमचे 66, 70 वॅट मेटल 34, 150 वॅट मेटल सहा, 250 वॅट 53, 400 वैट मेटल 40 असे एकूण 21 हजार 603 पथदिवे आहेत. ते चालू बंद करण्यासाठी 1 हजार 5 ठिकाणी बटन आहेत. ते प्रत्यक्ष हाताळावे लागतात.
पथदिवे चालू बंद करण्याची स्वयंचलित यंत्रणा नसल्याने अनेकवेळा बटन बंद करण्याचे राहून जाते व पथदिवे मग दिवसाही सुरुच असतात. या प्रकारामुळे विजेची नाहक हानी होते. याशिवाय रस्त्यावरील रहदारीनुसार पथदिव्यांची क्षमता कमी-जास्त केल्यास विजेची आणखी बचत होऊ शकते. पथदिव्यांचा उद्देशच मुळी सुरक्षा व अपघात टाळता यावेत यासाठी आहे. सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत रस्त्यांवर गच्च वाहतूक असते. नंतरच्या दोन तासात ती बऱ्यापैकी कमी होते. आणि मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रस्ते अगदीच सुनसान असतात. अशावेळी पूर्ण क्षमतेने बल्ब जाळण्याची आवश्यकता नाही.
सार्थक मनोहर पेटकर याने असा सर्व तपशीलवार अभ्यास करुन एक माॅडेल महापालिकेला सादर केले आहे. हेच माॅडेल तो डाॅ. होमीभाभा परीक्षेच्या तिसऱ्या पातळीवर मुुंबई येथेही सादर करणार आहे. यानुसार लाईट सेन्सरच्या माध्यमातून रस्त्यावरील वाहतुकीनुसार बल्ब पुरेशा क्षमतेने प्रकाश देईल. 7 ते रात्री 10 या वेळेत 100 टक्के क्षमतेने पुढे 12 पर्यंत 75 टक्के क्षमतेने तर पुढे सकाळी 6 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने पथदिवे जळत राहतील व सूर्य जसजसा वर येईल, त्यानुसार ते आपोआप बंद होतील. 
शहराच्या हद्दीत पथदिव्यांच्या माध्यमातून प्रत्येक  रात्री सुमारे 25 हजार युनिट वीज वापरली जाते. पण, सार्थकचे तंत्रज्ञान वापरल्यास त्यात 10 हजार युनिटची बचत होऊ शकते. 10 रुपये प्रति युनिट असा दर गृहित धरला तर 1 लाख रुपये रोज वाचतील. यानुसार वर्षाकाठी सुमारे साडे तीन कोटी रुपयांची बचत होईल, असा सार्थकचा दावा आहे. सार्थकला ऑक्सफर्डच्या प्राचार्या अनुराधा, भार्गव करिअर अकॅडमीचे संचालक भार्गव राजे, महापालिकेचे अभियंता श्री बोडके, श्री टोंगे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याने सांगितले.
-----
दिवे खराबीची सूचना तातडीने मिळले
सार्थकने विकसीत केलेल्या माॅडेलमध्ये एखादा पथदिवा खराब झाल्यास सेन्सरच्या माध्यमातून तातडीने संदेश संबंधित यंत्रणेपर्यंत पोचवला जाऊ शकतो. या माध्यमातून खबा पथदिवा नेमका कोणता व कुठे ते देखिल समजते. त्यामुळे तातडीने तो दुरुस्त करणे सोयीचे होते. अर्थात नागरिकांना सतत तक्रारी करण्याची गरज पडणार नाही.
----
कॅमेरेही बसवता येतील
प्रत्येक पथदिव्याच्या खांबावर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवता येतील. ते देखील लाईट सेन्सरने हाताळता येतील. असे झाल्यास शहरातील 100 टक्के रस्ते वाहतूक पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात येऊन बेशिस्त वाहनचालकांना अटकाव करणे सोपे जाऊ शकते. तसेच अपघाताचा छडाही लवकर लागू शकतो, असा विश्वास सार्थकने व्यक्त केला.

टिप्पण्या