पिंजऱ्यातील वाघ काय 'प्रताप' दाखवणार?

पिंजऱ्यातील वाघ काय 'प्रताप' दाखवणार?
----
फडणवीस तुम्ही सुद्धा... शब्द न पाळणारे...
----
महेश राजे
नांदेड ः माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या एकछत्री साम्राज्याला आव्हान देण्यासाठी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठीवर देवेंद्र फडणवीसांनी हात ठेवला. त्यांना बळ कमी पडू देणार नाही, असा शब्द वारंवार दिला; परंतु तो पाळला गेला नाही, असे दिसते. एकीकडे चतुरंगी सेना तर दुसरीकडे विखुरलेले व नाराजीने ओतप्रोत मावळे, लढायचे कसे? असा प्रश्न चिखलीकरांना पडला असेल तर नवल नाही. आता लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्ष उरले आहे. एवढ्या वेळेसाठी का होईना पण मंत्रिपद नांदेडच्या वाट्याला आले तर चार हात करणे सोपे जाईल, असा मतप्रवाह आहे.
नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अगोदर (स्व.) शंकररावजी चव्हाण व नंतर अशोकराव चव्हाण यांचे या जिल्ह्यावर एकछत्री साम्राज्य आहे. अशोकराव मागील 30 वर्षांपासून अपवाद वगळता कायम सत्तेत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी आवश्यक तो ऑक्सीजनसाठा अशोकरावांकडे सुरवातीपासून होता. त्यामुळे त्यांच्याभोेवती कार्यकर्त्यांचे जाळे विणले गेले. काँग्रेस म्हणजे अशोकराव व अशोकराव म्हणजे काँग्रेस, असे सुस्पष्ट समिकरण आहे. त्यामुळे कोणाला कोणत्या निवडणुकीसाठी तिकिट द्यायचे, याचे सर्वाधिकार श्री चव्हाण यांच्याकडेच आहेत. त्यामुळे कार्यकर्ते बिनधास्त असतात.
उलट परिस्थिती चिखलीकरांकडे आहे. हा रांगडा गडी एकट्याने अशोकरावांना आव्हान देतो. यांच्याकडेही कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे; परंतु ते त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर. त्यांना पक्षाचा पाठिंबा दिसत नाही. केवळ कोरडा दिलासा दिला जातो. मागील सुमारे 9 वर्षांपासून केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आहे. मधले अडिच वर्ष वगळता सहा वर्षांपासून राज्यातही भाजपप्रणित युतीची सत्ता आहे. असे असतानाही चिखलीकरांना योग्य ती ताकद दिली गेली नाही. उलट मध्यंतरी उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार येताच अशोकरावांकडे सार्वजनिक बांधकाम खाते आले. ही संधी साधत त्यांनी आगामी निवडणुकीसाठी आवश्यक ती नेपथ्यरचना केली.
अलिकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी नांदेडात येऊन गेले. यावेळी जाहीर सभेत त्यांनी चिखलीकरांच्या सर्व मागण्यांची नामोल्लेखासह दखल घेत शेकडो कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. त्यात नांदेडकरांच्या जिव्हाळ्याचा एखाद-दुसरा प्रश्न मार्गी लागला आहे. याचवेळी महसूल आयुक्तालय, तहसीलचे विभाजन हे प्रश्न सोडविले असते तर पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर ठरले असते.  
श्री चव्हाण यांच्याकडे सर्व पातळ्यांवर लढणारी चतुरंगी सेना आहे. याबाबतीत चिखलीकर हतबल दिसतात. भाजपाचे जुनेजाणते म्हणविणाऱ्या कार्यकर्त्यांत प्रचंड गटबाजी आहे. अनेक जुने कार्यकर्ते सक्रिय नाहीत. पत्रकबहाद्दरांच्या हातात संघटन गेले आहे. त्यामुळे चिखलीकरांनी विविध कामांसाठी कितीही पाठपुरावा करुन य़श मिळविले तरी ते लोकांपर्यंत पोचवण्यात त्यांचे कोंडाळे अपयशी ठरते. प्रत्येकच निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आणि नाव कुठपर्यंत वापरणार. मोठमोठे होर्डिंग्ज लावणे, सोशल मिडियावर सतत विविध पोस्ट टाकणे यातून मतदारांचा विश्वास थोडाच संपादन करता येणार आहे. पालकमंत्री गिरीष महाजन अधुनमधून धावता दौरा करतात. त्यातून पुरेसे समाधान होत नाही. कार्यकर्त्यांना जोश यावा आणि ते सक्रिय व्हावे, असा कोणताही कार्यक्रम भाजपच्यावतीने राबविला जाताना दिसत नाही.
जिल्ह्यात भाजपाचे लाक्षणिक अर्थाने राजेश पवार व डाॅ. तुषार राठोड हे दोन तर लौकिकार्थाने किनवटचे भीमराव केराम हे तीन आमदार आहेत. याशिवाय विधान परिषदेची 'पाटील'की असली तरी फारशी परिचित नाही. पक्षाने दाखवलेल्या या औदार्याचा काय फायदा झाला हे पक्षश्रेष्ठींनाच ठाऊक. पक्षीय स्तरावरची रचना झालेली असली तरी त्याचा कार्यपूर्ती अहवाल समोर येत नाही. अर्थात चिखलीकरांसोबत अजूनही सोवळे जपणारे बरेच अतृप्त आत्मे ऐकावयास मिळतात. या स्थितीत अधुनमधून अशोकरावांच्या भाजप प्रवेशाच्या कंड्या पिकवल्या जातात. हे सर्वच वातावरण हतोत्साहित करणारे आहे. 
महापालिकेच्या मागील निवडणूक प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मोंढा मैदानावर जाहीर सभेत बोलताना चिखलीकरांना बळ कमी पडू दिले जाणार नाही, असा शब्द दिला होता.त्यानंतरही प्रसंगी त्याची पुनरुक्ती झाली.परंतु प्रत्यक्षात शून्य. मराठवाड्यात औरंगाबादला भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्या रुपाने  केंद्रात दोन राज्यमंत्रिपदं आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातही अतुल सावे (औरंंगाबाद), संदीपान भुमरे (ता.  पैठण, जि.औरंगाबाद), अब्दुल सत्तार (जालना) आणि तानाजी सावंत यांचा समावेश आहे. पण उर्वरित मराठवाड्यात कोणलााही प्रतिनिधीत्व नाही. 
नांदेड हा मराठवाड्यातील दोन क्रमांकाचा जिल्हा. वास्तविक येथे केंद्रात व राज्यातही मंत्रिमंडळात स्थान असणे आवश्यक आहे; परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
सत्ता कोणत्याही पक्षाची असो. नांदेडमध्ये सर्वच पक्षश्रेष्ठी अशोकरावांच्या कलाने पक्ष चालवतात, असा लोकांचा पक्का समज झाला आहे. त्यामुळे चिखलीकरांसारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी प्रस्थापितांसमोर कितीही दंड थोपटले तरी फारसा उपयोग होत नाही. 
----
'अकेले चिखलीकर क्या करेंगे' 
आपले सरकार असूनही आपल्या कार्यकर्त्यांची आबाळ होत असल्याची नाराजी सर्वदूूर आहे. चिखलीकरांची कितीही इच्छा असली तरी तेच बंदिस्त असल्याने अशोकरावांच्या गडाला सुरुंग लावणे त्यांना अवघड जात असल्याचे दिसून येते. मध्यंतरी नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर सक्रिय असणाऱ्यांनाच उमेदवारी देण्याचा मनोदय बोलून दाखवला. तेव्हापासून अनेक हौशे,गवशे,नवशे सोशल मिडिया वीर होऊन बसले  आहेत. उठल्या अंथरुणाचे मोबाईल हातात घेवून सोयीच्या पोस्ट पुढे सरकवणे, त्याला उत्तर देणे असे प्रकार केले जातात आणि कार्यभाग आटोपल्याचे समाधान मानले जाते. या प्रकारामुळे नवागत तसेच पक्षात नव्याने येऊ घालणाऱ्या कार्यकर्त्यांत संभ्रम दिसून येतो.

टिप्पण्या